Google Ad
Editor Choice Pune District

Talegaon Dabhade : डॉ . संभाजी मलघे यांना निर्मलकुमार फडकुले साहित्य पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.११ जानेवारी ) : आज महाराष्ट्रातली जातीय स्थिती विदारक असून, जातीय कट्टरपणा वाढत चालला आहे. परस्परांबद्दल द्वेष निर्माण होत आहे. समाजात कायम अशांतता निर्माण होईल, अशा घटना घडणे राष्ट्रहितासाठी घातक आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी केले. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभा, पुणे आणि लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, विचारवंत आणि वक्ते स्व. डाॅ. निर्मलकुमार फडकुले यांचा स्मृतीदिन आणि पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कोतापल्ले बोलत होते. कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक गिरीष प्रभुणे यांना जीवनगाैरव पुरस्कार, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. संभाजी मलघे यांना ‘आचार्यदर्शन’ या ग्रंथासाठी आणि प्रा. जे.पी.देसाई यांना ‘माझी भाषणे, प्रसंग आणि आठवणी’ या ग्रंथासाठी साहित्य पुरस्कार, तर पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांना सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन इटकर, अध्यक्ष उद्धव कानडे, उपाध्यक्ष रवींद्र डोमाळे, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस आदी उपस्थित होते.

Google Ad

डॉ. कोतापल्ले यांनी पुढे सांगितले, देशातील प्रथा परंपरा पाहिल्या, तर लक्षात येते की फार चांगली परिस्थिती नाही. पूर्वी वेगवेगळ्या विचारधारांच्या चळवळी कार्यरत होत्या आणि प्रत्येकाला एकमेकांच्या चळवळीविषयी आदर होता. त्यात कडवेपणा नव्हता. मात्र, काळाच्या ओघात हा उदारपणा टिकून राहू शकला नाही. विविध जाती-धर्मातील विचारवंतांनी एकत्र येऊन विचारविनिमय केला पाहिजे. तरुणांनी साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रात पुढे आले पाहिजे, लिहिते झाले पाहिजे. डॉ. संभाजी मलघे यांच्यासारखे अभ्यासू लोक साहित्य क्षेत्रात पुढे येत आहेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. शेती सांभाळून आपला हा व्याप सांभाळत आहेत, असेेेही ते म्हणाले.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, समाजातील विचारवंतांनी देखील डावे-उजवे आदी सर्व भेद, भाव, व्देष, कल दूर सारून समान व्यासपीठावर एकत्र येऊन समाजाला एकसूत्रात बांधण्याचे काम केले पाहिजे. जे शिक्षण पोटाला भाकरी देऊ शकत नसेल, ते शिक्षण निरूपयोगी आहे. रोजगाराभिमुख शिक्षणाची गरज आहे.

सत्काराला उत्तर देताना डॉ. संभाजी मलघे म्हणाले, की साहित्य क्षेत्रामध्ये गरीब होतकरू मुले पुढे येत आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, अशा तरुणांना आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे. सोशल मीडियाचा प्रभाव असलेल्या पिढीला आचार्यदर्शन हे पुस्तक नक्कीच उपयोगी ठरेल. समाजात आदर्शवत काम करणाऱ्या व्यक्तींवर लेखन होण्याची गरज आहे.

गिरीष प्रभुणे म्हणाले की, पु.शि.रेगे, भालचंद्र नेमाडे, नागनाथ कोत्तापल्ले यासांरख्या साहित्यिकांचे विपूल साहित्य वाचनात आल्याने माझ्या दृष्टीकोनाला सामाजिक कंगोरे मिळाले. फडकुले यांनी या साहित्यिकांच्या केलेल्या रसग्रहणातूनच नेमके काय काम केले पाहिजे, याची बीजे रोवली गेली.
प्रा. जे.पी.देसाई आणि सुदाम भोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी, सूत्रसंचालन महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभेचे अध्यक्ष उद्धव कानडे यांनी, तर सचिन ईटकर यांनी आभार मानले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!