Categories: Uncategorized

४ वर्षांनं प्रशासकीय राजवट संपुष्टात.! पिंपरी चिंचवड’च्या महापौर पदी रवी लांडगे तर उपमहापौर पदी शर्मिला बाबर…

*पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर पदी रवि लांडगे तर उपमहापौर पदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड*

*सभागृह नेतेपदी प्रशांत शितोळे तर विरोधी पक्षनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची करण्यात आली नियुक्ती*

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण; २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत सर्वसाधारण सभा तहकूब*

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. ६ फेब्रुवारी २०२६ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. यासाठी विशेष सभा पिठासीन अधिकारी तथा सहकार आयुक्त दिपक तावरे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. यावेळी महापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाचे रवि लक्ष्मण लांडगे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची महापौर पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैशाली जालिंदर काळभोर आणि भारतीय जनता पक्षाच्या शर्मिला राजू बाबर यांचा प्रत्येकी १ असे एकूण २ अर्ज प्राप्त झाले होते. यावेळी अर्ज माघारीसाठी देण्यात आलेल्या विहीत वेळेत वैशाली काळभोर यांनी अर्ज माघारी घेतल्याने शर्मिला बाबर यांची बिनविरोध उपमहापौर पदी निवड करण्यात आली. तसेच सभागृह नेतेपदी प्रशांत शितोळे आणि विरोधी पक्षनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पिठासीन अधिकारी दिपक तावरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेची विशेष सभा आज पार पडली. नगरसचिव मुकेश कोळप यांनी सुरूवातीस सभेच्या कामकाजाबाबत माहिती दिली. त्यानंतर महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.

*महापौर व उपमहापौर पदाचा स्विकारला पदभार*

महापौर रवि लांडगे व उपमहापौर शर्मिला बाबर यांची निवड झाल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी आमदार शंकर जगताप, महेश लांडगे,उमा खापरे, अमित गोरखे यांनी शहरवासीयांच्या वतीने, तर महापालिका प्रशासनाच्या वतीने पिठासीन अधिकारी तथा सहकार आयुक्त दिपक तावरे व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी नवनिर्वाचित नगरसदस्य, नगरसदस्या यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप, सह आयुक्त मनोज लोणकर, उप आयुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड तसेच विविध विभागांचे अधिकारी, शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेला सुरूवात झाली.

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण*

यावेळी सर्वसाधारण सभेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर तसेच सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर नगरसदस्य शत्रुघ्न काटे यांनी महापालिकेची सर्वसाधारण सभा २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत स्थगित करण्याबाबत सूचना मांडली. या सूचनेला नगरसदस्य राजू मिसाळ यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर महापौर रवि लांडगे यांनी सर्वसाधारण सभा २० फेब्रुवारी २०२६, दुपारी १ वाजेपर्यंत तहकूब केली.

*अण्णासाहेब मगर यांना अभिवादन*

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील प्रांगणात असलेल्या दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास महापौर रवि लांडगे व उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शहरातील विविध ठिकाणी असणाऱ्या महापुरूषांच्या पुतळ्यांस देखील त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
…..

Maharashtra14 News

Recent Posts

सर्वसामान्यांना महागाईत मोठा दिलासा …! १ एप्रिलपासून वीज दरात कपात, प्रति युनिटमागे किती रुपये द्यावे लागणार?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मार्च : सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी नवीन आर्थिक…

2 days ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिला नगरसदस्यांच्या उपस्थितीत शहरातील उत्कृष्ट महिला बचत गटांचा विशेष सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, १७ मार्च २०२६ :-* महिलांचे योगदान समाजासाठी खूप मोठे आहे. एक महिला…

2 weeks ago

अखेर पिंपरी चिंचवडला मिळाले पुण॔वेळ आयुक्त … डॉ. विजय सूर्यवंशी महापालिकेचे नवे आयुक्त

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.११ मार्च : राज्यात आज बुधवारी पुन्हा एकदा बड्या आयएएस अधिकाऱ्याची महत्वाच्या…

3 weeks ago

उपमहापौर शर्मिला बाबर यांनी डेडहाऊस सह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट देत आरोग्य सेवांचा घेतला आढावा…

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १२ मार्च २०२६:* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी…

3 weeks ago

एनसीएल पाषाण उपकेंद्र ते औध कर्मचारी वसाहतीपर्यंत २.५ किमी उच्च क्षमतेच्या नवीन वीज वाहिनीमुळे नागरिकांची वीज समस्येची चिंता दूर होणार-आमदार जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी (प्रतिनिधी) : चिंचवड मतदारसंघात येणाऱ्या जुनी सांगवी परिसरातील वारंवार खंडित…

1 month ago

महाराष्ट्रात ‘NA’ ची गुंत्यातून कायमची मुक्तता; आता जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही..वाचा सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी : राज्यात कृषी क्षेत्र अकृषक करताना एन. ए. परवानगीची अट…

2 months ago