महाराष्ट्र 14 न्यूज : नि:स्वार्थ आणि निरपेक्ष समाजसेवा काय असते, याचा आदर्श मुंबईतील एका ५० वर्षीय महिलेनं घालून दिला आहे. रस्त्यावरील उघड्या मॅनहोलपासून लोकांना दूर ठेवण्यासाठी ही महिला तब्बल ७ तास पाण्यात उभी राहिल्याचं समोर आलं आहे. जिवाची पर्वा न करता तिनं दाखवलेल्या या प्रसंगावधानाबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कांता मारुती कलन असं या महिलेचं नाव आहे. फुलांच्या विक्रीचा व्यवसाय करणारी कांता माटुंगा स्थानकाच्या बाहेरच्या फूटपाथवरील झोपडीत अनेक वर्षांपासून राहते. मुंबईत ३ ऑगस्ट रोजी झालेल्या पावसात तुळसी पाईप रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले. त्या पाण्यातच कांतानं कशीबशी रात्र काढली. दुसऱ्या दिवशी सकाळीही परिस्थिती तीच होती. पाणी वाढतच होतं. रस्त्याच्या बाजूला पार्क करण्यात आलेल्या मोटारसायकली पाण्यात तरंगत होत्या. महापालिकेकडून या रस्त्यावरील पाण्याचा निचरा व्हावा यासाठी काहीच हालचाल न झाल्याने शेवटी कांताच पुढं सरसावली. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कपड्याची दोरी बनवून तिनं एका बाइकस्वाराच्या मदतीनं रस्त्यावरील मॅनहोलचे झाकण उघडले आणि पाण्याला वाट करून दिली.

मॅनहोलचे झाकण उघडल्यानंतरचा धोका तिच्या लगेचच लक्षात आला. त्यामुळं कुठलीही अनुचित घटना टाळण्यासाठी ती सहा वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत रस्त्यावर उभी राहिली आणि वाहनांना सुरक्षित वाट दाखवत राहिली. ती घरी परतली तेव्हा तिचा संसार वाहून गेला होता. मुलीच्या ऑनलाइन क्लाससाठी जमवलेले १० हजार रुपयेही वाहून गेले होते.तब्बल सात तास पाण्यात उभी राहल्यामुळं कांताला ताप भरला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांचीही बोलणी खावी लागली. ‘तुला झाकण कोणी उघडायला सांगितलं अशी विचारणा तिला करण्यात आली, असं तिनं सांगितलं. ‘पाण्याची पातळी सतत वाढत होती. महापालिकेचा कुणीही कर्मचारी तिथं आला नव्हता. त्यामुळं मॅनहोलचं झाकण उघडण्याशिवाय माझ्याकडं पर्याय नव्हता,’ असं ती म्हणाली.
ऑगस्ट २०१७ रोजी परळ येथील एका मॅनहोलमध्ये पडून मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. दोन दिवसांनंतर वरळी येथे त्यांचा मृतदेह आढळला होता. अशी कुठलीही घटना घडू नये असं कांताला वाटत होतं. त्यामुळं तिनं सर्व जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेऊन लोकांना मार्ग दाखवला.रस्त्यावर उभे राहून वाहन चालकांना दिशा दाखवतानाच कांताचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यामुळं ती अचानक प्रसिद्धिच्या झोतात आली आहे. तिनं दाखवलेलं सामाजिक भान व प्रसंगावधानाबद्दल पोलीस व स्थानिक लोक तिचं कौतुक करत आहेत. मात्र, कांताला तिच्या कुटुंबाची चिंता लागून राहिली आहे. दोन दिवसानंतर तिनं कसंबसं पत्र्याचं छत बांधून घेतलं आहे. पण जवळ पैसे नसल्यानं दोन मुलींच्या शिक्षणाचं काय होणार हा प्रश्न तिला भेडसावतो आहे.
1,664 Comments