Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पोलिसांची अनास्था बेतली तरुणीच्या जीवावर … गुन्हा दाखल करण्यासाठी पैशांची मागणी

महाराष्ट्र 14 न्यूज : एक तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांकडून ब्लॅकमेलिंग होत असल्याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या तरुणीकडे वाकड पोलिसांनी १० हजारांची मागणी केली. पैसे न दिल्याने पोलिसांनी तिचा केवळ तक्रार अर्जच घेतला. जर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींवर कारवाई केली असती तर तरुणीने आत्महत्या केली नसती, असा गंभीर आरोप मयत तरुणीच्या भावाने केला. श्रद्धा ज्ञानेश्‍वर कोकणे (रा. रहाटणी), असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

मयत श्रद्धाचा भाऊ ऋतिक ज्ञानेश्वर कोकणे यांनी याबाबत माहिती दिली, श्रद्धा हिचा प्रेम विवाह नात्यातील अजिंक्‍य साठे या तरुणाशी ठरला होता. त्यांनी एकत्र फोटोही काढले होते. मात्र नंतर साठे कुटुंबीयांकडून भरमसाठी पैशाची मागणी झाली. त्यातच अजिंक्‍य याचे इतर काही मुलींशी संबंध असल्याचेही श्रद्धा हिला कळाले. यामुळे तिने अजिंक्‍यशी विवाह न करण्याचा निर्णय घेतला. मात्र साठे कुटुंबीय आणि त्यांच्या नातेवाइकांकडून लग्नासाठी दबाव आणला.
लग्न न केल्यास फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी अजिंक्‍य साठे याने दिली. यामुळे श्रद्धा त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी वाकड पोलीस ठाण्यात गेली. मात्र तेथील एका महिला पोलीस अधिकाऱ्याने गुन्हा दाखल करण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यामुळे पोलिसांनी केवळ तक्रार अर्जच घेतला असल्याचे ऋतिक याने सांगितले.

Google Ad

त्यानंतर राजकीय नेता असलेल्या अजिंक्‍य याच्या दाजीकडून पोलिसांवर दबाव आणला. मी श्रद्धा व तिच्या कुटुंबास कोणताही त्रास देणार नाही. तिचे फोटो व व्हिडिओ डिलिट केले आहेत, अशा आशयाचा मजकूर अगोदरच टाईप केलेल्या एका कागदावर अजिंक्‍य याची केवळ स्वाक्षरी घेण्याची औपचारिकता पोलिसांनी दाखविली. मात्र त्यानंतरही अजिंक्‍यकडून श्रद्धा हिला सोशल मीडियावर त्रास देणे सुरूच होते. हा त्रास असहाय्य झाल्यावर श्रद्धा हिने २६ एप्रिल रोजी राहत्या घरी आत्महत्या केली असल्याचे ऋतिक म्हणाला.

आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मृत्यूला अजिंक्‍य साठे, त्याचे आई वडील, दोन बहिणी आणि दाजी जबाबदार असल्याचे श्रद्धाने आपल्या मोबाइलवर टाइप करून ठेवले होते. तिच्या आत्महत्येनंतर गुन्हा दाखल करतानाही सहा ऐवजी फक्‍त तीनच आरोपी असल्याचे पोलिसांनी दाखविले. जर पहिल्यांदाच पोलिसांची गुन्हा दाखल करून आरोपींवर योग्य ती कारवाई केली असती तर कदाचित श्रद्धा हिच्यावर आत्महत्येची वेळच आली नसती, असे तिच्या भावाने सांगितले. सध्या या प्रकरणात तपास करत असलेले पोलीस अधिकारी आरोपींचे नातेवाईक आहेत.

त्यामुळे हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करावा, अशी मागणी मयत श्रद्धा यांचा भाऊ ऋतिक कोकणे याने केली आहे. याप्रकरणी ऋतिकने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर संबंधित महिला पोलीस अधिकारी यांना नियंत्रण कक्षास संलग्न करण्यात आले आहे. शिवाय त्या महिला अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशीदेखील सुरू करण्यात आली आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!