Google Ad
Editor Choice Maharashtra Politics

Mumbai : राम मंदिराचं आज भूमिपूजन; शिवसेनेने व्यक्त केली ‘ही’ खंत !

महाराष्ट्र 14 न्यूज : आज अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार असतानाच शिवसेनेने त्यावर मनातील सल बोलून दाखवली आहे. ३० वर्षे राम मंदिराचा लढा सुरू होता. सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व प्रकरण तारखांच्या गुंत्यात अडकून पडले, पण न्या. रंजन गोगोई यांनी रामाला त्या गुंत्यातून बाहेर काढले व स्पष्ट निकाल राममंदिराच्या बाजूने दिला. ते न्यायामूर्ती रंजन गोगोई विशेष निमंत्रितांत कुठेतरी दिसायलाच हवे होते, पण रंजन गोगोई नाहीत आणि बाबरीची घुमटे पायापासून उद्ध्वस्त करणारी शिवसेनाही नाही. राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे श्रेय दुसऱ्या कुणाला मिळू नये यासाठी काय हा अट्टहास, अशी खंत व्यक्त करतानाच भूमिपूजनाचा सोहळा राष्ट्राचा व तमाम हिंदूंचा आहे. पण तो आता व्यक्ती-केंद्रित आणि राजकीय पक्ष-केंद्रित झाला आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

सगळ्यांच्या त्यागातून, संघर्षातून, रक्त आणि बलिदानातून आजचे राममंदिर उभे राहात आहे. पंतप्रधान राममंदिरासाठी पहिली कुदळ मारतील. त्या मातीत कारसेवकांच्या त्यागाचा गंध आहे हे विसरणारे रामद्रोहीच ठरतील. बाबरीच्या पतनाने संघर्ष संपला. राममंदिराच्या भूमिपूजनाने या प्रश्नाचे राजकारणही कायमचे संपावे. श्रीरामाचीही तीच इच्छा असेल! सारा देश आज एकसुरात गर्जत आहे, असं शिवसेनेने म्हटलं आहे. दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून शिवसेनेने ही सल बोलून दाखवली आहे.

Google Ad

डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी राममंदिराचे श्रेय पी. व्ही. नरसिंह राव व राजीव गांधी यांना दिलेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते राममंदिराचे श्रेय द्यायला तयार नाहीत, पण मोदी यांच्या काळातच न्यायालयाच्या गुंत्यातून राममंदिर सुटले व आजचा सुवर्णक्षण उगवला हे मान्य करावेच लागेल. तसे नसते तर राममंदिराच्या बाजूने निर्णय देणारे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे निवृत्तीनंतर लगेच राज्यसभेचे सदस्य झाले नसते. राममंदिर निर्माणासाठी अनेकांनी वेगवेगळय़ा प्रकारे किंमत मोजली आणि योगदान दिले ते असे. बाबरीचा ढाचा संपूर्ण जमीनदोस्त होताच उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचाच राजीनामा दिला. राममंदिरासाठी कल्याणसिंग यांनी आपल्या सरकारचाच त्याग केला. ते कल्याणसिंग आजच्या सुवर्ण सोहळ्याला मंचावर नाहीत, पण निमंत्रितांच्या यादीत तरी असावेत ही अपेक्षा.

राममंदिराच्या लढ्याने देशाला हिंदुत्वाचा खरा सूर सापडला व त्याच सुराचा धागा पकडत भाजप आणि शिवसेनेने राजकीय शिखर पार केले हे मान्य केले पाहिजे. लालकृष्ण आडवाणी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन प्रमुख नेत्यांनी हिंदुत्वाची ही ज्वाला पेटत ठेवली. देशातील बहुसंख्य हिंदूंच्या छातीवर पाय देऊन कुणाला राजकारण करता येणार नाही. निधर्मीपणाचे लक्षण म्हणजे फक्त एकाच धर्माचे लांगूलचालन नाही. हिंदू समाजाला त्यांच्या श्रद्धांशी तडजोड करता येणार नाही व त्यांच्या भावना लाथाडून पुढे जाता येणार नाही.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!