महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ऑगस्ट) : पुणे मेट्रोच्या ट्रायल रनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. त्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यावरुन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. त्यामुळे पुणे मेट्रोवरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचं बोललं जात आहे. श्रेयवादाचा कोणताही विषय नाही. काम पूर्ण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन होणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यामुळे फडणवीसांनी एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी केल्याची चर्चा सध्या पुण्यात सुरु आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवाजीनगर परिसरातील पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी सिव्हिल कोर्ट स्टेशन हे मल्टॉमॉडेल स्टेशनचं एक चांगलं उदाहरण असल्याचं फडणवीस म्हणाले. सगळ्या प्रकारचं काम इथं पाहायला मिळत आहे. अतिशय वेगानं महामेट्रोनं काम केलं आहे. मी महामेट्रोचं अभिनंदन करतो. 2016 ला मोदी सरकार आणि राज्य सरकारने या कामाला मंजुरी दिली होती. त्यानंतर वेगानं हे काम होत आहे. स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना इथं पाहायला मिळेल. कोरोनामुळे कदाचित थोडा उशीर होईल, अशी शक्यताही फडणवीसांनी व्यक्त केली आहे.

श्रेयवादाचा कोणताही विषय नाही. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या हस्ते ट्रायल रनचं उद्घाटन झालं. पण काम पूर्ण झाल्यावर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन होईल. त्याला कुणी विरोध करणार नाही, असा दावाही फडणवीसांनी केलाय. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा याला खूप विरोध होता. पण आता काम पुढे जात आहे. मेट्रोच्या पुढच्या कामांना केंद्राकडून लवकरात लवकर कशी मान्यता मिळेल, निधी मिळेल यासाठी नक्की प्रयत्न करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
9 Comments