Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : मुंबई पोलीस आयुक्तांनी टेलिव्हिजन क्षेत्रातील टीआरपी गैरव्यवहाराचा केला पर्दाफाश!

महाराष्ट्र 14 न्यूज : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून मुंबई पोलिस व सरकारविरुद्ध मोहीम राबवणार्‍या काही वृत्तवाहिन्या संशयाच्या भोवर्‍यात असताना गुरुवारी पोलिसांनी धक्कादायक टीआरपी गैरव्यवहार उघडकीस आणला आहे. ‘टीव्ही रेटिंग’चे सर्वेक्षण करणार्‍या कंपनीतील कर्मचार्‍याशी संगनमत करून व काही लोकांना पैसे देऊन टीआरपी वाढवण्यात येत होता. या प्रकरणी ’फक्त मराठी’ व ’बॉक्स सिनेमा’ या वाहिनीच्या मालकांना अटक करण्यात आली असून, रिपब्लिक वृत्तवाहिनीची चौकशी सुरू असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन टेलिव्हिजन क्षेत्रातील टीआरपी गैरव्यवहाराचा पर्दाफाश केला. ’बीएआरसी’ या संस्थेमार्फत कोणत्या वाहिन्यांची प्रेक्षकसंख्या किती आहे याची पाहणी करण्यात येते. प्रेक्षकसंख्येनुसार त्यांना जाहिराती मिळत असतात. वाहिन्यांच्या जाहिरात व्यवसायात दरवर्षी सुमारे तीस ते चाळीस हजार कोटी रुपयांची उलाढाल होते.

Google Ad

अधिक जाहिराती मिळवण्यासाठी काही वाहिन्यांनी गैरमार्गाचा अवलंब करून टीआरपीचे आकडे वाढवल्याची तक्रार आली होती. चौकशी केल्यानंतर यात तीन वाहिन्या सामील असल्याचे गुन्हे शाखेने केलेल्या तपासात उघड झाले असून, त्यात अर्णब गोस्वामी यांच्या ’रिपब्लिक टीव्ही’ या राष्ट्रीय इंग्रजी वृत्तवाहिनीचाही समावेश असल्याचा गौप्यस्फोट परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत केला.

पैसे देऊन वाढवला टीआरपी :-

वाहिन्यांची प्रेक्षकसंख्या ठरवण्यासाठी देशातील विविध शहरात व गावांमध्ये नमुना पाहणी करण्यात येते. पाहणी करण्यासाठी मुंबईतील 2 हजार घरांमध्ये ’बॅरोमीटर’ बसवण्यात आले होते. कुठे ’बॅरोमीटर’ बसवले आहेत याची माहिती गुप्त ठेवण्यात येते. ’बॅरोमीटर’ची देखभाल करण्याचे काम दिलेली ’हंसा’ या मुंबईतील कंपनीला देण्यात आले होते. तीन वाहिन्यांनी ’हंसा’ व तेथील काही कर्मचार्‍यांच्या मदतीने ’बॅरोमीटर’ बसवलेल्या घरातील लोकांना पैसे देऊन विशिष्ट वाहिन्या नेहमी सुरू ठेवण्यास सांगून आपली प्रेक्षकसंख्या अधिक असल्याचा आभास निर्माण केला.

तक्रार आल्यानंतर चौकशी केली असता यात तीन वाहिन्या सामील असल्याचे उघड झाले असल्याचे मुंबई आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितले. इंग्रजी येत नसतानाही पैसे मिळत असल्याने दिवसभर ही वृत्तवाहिनी सुरू ठेवली जात असे. बाहेर गेलात तरी हा टीव्ही बंद करू नका, असे यांना सांगण्यात आले होते व त्याच्या बदल्यात या कुटुंबांना दरमहा ठरावीक रक्कम देण्यात येत होती, हे तपासात पुढे आल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली.

टीआरपी रॅकेटमध्ये ’फक्त मराठी’ व ’बॉक्स सिनेमा’त दोन वाहिन्यांच्या मालकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या खात्यात जमा झालेली 20 लाखांची रक्कम व लॉकरमध्ये ठेवण्यात आलेली साडेआठ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीचीही चौकशी सुरू आहे.

या वाहिन्यांच्या संचालक व अन्य उच्चपदस्थांची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच, या वाहिन्यांना ज्यांनी जाहिराती दिल्या ते या टोळीमध्ये सहभागी होते की त्यांचीही फसवणूक झाली, याचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे परमबीर सिंग यांनी सांगितले. कोणीही कितीही मोठे लोक यात गुंतलेले असले, तरी त्यांची चौकशी करण्यात येईल, त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!