Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक एकमेकांत भिडले … वादाला राष्ट्रवादीची किनार असल्याचे आले समोर!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक एकमेकांत भिडले. शिवसेना गटनेता राहुल कलाटे, अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप आणि भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे हे एकमेकांच्या अंगावर धावून गेले. स्थायी समितीच्या सदस्यांच्या नावाची घोषणा आज केली जात होती. तेव्हा अपक्ष गटाचे नाव जाहीर करताना हा अभूतपूर्व गोंधळ झाला.

शत्रुघ्न काटेंची भाजपने यंदाच्या स्थायी समितीत वर्णी लावली आहे. आता त्यांना स्थायीचं अध्यक्ष पदही मिळवायचं आहे. दुसरीकडे शिवसेनेचे राहुल कलाटे यांचा स्थायीचा कार्यकाळ संपुष्टात आलाय. पण अपक्ष गटातून त्यांचे निकटवर्तीय नवनाथ जगताप हे स्थायीत यावेत म्हणून त्यांनी फिल्डिंग लावली होती. मात्र, तसे घडत नसल्याचं लक्षात येताच हा गोंधळ झाला. अपक्ष गटनेता बारणे आणि अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची किनार ही या वादाला निमित्त ठरली.

Google Ad

अपक्ष गटनेते कैलास बारणे आज उपस्थित नसताना अपक्ष गटाच्या सदस्याचे नाव जाहीर केलं जात होतं. सुरुवातीला भाजपशी संलग्न असणारे कैलास बारणे अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वावरताना दिसतायेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांची त्यांनी भेट घेतल्याची अन् त्यांचा आदेश येताच राष्ट्रवादीत ते प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे अपक्ष गटातील त्यांचे दुसरे सहकारी नवनाथ जगताप यांचं नाव बारणे देतील असं ठाम होतं. तशी फिल्डिंग देखील लावण्यात आली होती. पण अपक्ष गटनेते कैलास बारणे स्वतःच सर्व साधारण सभेत गैरहजर राहिले, त्यामुळे त्यांनी नेमकं कोणाचं नाव दिलं हे गुलदस्त्यात होतं.

पण ऐनवेळी नवनाथ जगताप ऐवजी दुसऱ्याच नावाची वर्णी लागल्याची कुणकुण शिवसेनेचे कलाटे आणि अपक्ष नगरसेवक जगताप यांना लागली. त्यामुळे अपक्ष गटनेत्यांच्या अनुपस्थितीत अपक्ष गटाचे नाव जाहीर करू नये, अशी भूमिका कलाटे आणि जगताप यांनी घेतली. यावरून भाजप नगरसेवकांसोबत त्यांचे वाद सुरू झाले. जनसंपर्क अधिकारी नाव जाहीर करायला लागले असता, कलाटे यांनी त्यांना तंबी दिली. तरीही महापौर माई ढोरे यांनी नाव जाहीर करण्याच्या सूचना दिल्या. अशातच वाद घालणारे सर्व नगरसेवक महापौरांच्या समोर उभे ठाकले.

यात स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी इच्छुक असणारे भाजपचे शत्रुघ्न काटे अग्रस्थानी होते. अपक्ष गटाचे आलेले नाव तातडीने जाहीर व्हावे म्हणून काटे जोर लावत होते. तेव्हा कलाटे आणि जगताप यांचे शत्रुघ्न काटे यांच्यासोबत शाब्दिक बाचाबाची झाली आणि बघता बघता ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. कॉलर धरेपर्यंत गेलेला वाद उपस्थित नगरसेवकांनी मिटवता घेतला. स्थायी समितीची नावं जाहीर करून, सभा तहकूब करण्यात आली. पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असल्याने यंदाची ही शेवटची स्थायी समिती सदस्यांची निवड होती. त्यात झालेल्या या अभूतपूर्व गोंधळाचे पडसाद महापालिका निवडणुकीपर्यंत उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!