Google Ad
Editor Choice

बालदिनानिमित्त विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह यांच्या समवेत प्रश्नोत्तराच्या स्वरुपात साधला संवाद

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १५ नोव्हेंबर २०२२ : आवश्यक कठोर परिश्रम, ध्येयाप्रती प्रामाणिकता आणि सातत्य राखल्यास जीवनातील कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते. जीवन जगताना विद्यार्थांनी अभ्यासासोबत आपले छंद जोपासत आनंदी जीवन जगले पाहिजे, त्यातूनच विद्यार्थ्यांचा त्यांनी निवडलेल्या क्षेत्रातील यशाचा मार्ग सुकर होईल, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.

            महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये बालदिनानिमित्त विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी  आयुक्त शेखर सिंह यांच्या समवेत प्रश्नोत्तराच्या स्वरुपात संवाद साधला. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना आयुक्त सिंह यांनी दिलखुलास उत्तरे दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विशेष अधिकारी किरण गायकवाड, पत्रकार  डॉ. विश्वास मोरे, मयूर केमसे तसेच विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.  प्रियदर्शनी स्कुल भोसरी,  प्रियदर्शनी स्कुल इंद्रायणीनगर,  ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कुल पुणे, जय हिंद हायस्कुल पिंपरी, श्री साई इंग्लिश मिडियम स्कुल पिंपळे गुरव, केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कुल आकुर्डी, एम्प्रोस इंटरनॅशनल स्कुल चिंचवड, ज्युनियर ऑर्किड हायस्कुल पिंपळे गुरव, डिव्हाईन इंग्लिश मिडियम स्कुल पिंपळे गुरव, पी.के. इंटरनॅशनल इंग्लिश मिडियम स्कुल, इनोवेटीव वर्ल्ड स्कुल चिखली या शाळांचे शंभरपेक्षा अधिक  विद्यार्थी चर्चेत सहभागी झाले होते.

Google Ad

            आयुक्त शेखर सिंह शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले, विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थ्यांनी दैनंदिन गृहपाठ दररोज केला पाहिजे, मैदानी खेळासह नवनवीन छंद जोपासले पाहिजेत. आपल्या क्षमता लक्षात घेऊन ध्येय ठरवावे, ठरवलेल्या ध्येयासाठी परिश्रम करत असताना वेळेचे उत्तम नियोजन करून संरचनात्मक अभ्यास केल्यास यश नक्की प्राप्त होईल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, आयुक्त शेखर सिंह यांनी विद्यार्थ्यांना महापालिकेची रचना, कार्ये, विविध प्रकल्प, उपक्रम याबाबत माहिती दिली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आयुक्तांना स्थानिक पातळीवरील विषयांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवरील विषयांसंदर्भात प्रश्न विचारले, विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आयुक्त यांनी विद्यार्थ्यांना आकलन होईल अशा सुलभ व परिचित भाषेत उत्तरे दिली.

 “अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करताना तुमच्यावर राजकीय, प्रशासकीय दबाव येतो का?” असा प्रश्न विचारला असता आयुक्तांनी सांगितले की, लोकशाही व्यवस्थेत कामे करत असताना आपल्यावर दबाव येणे स्वाभाविक आहे.  दबाव असतानाही नियमानुसार प्रशासकीय कामकाज करत राहणे व पुढे जाणे गरजेचे असते, असे आयुक्त यांनी सांगितले.   “शालेय जीवनात तुम्ही दैनंदिन अभ्यास कशा पद्दतीने करत होता?” असा प्रश्न आयुक्तांना विद्यार्थ्यांनी विचारला त्यावर आयुक्त शेखर सिंह म्हणाले, शालेय गृहपाठ दररोज न चुकता करणे, दररोज ठरवलेल्या वेळात खेळणे, वडिलांनी लहानपणी शालेय अभ्यासासोबतच वर्तमानपत्र वाचनाची सवय लावल्यामुळे शब्दसंग्रह वाढण्यास मदत झाली, तसेच ज्ञानात भर पडत गेली. विद्यार्थ्यांनी दररोज वर्तमानपत्र वाचनासाठी वेळ दिला पाहिजे त्यामुळे त्यांना आपल्या आजूबाजूला कोणत्या घडामोडी घडत आहेत हे कळेल, तसेच त्यांच्या ज्ञानात भर पडेल, विद्यार्थ्यांनी  इंडिया आफ्टर गांधी हे पुस्तक नक्की वाचावे त्यामुळे  त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावतील, असे ते म्हणाले.    “प्लास्टिक वापरावरील बंदीबाबत तसेच स्वच्छतेबाबत महापालिकेच्या वतीने काय प्रयत्न केले जात आहेत?”  या प्रश्नावर आयुक्त म्हणाले, शहरात महापालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत हरा गिला, सुका नीला उपक्रम राबूवुन कचरा विलगीकरण करण्यात येत आहे. कचराकुंडी मुक्त शहर उपक्रम यशस्वी झाला असून शहरात घंटा गाडीद्वारे कचरा संकलन करण्यात येत आहे.  तसेच शहरात प्लास्टिकच्या वापर कमी करण्यासाठी प्लास्टिक मुक्त शहर अभियान राबविण्यात येत आहे. बंदी असलेले प्लास्टिक वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे,  प्लास्टिक पासून विद्युतउर्जा निर्मिती प्रकल्प साकारण्यात आला आहे, प्लॉगेथॉन मोहीम, प्लास्टिक मुक्त शहर जनजागृती प्रभातफेरी, शुन्य कचरा शाळा, शुन्य कचरा झोपडपट्टी असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, अर्बन आऊटकम्स फ्रेमवर्क अंतर्गत सिटीझन परसेप्शन सर्वेक्षण सुरु असून त्यामध्ये देखील सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. आपल्या घरातील कचऱ्याच्या विलगीकरणासाठी आणि प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन देखील आयुक्त सिंह यांनी विद्यार्थ्यांना केले. महापालिकेच्या शाळांमध्ये शून्य कचरा शाळा उपक्रम राबविण्यात येत आहे असून यामध्ये शाळा यशस्वी होत आहेत. खासगी शाळांनी देखील शुन्य कचरा शाळा उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देताना विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होण्याची ग्वाही दिली.

आयुक्त शेखर सिंह यांना त्यांच्या जीवनातील आदर्श कोण असा  विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, माझे अनेक आदर्श आहेत, माझे पहिले आदर्श माझे आई वडील आणि आजोबा आहेत. लिंग भेदभाव  घरात होणार नाही याचे बाळकडू मला माझ्या परिवारातून मिळाले. स्वतंत्र भारताचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन हे माझ्या आदर्शांपैकी एक आहेत. निरक्षरता, दारिद्र्य, विषमता, संसाधनांची कमतरता अशा अनेक समस्यांमुळे भारतीय लोकशाही यशस्वी होणार नाही, असे मत त्यावेळी सर्व जग मांडत असताना सुकुमार सेन यांनी स्वतंत्र भारतातील पहिल्या लोकसभेच्या निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्या होत्या.  त्यामुळे कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत ध्येय गाठता येते हे सुकुमार सेन यांच्यापासून शिकण्यासारखे आहे, असे सिंह यांनी  सांगितले. भारतीय संविधानाने प्रत्येकाला स्वातंत्र्य बहाल केले आहे, त्याचा उपभोग घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मोबाईल हा आता प्रत्येकाच्या जीवनातील एक भाग जरी होत असला तरी त्याचा अतिरेक होता कामा नये असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!