महाराष्ट्र 14 न्यूज : पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी राकेश वाधवान याला करोनाची लागण झाल्याचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जे. जे रुग्णालय प्रशासनाला दिले. शुक्रवारी या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी झाली.
मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात कैद असलेल्या राकेश वाधवान यांना ही लागण झाल्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या ५ कैद्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. पीएमसी घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर. डी धानुका आणि व्ही. जी बिश्त यांच्या खंडपीठापुढे उच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली.त्यात त्यांनी जे.जे रुग्णालय प्रशासनाला राकेश वाधवान याचे सर्व वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय मनी लाॅंडरिंग प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या विशेष न्यायालयालासुद्धा वाधवानला खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास परवानगी द्यावी कि नाही याचा निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

राकेश वाधवानला करोनाची लागण झाल्याने उपचारासाठी जे. जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राकेश वाधवान ६५०० कोटी रुपयांच्या पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहे. मात्र वाधवान याने लीलावती किंवानानावटी रुग्णालयात उपचार घेण्यास परवानगी मागितली आहे. वाधवान सध्या मधुमेह, हायपरटेन्शन यासह विविध व्याधींनी त्रस्त आहे. त्यामुळे चांगल्या रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी मिळावी असे वाधवान याचे वकील अमित देसाई यांनी सांगितले.लॉकडाउनमध्ये वाधवान कुटुंबिय ५ गाड्यांमधून महाबळेश्वरला गेल्याने राज्यात वाद निर्माण झाला होता. पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असलेले वाधवान बंधू कुटुंबियांसह पाचगणीच्या एका हॉटेलमध्ये १४ दिवसांसाठी क्वारंटाइन होते. मात्र क्वारंटाइनचा कालावधी संपल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
97 Comments