महाराष्ट्र 14 न्यूज : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकानंतर मध्य रेल्वेवरील ‘आपटा’ रेल्वे स्थानक, चित्रपट निर्मात्यांसाठी सर्वात लोकप्रिय चित्रिकरण स्थळ ठरलं आहे. २०१९-२०२० या आर्थिक वर्षात आपटा रेल्वे स्थानकावर ‘रात अकेली है’, ‘मुंबई सागा’ आणि ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ यासह चार चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले होते आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ८ चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले होते, त्यामध्ये लोकप्रिय चित्रपट ‘पंगा’, ‘चोक्ड’ आणि ‘सूरज से मंगल भारी’ या चित्रपटांचा समावेश आहे.
‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘कुछ कुछ होता है’, ‘रंग दे बसंती’, ‘बाघी’, ‘खाकी’, ‘शादी नंबर १’, ‘चायनाटाऊन’ आणि बॉक्स ऑफिसवरच्या अनेक हिट चित्रपटांसारख्या लोकप्रिय चित्रपटांसह आपटा स्टेशन असंख्य चित्रपटांमध्ये कॅमेर्याबद्ध झाला आहे. “आपटा निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखला जातो ज्याच्या एका बाजूला टेकडी आहे, दुस-या बाजूला नदीजवळील रस्ता आणि सुलभ रस्ता आहे, बांकदार ट्रॅक आणि प्लॅटफॉर्मसह पनवेल -रोहा मार्गावर हे स्थानक आहे. तसंच, कलाकारांची व्हॅनिटी व्हॅन पार्क करुन ठेवण्यासाठी पुरेशी जागाही येथे उपलब्ध आहे. कमी गर्दी असलेले असे स्थानक चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी योग्य स्थान आहे. ” असं मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितलं.

आपटा रेल्वे स्थानकास काही गाड्यांना थांबा देण्यात आला आहे आणि ते क्रॉसिंग स्टेशन आहे कारण त्यात आणखी एक ट्रॅक असून चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बुक केलेल्या विशेष गाड्यांच्या हालचालींसाठी जास्त सोयीच्या आहेत. आपटा हे स्थानक फिल्म सिटी, मुंबईपासून सुमारे ७५ कि.मी. अंतरावर असून प्रवास फक्त २ तासांचा आहे. म्हणूनच वेब मालिका, माहितीपट आणि टीव्ही मालिका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आपटा रेल्वे स्थानक सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनले आहे.
चित्रपट निर्मात्यांची आवश्यकता पूर्ण करणार्या अनेक सुंदर चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी असे अनेक स्थळ/ स्थानके लाभणे हे मध्य रेल्वेकरिता अनोखी भेटच आहेत. चित्रीकरणासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकापासून आपटा, पनवेल, चौक, लोणावळा, खंडाळा, वाठार, सातारा आणि तुर्भे आणि वाडी बंदर सारख्या लोकप्रिय रेल्वे स्थानकांपर्यंत ही चित्रपटाच्या चित्रीकरणाची स्थळे आहेत. चित्रपटाच्या चित्रीकरणाची परवानगी मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात येते, अलीकडेच चित्रपटाच्या चित्रीकरणाची परवानगी वेगवान करण्यासाठी सिंगल विंडो सिस्टम सुरू केली आहे. या प्रक्रियेच्या सुलभतेमुळे फिल्म तयार करणा-या कंपन्यांना स्क्रिप्ट आणि आवश्यक असलेल्या बाबींसह नमूद करून व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर परवानगी दिली जाते.
24 Comments