महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि. ०५ जानेवारी २०२१) : भारतीय लष्करामध्ये लेफ्टनंटपदी निवड झालेल्या रहाटणी येथील विश्वेश चव्हाणके याचा आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विश्वेशने प्राप्त केलेले यश सर्वांसाठी प्रेरणादायी असून शहराच्या नावलौकिकात भर घालणारे आहे. देशासाठी आपले योगदान देण्यासाठी विश्वेशने तरुण पिढीसमोर आदर्श उभा केला असून त्याच्या अतुलनीय यशाचा सार्थ अभिमान असल्याची भावना महापौर ढोरे यांनी यावेळी व्यक्त केली.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या या सत्कार सोहळ्यावेळी पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेता राजू मिसाळ, ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, नगरसदस्य शत्रुघ्न काटे, सविता खुळे, स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, उद्योजक संतोष जगताप आदी उपस्थित होते. या सर्वांनी विश्वेशला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
भारतीय लष्कराच्या एसएससी-टेक (५५) एन्ट्रीच्या गुणवत्ता यादीमध्ये संगणक अभियंता असलेल्या विश्वेशचा देशात ५ वा रँक आला असून पुढील प्रशिक्षणासाठी तो चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग अॅकॅडमी येथे जाणार आहे अशी माहिती विश्वेशचे वडील अविनाश चव्हाणके यांनी दिली.
99 Comments