महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३ ऑगस्ट) : अवैध व्यवसायाला अटकाव करण्याकरीता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नेहमी कारवाई केली जाते. अशीच कारवाई आज (दि.०३ ऑगस्ट) पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगररचना विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आली. या प्रकरणी एका सर्व्हेअरला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात तळमजल्यावर नगररचना विभागाचे कार्यालय आहे. त्याठिकाणी दुपारी पावणे दोनच्या सुमारास एसीबीचे पथक दाखल झाले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका सर्व्हेअरला ताब्यात घेतले आहे. संदिप लबडे असे लाच मागणाऱ्या सर्व्हेअर चे नाव आहे. त्याची बंद दाराआड चौकशी सुरू असून त्याने एकाकडे दोन लाख रुपयांची लाच मागितली असल्याचे समजते आहे.

लबडे यांच्याकडे पालिकेतील पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर आणि पिंपळे निलख ही गावे आहेत. पालिकेचा नगररचना विभाग यापूर्वी ही आशा कारवाईने गाजलेला आहे. या प्रकरणामुळे मुख्यालयातील अधिकारी आणि कर्मचा-यांचे धाबे दणाणले आहेत. एसीबीने ताब्यात घेतलेल्या सर्व्हेअरची चौकशी सुरू आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. त्यांनी एकाकडे दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची मागणी केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. पुढील तपास सुरू आहे.