Google Ad
Editor Choice Maharashtra

Thane : ठाणे महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल असलेल्या ७२ वर्षीय वृद्धाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या

महाराष्ट्र 14 न्यूज : ठाणे महानगरपालिकेच्या ग्लोबल हॉस्पिटलचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाणे महापालिकेच्या बाळकूम येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल असलेल्या ७२ वर्षीय वृद्धाने हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली आहे. आज दुपारी हा प्रकार घडला. त्यामुळे हॉस्पिटलच्या प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भिकाजी वाघुले असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. चार दिवसांपूर्वी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार देखील सुरु होते. मात्र आज दुपारी अचानक वाघुले यांनी खाली उडी मारून आत्महत्या केली. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वाघुले यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती देखील बरी होती. तसेच डॉक्टरांनी केलेल्या उपचारांना ते चांगला प्रतिसाद देखील देत होते. त्यांच्यावर जे उपचार सुरू होते त्यानुसार येत्या तीन ते चार दिवसात त्यांना डिस्चार्ज मिळाला असता. मात्र असे असताना त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.

Google Ad

वाघुले यांच्या आत्महत्येनंतर हॉस्पिटल प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. वाघुले यांनी आत्महत्या केली तेव्हा आयसीयुमध्ये कोणी उपस्थित नव्हते का? सुरक्षारक्षक कुठे गेले होते, असे अनेक प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहेत. ठाणे महापालिकेचे हे हॉस्पिटल अनेक कारणांनी आधीच वादग्रस्त ठरले असताना आता या प्रकारानंतर हॉस्पिटलच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या हॉस्पिटलमध्ये काही दिवसांपूर्वी मृतदेहांची अदलाबदल करण्यात आली होती. त्यामुळे विरोधी पक्षासह अनेकांनी हॉस्पिटल प्रशासनावर आणि महानगर पालिकेच्या कारभारावर टीका केली होती. त्यात आता हे दुसरे प्रकरण समोर आले आहे.

दरम्यान घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला असून ठाणे महापालिकेकडून अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.तर याप्रकरणी प्रशासनाची चूक असेल तर याबाबत कारवाई झाली पाहिजे आणि या सर्व प्रकरणात चौकशी झाली पाहिजे असे सेना नगरसेवक संजय भोईर यांनी सांगितले आहे.

Tags
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!