Google Ad
Editor Choice

धक्कादायक : मुलासाठी पेढा , मुलीसाठी बर्फीचा कोडवर्ड … फिरत्या गर्भलिंग निदान केंद्राचा आंतरजिल्हा रॅकेटचा पर्दाफाश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६मे) : मोटारीतून फिरत्या बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचे आंतरजिल्हा रॅकेट असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. संबंधित लॅब टेक्निशियने डॉक्टरांच्या मदतीने पुणे जिल्ह्यासह, सातारा, सोलापूरमध्ये हजारो बेकायदा गर्भलिंग निदान केले आहेत.

एका गर्भलिंग निदानासाठी डॉक्टरांपासून ते लॅब टेक्निशिनय साखळीला 20 ते 40 हजार रूपये मिळत होते. मुलांसाठी पेढा तर मुलींसाठी बर्फी असा कोडवर्ड वापरून सर्रासपणे बेकायदा गर्भलिंग निदान केले आहे.

Google Ad

डॉक्टरांच्या मदतीने गावोगावी मोटारीतून फिरून गर्भलंग निदान करणाऱ्या टोळीचा इंदापूर उपजिल्हा रूग्णालयासह पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केला आहे. आरोपी प्रवीण पोपटराव देशमुख (वय 32, रा. राजळे, जि. सातारा) आणि तौशिफ अहमद शेख (वय 20, रा. दोघे रा. राजळे, जि. सातारा) हे दोघेही एकाच गावचे असून त्यांचे अनेक कारमाने उघडकीस आले आहेत. माळशिसरमधील डॉक्टर सुशांत हनुमंत मोरे, डॉ. हनुमंत ज्ञानेश्वर मोरे, कमल हनुमंत मोरे (सर्व रा. कोळेगाव, माळशिरस, सोलापूर)यांच्या साथीने आरोपींनी इंदापूर, फलटण, माळशिरस, अकलूज, शिरूर, बारामती, सातारा, सोलापूर ग्रामीण भागात बेकायदा गर्भलिंग निदान केले. त्याद्वारे लाखो रूपयांची माया गोळा केल्याची शक्यता आहे. मागील वर्षभरापासून टोळीने आंतरजिल्हा रॅकेट चालविल्याचे उघडकीस आले आहे. डॉक्टर आणि लॅब टेक्निशियन यांच्या साखळीने बेकायदा गर्भलिंग निदान करून मुलींचा गर्भ पाडण्यासाठी प्रत्येकी एका पेशंटकडून 20 ते 40 हजार रूपये घेत होते.

बेकायदा गर्भलिंग निदान करणाऱ्यांची माहिती इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष खामकर यांना मिळाली होती. त्यानुसार 13 मे रोजी वैद्यकीय तज्ज्ञ आणि पोलिसांच्या पथकाने मोटारीचा पाठलाग करून लॅब टेक्निशियन देशमुख आणि चालक शेख यांचा पर्दापाश केला. त्यांच्याकडून मोटार आणि गर्भलिंग निदान यंत्रणा जप्त करण्यात आली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर अधीक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, एपीआय नागनाथ पाटील, उपनिरीक्षक माधुरी देशमुख, के.बी. शिंदे, खंडागळे, मोहिते, उपजिल्हा रूग्णालय पथकाने केली.

असे केले जात होते बेकायदा गर्भलिंग निदान

इंदापूर पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, माळशिरसमधील कोळेगावचे डॉ. सुशांत मोरे, डॉ. हनुमंत मोरे, कमल मोरे यांच्याकडे ठिकठिकाणाहून तपासणीसाठी जाणाऱ्या गर्भवती महिलांकडे मुलगा हवी की मुलगी अशी विचारणा केली जात होती. त्यानंतर मोरे डॉक्टर परिवाराकडून महिलांना गर्भलिंगनिदान करण्यासाठी लॅब टेक्निशियन प्रवीण देशमुख याच्यासोबत संवाद घडविला जात होता. व्यवहार ठरविल्यानंतर एका महिला पेशंटच्या गर्भलिंग निदानासाठी मोरे डॉक्टरांना 25ते 30 हजार रूपये तर लॅब टेक्निशियन पाटीलला 10 ते 15 हजार रूपये मिळत होते. डॉक्टर आणि लॅब टेक्निशियनच्या मदतीने हजारो गर्भलिंग निदान करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुलासाठी पेढा तर मुलींसाठी बर्फी कोडवर्ड वापरला जात होता. मुलींचा गर्भ पाडण्यासाठी डॉक्टरांसह पाटीलकडून बेकायदा गोळ्यांचा वापर करण्यात येत होता.

इंदापूरमध्ये मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचा उपजिल्हा रूग्णालयासह पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आजूबाजूला अशाप्रकारे बेकायदा गर्भलिंग निदान होत असल्यास नागरिकांनी पुणे ग्रामीण पोलिसांच्या नियंत्रण कक्षासह (020-25657171,72) भरोसा सेलला माहिती द्यावी. संबंधित माहितीदाराने नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. तालुका स्तरावरील पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार बेकायदा गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर पोलिसांकडून वॉच ठेवण्यात येत आहे- डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!