महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५फेब्रुवारी) : पुण्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं नसलं तरी राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे पुण्यातील वडगाव शेरी हा भाजपच बालेकिल्ला मानला जातो.
पण याच बालेकिल्ल्यातून राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीचं नारळ फोडलं आहे. वडगाव शेरीतील भाजप नगरसेविका शितल सावंत यांचे पती अजय सावंत यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी भाजपचे तब्बल 25 नगरसेवक राष्ट्रवादीत घेऊन येणार असल्याची घोषणा केली आहे. वडगाव शेरीनंतर चाकण येथील तीन नगरसेवकांनीदेखील भाजपचा सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं आहे.

त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळी आधीच राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षांतराच्या वेगवान निघालेल्या या गाडीला भाजप कसं रोखतं आणि प्रत्युत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे अजय सावंत यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे माजी खासदार संजय काकडे यांचे समर्थक म्हणून अजय सावंत यांना ओळखलं जातं. अजय सावंत यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी नगरसेविका शितल सावंत यादेखील लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वडगाव शेरीतल्या राजकारणाविषयी बोलायचं झालं तर या विधानसभा मतदारसंघात 18 नगरसेवक येतात. विशेष म्हणजे हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. पण राष्ट्रवादी काँग्रेसने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा झटका दिला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील टिंगरे निवडून आले.
त्यामुळे साहजिकच तिथली बरीचसी राजकीय खेळी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती आली. वडगाव शेरीत आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचाच असल्याने महापालिका निवडणुकीत त्या मतदारसंघात राष्ट्रवादीला चांगला फायदा मिळू शकतो. कारण आमदार सुनील टिंगरे देखील 25 नगरसेवकांना फोडायची भाषा करत आहेत. हा भाजपसाठी मोठा इशारा आहे.