Google Ad
Articles Editor Choice

कोव्हिड : ‘ माझ्या घरातली 6 माणसं एकदम गेली , मला विचारा कोरोना किती भयानक आहे ते ‘

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ऑगस्ट) : लॉकडाऊनचे निर्बंध उठलेत, रस्त्यावर गर्दी दिसायला लागलीये, सणासुदीचे दिवस असल्यामुळे आता लोकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. चार महिन्यांपूर्वी अख्या देशाला दाहीदिशा भटकायला लावणाऱ्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भर ओसरलाय. पण त्या काळात काहींचं आयुष्य बदललं ते कायमचंच.

कोरोना व्हायरसची दुसरी लाट, पहिल्या लाटेपेक्षा भयंकर होती. प्रत्येकाने आपल्या माहितीतलं, आप्तांपैकी कोणीतरी गमावलं. एक वेळ होती, जेव्हा ऑक्सिजन, औषधं, बेड काहीच मिळत नव्हतं. लोकांनी हॉस्पिटलच्या बाहेर बेडची वाट पाहात शेवटचा श्वास घेतला.
आता वरकरणी परिस्थिती सामान्य वाटत असली तरी ज्यांच्या आप्तांचे, जिवलगांचे मृत्यू या आजाराने झालेत, त्यांच्या आयुष्यातली पोकळी कहीही भरून निघणार नाही.
जळगाव जिल्ह्यातल्या सावदा गावातली आकांक्षा त्यातलीच एक. गेल्या मार्च महिन्यात तिच्या घरात एक नाही, दोन नाही, तब्बल सहा जणांचे मृत्यू झाले.

Google Ad

तिचे आईवडील, काका-काकू आणि आणखी एक काका कोव्हिड-19 ने गेले तर घरात झालेल्या मृत्यूंच्या धसक्याने तिच्या वृद्ध आजीचा मृत्यू झाला.
एकेकाळी भरलेलं असणारं त्यांचं घर आता अगदीच रिकामं रिकामं झालंय.
“आमची जॉईंट फॅमिली होती. सतत माणसं आजूबाजूला असायची. आता घरात खूप एकटेपणा जाणवतो,” ती म्हणते.
आकांक्षाला बॉक्सर बनायचं होतं आणि त्यासाठी तिच्या आईवडिलांनी तिला सतत पाठिंबा दिला. मोठं होतं असताना वडिलांनी कधी भाऊ आणि माझ्यात फरक केला नाही असं ती सांगते.

“पपांचं असं होतं ना, की तू कर काहीतरी फक्त. तुला जे वाटेल ते मी आणून देईन,” आकांक्षा मोठ्या प्रयत्नांनी आपला हुंदका दाबते.
तिला तिच्या वडिलांचा एक किस्सा आठवतो. बॉक्सिंगची प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा आकांक्षाला एक पंचिग बॅग हवी होती. “पप्पांनी एका रात्रीतून मला बॅग आणून दिली. लॉकडाऊनच्या काळात मी जळगावहून घरी आले तेव्हा माझी प्रॅक्टिस बंद पडली. सावद्यात करण्यासारखं काही नव्हतं. त्यामुळ पपांनी माझ्यासाठी घराच्या गच्चीवरच संपूर्ण जीम सुरू करायचं ठरवलं.”
आजही आकांक्षाच्या घराच्या गच्चीवर या जिमचं सामान पडलेलं दिसतं. कुठे अर्धवट ठोकलेले रॉड दिसतात. हे जिम पूर्ण व्हायच्या आधी तिचे वडील हे जग सोडून गेले.
आता पुढे काय करशील म्हटल्यावर या 20 वर्षांच्या मुलीच्या डोळ्यात निश्चय दिसतो.

“माझ्या आई वडिलांनी खूप गरिबीत दिवस काढले. पप्पा लहान असताना गिरणीतलं उरलेलं पीठ गोळा करून आणायचे आणि त्याच्या रोटी बनवून खायचे. इतके वाईट दिवस आमच्यावर आले नाहीयेत. आमचे आईवडिल तेवढं आमच्यासाठी करून गेले की आमचे खाण्यापिण्याचे हाल नाहीयेत. याच गोष्टीला आम्हाला पुढे घेऊन जायचंय. काहीतरी करून दाखवायचं आहे की कोणाला वाटायला नको की यांचे आईवडील नव्हते तर यांनी मुलांनी काही केलं नाही.”
पण आपण जे करू ते पाहायला आता वडील नाहीत या विचाराने ती निशब्द होते.
कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेत काळाची चाहुल अनेक घरांना लागली होती. या घरात सहा मुलं अनाथ झालीयेत. त्यांना आता आयुष्यात स्वतःचा रस्ता स्वतः शोधायचा आहे, तेही आईवडिलांचं डोक्यावर छत्र नसताना.
आकांक्षाचे मोठे काका संतोष सिंह परदेशी सहा भावांपैकी एकटेच उरलेत. त्यांच्या दोन भावांचा आधीच मृत्यू झाला तर तीन भावांना डोळ्यादेखत कोव्हीडने ओढून नेलं.
वयाच्या साठीत, जेव्हा माणसं निवृत्त होतात तेव्हा त्यांच्यावर नव्याने जबाबदरी आलीय. जबाबदारीपेक्षा ते दुःखानेच थकलेले दिसतात.

त्याला कारणही तसंच आहे. संतोष सिंह आणि त्यांच्या भावंडांचे वडीलही ते लहान असतानाच गेले.
“खूप वाईट दिवस पाहिले आम्ही. कधी कधी दोन वेळा जेवायला मिळेल की नाही याची भ्रांत असायची. माझे मोठे भाऊ काम करत होते, आई राबत होती. तरी अशी परिस्थिती होती. खूप कष्टातून सगळे वर आलो. आता जरा स्थिरसावर झालो, प्रत्येक जण खाऊनपिऊन सुखी होता तर आता आमच्याच घरातल्या पुढच्या पिढीवर अशी वेळ आली. जसं आम्ही अनाथ झालो होते, तसे तेही अनाथ झाले. आम्हाला तरी आई होती. त्यांना तर आता कोणीच नाही ना,” ते हुंदके देऊन रडायला लागतात.

आपण धीर सोडला तर घरातली मुलं कोणाकडे पाहाणार या विचाराने ते स्वतःला आवर घालतात खरा पण मुलांच्या आयुष्यात पुढे वाढून ठेवलेल्या दुःखाची जाणीव त्यांना आहे कारण त्यांनी स्वतः लहान असताना ते दुःख भोगलं आहे.
“त्यांना तर आईही नाही आणि वडीलही. दुःख तर आयुष्यात त्यांना फार झेलायचं आहे,” ते तुटक-तुटक बोलतात.
चार महिने उलटून गेल्यानंतरही या घरावर दाटलेलं मळभ दूर होताना दिसत नाही. घरात लहान मुलं इकडून तिकडे उड्या मारत खेळत असतात.

घर खूप भकास झालेलं होतं. त्यामुळे मोठ्या काकांच्या मुलींच्या चिल्ल्यापिल्ल्यांना बोलवून घेतलं असं आकांक्षा सांगते. तेवढंच घरच्यांचं मन लागतं.
परदेशी कुटुंब तसं देवभोळं आहे. पूजाअर्चा, देवधर्म सगळं साग्रसंगीत होत असतं त्यांच्याकडे. गेल्या लॉकडाऊनमध्ये जे मजूर परत जात होते, त्यांना महिनाभर या कुटुंबाने जेवण दिलं. देवधर्म करून, कोव्हिडचे सगळे नियम पाळूनही आपल्या घरात असं का झालं या प्रश्नांचं उत्तर त्यांना सापडत नाही.

“मागच्या लॉकडाऊनला मुलगा अगदी भुसावळपर्यंत अन्नदान करायला जायचा. तरी आपल्याच घरात असं झालं. नशिबाशिवाय दुसरं काय म्हणायचं,” संतोष सिंह म्हणतात.
जेव्हा बेड मिळायची मारामार होती तेव्हा परदेशी कुटुंबातल्या पाचही जणांना कुठल्या ना कुठल्या दवाखान्यात बेड मिळाले. वेळेत उपचार देण्याचा पूर्ण प्रयत्न झाला तरीही कुटुंबातला एकही सदस्य एकदा दवाखान्यात गेला तो घरी परत आलाच नाही याचा सल त्यांच्या मनात बोचतोय.

“एकही माणूस परत आलं नाही. कुठे काय चुकलं कोणालाच माहिती नाही. पण पर्यायाने सगळं केलं. डॉक्टरांनीही त्यांच्या हिशोबाने केलं. पण आता काय प्रॉब्लेम आला आता हे आपणही सांगू शकत नाही ना. का डॉक्टरांनी चुकीचं औषध दिलं. तेव्हा नकली औषधं तर चालूच होती. आपण त्याबद्दल तर काहीच सांगू शकत नाही. पण दवाखान्यात असताना अशी घटना घडली म्हणून जास्त वाईट वाटतं. एखादेवेळी घरी असताना असं झालं तर आपण म्हटलो असतो की आपण दुर्लक्ष केलं पण तसं काहीच झालं नाही. कोणीही घरी जिवंत परत आलं नाही. उलट आमची शेवटी सुनबाई होती तिची 100 टक्के गॅरेंटी होती की तरी परत येईल, पण तीही परत येऊ शकली नाही,” ते बोलता बोलता पुन्हा स्तब्ध होतात.
आईवडील नाहीत म्हणून आकांक्षाचं आयुष्य अवघड झालंय. लहान वयातच तिच्यावर तिच्यापेक्षा लहान असणाऱ्या बहिण-भावाची जबाबदारी आलीये.

“आईपपा नसले की कळतं की ते आपल्यासाठी किती आणि काय काय करत असतात. तेही कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नसताना. आईवडिलांच्या निस्वार्थ प्रेमाची जागा आपल्या आयुष्यात कोणीच घेऊ शकत नाही आणि त्यांची कमतरता भरून निघू शकत नाही,” ती म्हणते.

आकांक्षाने आता आपलं बॉक्सर व्हायचं स्वप्न बाजूला ठेवलं आहे आणि तिला लवकरात लवकर नोकरी मिळवायची आहे.
आता इतक्या जणांचं झालंय. तर भार खूप जास्तच आलाच एकाच माणसाच्या अंगावर. कारण तेच आहेत आता आम्हाला सपोर्टर. माझे मोठे पप्पा. बाकी कुणीच नाहीये आम्हाला. तर त्याच्या खांद्यावरच बोझ थोडं कमी झालं पाहिजे,” ती म्हणते.
दुसऱ्या लाटेचे भयावह परिणाम ओसरत असले तरी तिसऱ्या लाटेचा इशारा सगळेच तज्ज्ञ देत आहेत. अशातही जे लोक अजूनही या आजाराला गंभीरपण घेत नाहीत त्यांच्यासाठी आकांक्षाचं एकच सांगणं आहे…

“ज्याच्यावर वेळ येते त्यालाच कळत. ज्याच्या घरातली माणसं जातात त्याला विचारा दुःख काय आहे ते. आमच्या घरात पाच माणसं एकदम गेली, आम्हाला विचारा हा आजार किती भयानक आहे. आमच्यावर जी वेळ आली ती दुश्मनावरही न येवो. काळजी घेणं तुमच्या हातात आहे.”

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!