महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ११ ऑगस्ट) : यंदा भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. या 75 वर्षानिमित्त म्हणजेच स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जात आहे.
देशात तसेच राज्यात ‘हर घर तिरंगा’ अभियानानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. आज (दि.११ ऑगस्ट) चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपल्या हातात तिरंगा घेऊन आपल्या भागातील नागरिकांनाही घरा घरात तिरंगा लावण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्या समवेत सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोनपे आणि परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासोबत तिरंग्यासह सेल्फी काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. आमदार जगताप देखील सर्वांच्या इच्छेला मान देत, प्रत्येकापाशी थांबत सेल्फी काढत होते. यावेळी प्रांगणातले सगळे वातावरण तिरंगामय झाले होते.
यावेळी बोलताना आमदार ‘लक्ष्मण जगताप’ म्हणाले, “स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “हर घर तिरंगा” उपक्रम राबविण्याचे ठरवले, शासनातर्फे हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येत आहे. तिरंगा राष्ट्राचा अभिमान व अस्मिता असून,अमृत महोत्सवी वर्ष ऐतिहासिक करण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी आपल्या भागात हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा आणि स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व अधोरेखित व्हावे यासाठी सर्व नागरिकांनी हर घर तिरंगा उपक्रमात उस्फूर्त सहभाग नोंदवावा व प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा, “तिरंगा माझा अभिमान” आहे. या अभियानात प्रत्येक भारतीयांनी मना पासून सहभागी व्हावे!.