महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २५ ऑगस्ट) : पावसाच्या साठलेल्या पाण्यामुळे शहरात डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. महिनाभरात पिंपरी चिंचवड शहरात अनेक जणांना मलेरिया; तर काही जणांना डेंगीची लागण झाली आहे. शिवाय महापालिकेच्या दवाखान्यात आणि रुग्णालयात मलेरियाचे संशयित रुग्ण आढळून आले असल्याचे दिसत आहे, तरीही पिंपरी चिंचवड आरोग्य विभाग सतर्क झाल्याचे दिसत नाही अशी बातमी (दि.२४ ऑगस्ट) रोजी महाराष्ट्र14 न्यूज ने प्रसिद्ध केली होती.
डासांची पैदास रोखण्यासाठी प्रयत्न महापालिकेकडून यापूर्वी डासांसाठी धुरीकरण केले जात होते; परंतु महापालिकेने जुलै महिन्याच्या सुरवातीला सर्वच आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याने कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसत आहे, काहीजण बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू झाले, तर काही भागाला अजूनही अधिकारी मिळाले नाहीत. महानगरपालिकेच्या या कारभाराचा समान्य नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब आरोग्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली, याची दखल घेत आज (२५ ऑगस्ट) नवी सांगवीच्या भागात धुरीकरण करणारे मशीन (फोगिंग मशीन ) घेऊन धुरीकरण करण्यात आले.