महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० जुलै) : लातूर जिल्ह्यातील सारसा या गावातील श्री.गोपाळराव बापूराव पवार यांचा मुलगा श्री.विजय गोपाळराव पवार लिखित ‘बाराखडी उद्योजकतेची’ या पुस्तकाचे प्रकाशन दि.१७ जुलै २०२२ रोजी पुण्यात अतिशय जल्लोषात पार पडले.
उद्योग व्यवसाय करायचा तर नेमका कोणता व्यवसाय करायचा ? कोणत्या मुद्द्याच्या आधारे व्यवसायाची निवड करावी ?
उद्योग व्यवसाय म्हणजे काय ? स्टार्टअप्स आणि पारंपरिक उद्योग व्यवसाय यात फरक कोणता ? उद्योग व्यवसाय उभारणी करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या ? भांडवल उभारणीचे मार्ग कोणते ? उद्योग व्यवसायाच्या नाव,लोगो ची निवड करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या ? आपल्या व्यवसायाचा ब्रँड कसा बनवावा ? व्यवसाय करताना आर्थिक शहाणपणा कसा असावा ? व्यवसायातील भागिदारी , व्यवसाय व्यवस्थापन, येणाऱ्या अडचणी त्यावरील मार्ग इ. उद्योजकतेशी निगडीत सर्वसमावेशक प्रत्येक गोष्टींची माहिती सहजसोप्या भाषेत देणारं आणि प्रत्येक संकल्पना दैनंदिन जीवनातील उदाहरणासह स्पष्ट करणारं व्यवसायाची ब्लूप्रिंट असणारं ‘#बाराखडी_उद्योजकतेची‘ हे पुस्तक समीक्षकांनी अतिशय गौरवलं आहे.

दहावी पर्यंत लातूर मध्ये शिक्षण घेऊन , इंजिनिअरिंग पुर्ण झाल्यानंतर नोकरी करण्यासाठी पुण्यात गेलेल्या विजय पवार यांनी नोकरी सोडून व्यवसायाची कास धरली. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातून येऊन पुण्यासारख्या ठिकाणी कोणाचाही आधार नसताना त्यांनी व्यवसायात जम बसवला. विजय पवार यांची ‘द सर्विस कॅफे प्रॉपर्टी केअर सोल्युशन्स’ या नावाने पुण्यात ऑन डिमांड क्लिनींग सर्विसेस पुरवणारी कंपनी आहे. मागील सात वर्षांत त्यांनी ५०००+ पेक्षा जास्त ग्राहकांना सेवा पुरवली आहे. व्यवसायातील या अनुभवाच्या जोरावरच त्यांनी व्यवसायात येणाऱ्या प्रत्येकासाठी सदरील पुस्तक लिहीले आहे. सदर पुस्तकात व्यवसायाशी निगडित प्रत्येक संकल्पनेचं अतिशय सोप्या आणि सहज भाषेत दैनंदिन जीवनातील उदाहरणासह विवेचन केले आहे. उद्योग व्यवसाय करणाऱ्या, करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाच्या संग्रही असे पुस्तक असावे. प्रकाशन सोहळ्यात पुण्यातील प्रथितयश उद्योजक मा.राजेश मंडलिक , मा.मनोज गायकवाड, मा.सतिश पवार, मा.अभिजित घाटगे,मा.तुषार रंजनकर सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लेखक विजय पवार यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून सद्गुरू सेवा प्रतिष्ठान तर्फे त्यांच्या आईवडिलांचा (श्री.गोपाळराव पवार आणि सौ.दैवशाला पवार ) सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित श्रोत्यांना उद्योजकते बद्दल मोलाचं मार्गदर्शन केले. सदर पुस्तक हे नव उद्योजक आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी एक महत्त्वाचा मार्गदर्शक म्हणून काम करेल अशी भावना प्रकाशक रुद्र एंटरप्राइजेसचे श्री.नवनाथजी जगताप यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शशिकांत वाघे यांनी अतिशय खुमासदार पद्धतीने केले.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी सबंध महाराष्ट्र भरातून लेखक विजय पवार यांचे चाहते आणि मित्रपरिवार यांनी उपस्थिती लावली होती. लातूरमधील एका खेडेगावातून पुण्यासारख्या शहरात व्यवसायात पाय रोवणार्या आणि गरजूंना मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या लेखकाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.