महाराष्ट्र 14 न्यूज : दौंड तालुक्यातील राहू येथे आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे म्हशीची गर्भधारणा करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गर्भधारणा झालेल्या म्हशीला नुकतीच पारडे जन्माला आली आहेत. ही भारतातील पहिलीच घटना असून यासाठी असिस्टेड रिप्रॉडक्टीव्ह टेक्नॉलॉजीचा (एआरटी) वापर करण्यात आला.
पशुसंवर्धन क्षेत्रात काम करत असलेल्या देशातील एका सामाजिक संस्थेने हा प्रयोग राबविला. सध्या देशभरात या संस्थेच्यावतीने गाई आणि म्हशी प्रजनन विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दौंड तालुक्यातील राहू गावाजवळील सोनवणे बफेलो फार्ममधील चार म्हशींची आयव्हीएफ तंत्राच्या माध्यमातून गर्भधारणा करण्यात आली होती. या चार म्हशींनी मिळून चार पारडांना जन्म दिला आहे. यापैकी एका म्हशीला जुळे झाले आहे. म्हशीच्या नामांकीत जातीपैकी एक असलेल्या मुऱ्हा जातीच्या म्हशीला हे जुळे झाले आहे.

राष्ट्रीय गोकुळ योजनेंतेर्गत आयव्हीएफ तंत्राच्या माध्यमातून गाईंपासून वासरे जन्माला घालण्याचे काम ही संस्था पूर्वी करीत होती. आता असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने म्हशीचे पारडू जन्माला घालण्याचे काम संस्थेमार्फत सुरू करण्यात आले आहे. रेमंड समुहाच्या अख्त्यारितील जेकेबोवाजेनिक्स या संस्थेने हा प्रयोग सुरु केला आहे. यामुळे देशातील दूग्ध व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, भारतात गोठलेल्या आयव्हीएफ भ्रूणापासून वासरू जन्माला घालण्याचा पहिला प्रयोग ९ जानेवारी २०१७ मध्ये करण्यात आला होता. यामुळे भारतात दुभती जनावरे आणि म्हशी यांच्या जातींचे संवर्धन करून त्यांची पैदास मोठ्या प्रमाणात करण्याचे पूरक तंत्रज्ञान विकसीत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
56 Comments