महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ फेब्रुवारी) : शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर चिंचवड विधानसभा परिसरातून रॅली काढून भारतीय जनता पक्षाच्या वतीने अश्विनी जगताप यांनी आज (दि.०६ फेब्रुवारी) दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या सोबत आमदार बंधू शंकर जगताप यांनीही आपला डमी अर्ज दाखल केलेला आहे.आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये पोट निवडणूक होत आहे.
थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ प्रभाग कार्यालयामध्ये चिंचवड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय सुरू केले आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील कार्यालयापासूनच नागरिकांनी या रॅलीमध्ये गर्दी केली होती. पिंपळे गुरव मधील मंदिरात दर्शन घेऊन या अर्ज भरण्याकरिता अश्विनी जगताप या पदयात्रेत सहभागी झाल्या. ही पदयात्रा पिंपळे गुरव सांगवीतुन निघून थेरगाव येथे आली, यात चिंचवड मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे यावेळी दिसत होते. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये दुपारी साडेबाराच्या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, आमदार व शहराध्यक्ष महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप आदी उपस्थित होते. अश्विनी जगताप यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे अर्ज सादर केला.