महाराष्ट्र 14 न्यूज : देशभरात असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने मंगळवारी बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, असे असले तरी ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) एक पर्याय दिला आहे.
सीबीएसईने बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन पर्याय दिले आहेत. बारावीच्या निकालाबाबत केंद्र सरकारने म्हटले, सीबीएसई लवकरच एक निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धत जाहीर करेल. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर सीबीएसईने म्हटले की, “ज्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनावर आधारित निकाल मान्य नसेल असे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यावर त्यांची परीक्षा घेण्यात येईल.”

सोमवारी सायंकाळच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीनंतर सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन सीबीएसई बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितेला सर्वात जास्त महत्त्व आहे आणि यात कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही.
रिपोर्ट्सनुसार, सीबीएसईने शाळांकडून 9वी, 10वी आणि 11वीच्या गुणांची सविस्तर माहिती मागवली आहे. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की, गेल्या तीन वर्षांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा निकालांच्या आधाराचाही मूल्यमापनात समावेश कऱण्यात येईल. या संदर्भात सीबीएसईकडून लवकरच अधिकृत माहिती देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.
17 Comments