Google Ad
Editor Choice Education

यूपीएससी परीक्षेत माधुरीची ‘ गरुड’भरारी … शालेय जीवनात अधिकारी होण्याचे बघितलेले स्वप्न प्रत्यक्षात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि२८ सप्टेंबर) : इयत्ता आठवीतच स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न बाळगलेल्या माधुरी भानुदास गरुड हिने केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत 561 वी रँक प्राप्त केली. यंदा यूपीएससी उत्तीर्ण होणारी पिंपरी-चिंचवडमधली ती पहिली विद्यार्थिनी ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या किंवा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तिने एक आदर्श निर्माण केला आहे.

दहावीमध्ये तब्‍बल ९४ टक्‍के गुण मिळविल्‍यानंतरही तिने अकरावीला पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये कला शाखेत प्रवेश घेतला. शालेय जीवनापासून अधिकारी होण्याचे स्‍वप्‍न बघण्यास सुरवात केली व स्‍वप्‍नांचा पाठलाग सुरू ठेवला. यूपीएससी परीक्षेत यश मिळविताना अखेर हिने स्‍वप्‍नपूर्ती केली. आई गृहिणी आणि वडील सेल्स टॅक्स विभागात नोकरीला असलेल्या घरात माधुरीने केवळ कठोर परिश्रम व इच्छाशक्तीच्या जोरावर लाल दिव्याची गाडी मिळवून दाखवली आहे.

Google Ad

दहावीमध्ये 94 टक्के गुण मिळविल्यानंतर विज्ञान किंवा वाणिज्य शाखा न निवडता माधुरीने कला शाखा निवडली. कला शाखेतूनच पदवी संपादन केली. पदवीनंतर मानव्यशास्त्र, राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली. त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयातूनच कायद्याचे शिक्षण (लॉ) घेतले. दरम्यान, इयत्ता आठवीमध्ये प्रशासकीय सेवेत जाण्याचे बाळगलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचे मनावर घेतले आणि पदवीनंतर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. सुरुवातीला कठीण वाटणारा अभ्यास अल्पावधीतच सुकर होत गेला. दिल्लीसारख्या मोठ्या शहरात जाऊन यूपीएससीचा अभ्यास करावा, असे मनोमन वाटले. इच्छाशक्तीच्या जोरावर सारथी संस्थेची शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी प्रयत्न केले आणि सारथीची शिष्यवृत्ती मिळालीही. सारथीची शिष्यवृत्ती मिळाल्याने दिल्लीत जाऊन अभ्यास आणि क्लासेस जॉईन करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. दिल्लीत खासगी क्लास व सलग 10 ते 15 तास अभ्यास केला.

दिल्लीत अभ्यासिकेसाठी दर महिन्याला पैसे जास्त जातात, म्हणून अभ्यासिका जॉईन न करता खोली करूनच अभ्यास केला. नोट्स, पुस्तके, क्लासेस हे सर्व सारथीमुळे शक्य झाले. कला शाखेच्‍या निवडीचाही फायदा झाल्‍याचे तिने नमूद केले. विशेष म्हणजे मुख्य परीक्षा आणि मुलाखतीची तयारी कशा प्रकारे करावी, कोणती पुस्तके अभ्यासावीत, याबाबत पुण्यातील जवाद काझी यांची खूप मोठी मदत झाली. नेमका अभ्यास कसा करायचा याबाबत जवाद काझी सरांकडून मार्गदर्शन मिळाले. आपल्या यशात आई, वडील, भाऊ आणि जवाद काझी यांचा मोठा वाटा असल्याचे माधुरी अभिमानाने सांगते.

स्‍पर्धा परीक्षांच्‍या तयारीकरिता आई-वडिलांचे पाठबळ फार मोलाचे ठरले. आजवरच्‍या प्रवासात नवी सांगवी (पिंपरी चिंचवड)तील मार इव्हानीएस शाळेतील जीवन महत्त्वपूर्ण होते. या कालावधीत व्यक्‍तिमत्त्व विकास घडल्‍याचे माधुरीने सांगितले. जिद्द, परिश्रम, चिकाटी व अभ्यासातील सातत्यामुळे यश गाठता आले. स्पर्धा परिक्षेसाठी सातत्य आणि जिद्द कायम ठेवल्यास यश नक्कीच मिळते. आई बाबांनी गेल्या दोन वर्षात एकही काम सांगितले नाही, इतका पाठिंबा दर्शवला. मी शिकून मोठ्या पदावर काम करावे, अशी माझ्या आई-बाबांची तीव्र इच्छा होती. आज ती पूर्ण झाल्याने, भरपूर आनंद झाला आहे.

अभ्यासात सातत्य ठेवून, नियोजन केल्यास केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवता येईल. त्यासाठी आपले छंद सोडण्याची आवश्यकता नाही. आपला भरतनाट्यम आणि झुंबा डान्स, वाचनाचा छंद जोपासत अभ्यास केला. या अभ्यासादरम्यान आत्मचरित्रे खूप वाचली. सचिन तेंडुलकर, मिशेल ओबामा, इंद्रा नुयी, बेंजामिन फ्रॅंकलिन, हिटलर, महात्मा गांधी अशा थोरा मोठ्यांची आत्मचरित्रे वाचली. मोठ्यांकडून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकतो. त्यांचं ऐकलं तर आयुष्यात खूप पुढे जाता येते, असे माधुरी सांगते.
सोशल मीडियाचा अगदी कामापूरता वापर केला. एकटीच दिल्लीत असल्याने आई वडिलांशी बोलण्यासाठी व्हाट्सएप सुरू ठेवले होते. फेसबुक मात्र तीन वर्षे बंद ठेवले. कारण फेसबुकवरील काही गोष्टींचा मनावर विपरीत परिणाम होऊन अभ्यासपासून लक्ष विचलित होऊ शकते. बाकी सोशल मीडियापासून दूर राहणेच पसंद करते. तरूणाईने गरजेपुरता सोशल मीडियाचा वापर केल्यास उर्वरित वेळ सत्कारणी लागेल, असेही माधुरीने सांगितले.

बेलसर गावचे माजी सैनिक स्व. मारुती यशवंतराव गरुड उर्फ अप्पा यांचे चिरंजीव भानुदास मारुतीराव गरुड – सेवानिवृत्त सेल टॅक्स ऑफिसर यांची कन्या माधुरी ही यूपीएससी सीएसई 2020 परीक्षेत 561 रँकमध्ये उत्तीर्ण झाली आहे. माधुरीने मिळविलेल्या यशाचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष व वृक्षमित्र अरुण पवार माजी उपसभापती राजू लोखंडे, अखिल वारकरी महामंडळाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजयआण्णा जगताप, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र टेंबे यांनी कौतुक करीत अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

72 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!