Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कोरोनाच्या नावाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून तिप्पट दराने चादर, बेडशीट्सची खरेदी … आमदार ‘लक्ष्मण जगताप’यांनी हिवाळी अधिवेशनात सरकारला विचारला हा प्रश्न … मिळाले हे उत्तर…

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने कोविड केअर सेंटर, हॉस्पिटल आणि विलगीकरण केंद्रांसाठी चादर, उशी आणि बेडशीटची खरेदी थेट पद्धतीने करताना ठेकेदाराला तिप्पट दर देऊन महापालिकेचे ६० लाख रुपयांचे नुकसान केल्याची बाब आमदार लक्ष्मण जगताप यांनी हिवाळी अधिवेशनात अतारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. या प्रश्नाला लेखी उत्तर देताना नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेने संबंधित वस्तूंची बाजारभानुसारच खरेदी केल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच लॉकडाऊनमुळे व्यापारी व वाणिज्यिक आस्थापना बंद असतानाही पिंपरी-चिंचवड महापालिकेने चादर, उशी आणि बेडशीटची थेट पद्धतीने केलेली खरेदी करताना बाजारांतील दराची खातरजमा केल्याचेही मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर महापालिका प्रशासनाने केंद्र व राज्य सरकारची मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचनांनुसार शहरात कोविड सेंटर, हॉस्पिटल आणि विलगीकरण केंद्रे सुरू केली. कोविड केअर सेंटर, हॉस्पिटल आणि विलगीकरण केंद्रांसाठी महापालिकेच्या भांडार विभागामार्फत तब्बल ८० लाख ६१ हजार किंमतीचे सोलापुरी चादर, उशी आणि बेडशीट थेट पद्धतीने खरेदी करण्यात आले. प्रति सोलापुरी चादर ३७६ रुपये ९५ पैसे आणि प्रति बेडशीटसाठी ४२९ रुपये २० पैसे असा दर महापालिकेने मोजले. वास्तविक बाजारात सोलापुरी चादर ९० रुपयांपासून १३२ रुपयांपर्यंत आणि बेडशीट ७५ रुपयांपासून ११० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

Google Ad

परंतु, पिंपरी-चिंचवड महापालिकेने सोलापुरी चादर आणि बेडशीट तिप्पट दराने थेट पद्धतीने खरेदी केले आहेत. त्यामुळे महापालिकेला सोलापुरी चादर आणि बेडशीट पुरविलेल्या ठेकेदाराला ६० लाख रुपये जादा द्यावे लागले की नाही?, याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांनी हिवाळी अधिवेशनात अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता. बाजारात चादर, उशी, बेडशीट कमी रक्कमेत उपलब्ध असतानाही महापालिकेच्या भांडार विभागातील अधिकाऱ्यांनी संगनमत करून घाटकोपर येथील एका एजंटाला खरेदीची ऑर्डर दिली.

वास्तविक अशा वस्तूंची महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाकडून खरेदी करणे अपेक्षित असताना महापालिकेने तसे केले नाही. त्यामुळे महापालिकेचे ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याकडे आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले. याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका प्रशासनालाही लेखी निवेदन देऊन भांडार विभागाने थेट पद्धतीने केलेल्या खरेदीची दक्षता समितीमार्फत चौकशीची मागणी केली होती. या चौकशीत काय तथ्य आढळून आले आणि कोणती कारवाई केली?, असा सवाल देखील आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्य सरकारला अतारांकित प्रश्नाद्वारे विचारला होता.

आमदार जगताप यांच्या अतारांकित प्रश्नाला राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यामध्ये त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेने चादर, उशी आणि बेडशीट बाजारभावानुसारच खरेदी केल्याचे कळविले असल्याचे म्हटले आहे. कोविड केअर सेंटर, हॉस्पिटल आणि विलगीकरण कक्षासाठी चादर व बेडशीट यांची तातडीने आवश्यकता होती. संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने व्यापारी व वाणिज्यिक आस्थापना सर्वत्र बंद होत्या. राज्याचा उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय व खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीच्या नियम पुस्तिकेमध्ये अनर्थकारक घटना, नैसर्गिक आपत्ती किंवा साथीच्या रोगामुळे खरेदीविषयीची तातडीने गरज असते आणि खरेदीच्या अन्य कोणत्याही पद्धतीचा अवलंब करणे व्यवहार्य नसते अशावेळी एकलस्त्रोत पद्धतीने खरेदी करावी, अशी तरतूद आहे.

त्याचा आधार घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपत्कालिन परिस्थितीत महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाकडून खरेदी करावयाच्या वस्तूंसाठी ठरविलेल्या दरपत्रकानुसार प्रति नग ४२९.२० रुपये दराने दहा हजार बेडशीट्स आणि प्रति नग ३७६.७५ रुपये दराने दहा हजार सोलापुरी चादरी खरेदी केल्या आहेत. त्यापोटी ८० लाख ६१ हजार ५०० रुपये खर्च केले आहेत. महापालिकेने बाजारातील दरांबाबत खातरजमा करूनच या वस्तूंची खरेदी केल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!