Google Ad
Editor Choice

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका प्रशासनाला केल्या या सूचना

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २१ ऑक्टोबर २०२२) :- शहरातील रस्त्यावर पावसामुळे निर्माण झालेले खड्डे तसेच नादुरुस्त रस्ते डिसेंबर अखेरपर्यंत सुव्यवस्थित करावेत, रस्ते, आरोग्य, पाणी तसेच शालेय शिक्षण पद्धती गुणवत्तावाढीसाठी भर देऊन  नागरिकांच्या मुलभूत गरजांचे नियोजन करावे अशा सूचना महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका प्रशासनाला केल्या.

            पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत महापालिकेच्या विविध विकास कामांसंदर्भात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी पालकमंत्री पाटील बोलत होते. महापालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पालकमंत्री यांचे स्वागत केले.

Google Ad

या बैठकीस आमदार उमाताई खापरे, महेश लांडगे, आमदार प्रतिनिधी तथा  माजी नगरसदस्य शंकर जगताप, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, माजी खासदार अमर साबळे, माजी महापौर माई ढोरे,   माजी सत्तारूढ पक्षनेते  एकनाथ पवार, नामदेव ढाके, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता रामदास तांबे, अशोक भालकर, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सुभाष इंगळे, संदिप खोत, विठ्ठल जोशी, अजय चारठाणकर, रविकिरण घोडके, सहायक आयुक्त सुषमा शिंदे, समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांच्या सह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून पिंपरी चिंचवड शहराला देखील त्याचा फटका बसला आहे. पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरात देखील अनेक ठिकाणी रस्त्यांचे नुकसान झाले आहे. रस्ते दुरुस्तीच्या कामाला वेग देऊन शहरातील रस्ते दुरुस्तीची सर्व कामे लवकरात लवकर  करावीत. नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवून पाणीपुरवठा सुरळीत करा, गृहनिर्माण संस्थांचा ओला कचरा न उचलण्याच्या निर्णयाला महापालिकेने स्थगिती द्यावी, असे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले.

दरम्यान, महापालिकेच्या शाळांमध्ये पट संख्या वाढण्यासाठी महापालिकेने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयांबद्दल जिज्ञासा निर्माण करण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन देण्यात यावे. महापालिकेच्या यशस्वी शाळांची नोंद घेऊन त्यांना अधिक चांगली कामगिरी पार पाडण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. शैक्षणिक पायाभूत सुविधांची उपलब्धता अधिक प्रमाणात करून द्यावे, असेही ते म्हणाले.

  यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे महापालिकेच्या विविध विभागामार्फत सुरु असलेल्या नाविन्यपूर्ण तसेच प्रस्तावित असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. यावेळी लोकप्रतिनिधींनी महापालिकेच्या संलग्न असलेल्या मेट्रो, पीएमआरडीए विकासात्मक प्रकल्पाबाबत राज्य तसेच केंद्र शासनाकडे प्रलंबित अथवा विचारार्थ असलेल्या प्रश्नांची माहिती त्यांना दिली. त्याबाबत पाठपुरावा  करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन पालकमंत्री पाटील यांनी दिले.

तत्पूर्वी, महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाच्या वतीने जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान अभियानांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजनेत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात सदनिकेचा ताबा प्रमाणपत्र देण्यात आले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!