Google Ad
Uncategorized

विजय शिवतारे यांना टार्गेट करत त्यांच्याच कार्यकर्त्याने लिहिले हे पत्र …या पत्रात काय म्हटलंय? वाचा जसंच्या तसं….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ३१ मार्च) : बारामती मतदारसंघात मागील काही काळात निनावी पत्रातून एकमेकांना टार्गेट करण्यात येत आहे. ही पत्र कोण व्हायरल करतं याचा थांगपत्ता नाही. मात्र या व्हायरल पत्राने बारामतीच्या राजकारणात वेगळाच प्रचार दिसून येतो. आता आणखी एक निनावी पत्र व्हायरल झालंय त्यात विजय शिवतारे यांना टार्गेट करण्यात आले आहे. शिवतारेंच्या कार्यकर्त्याने हे पत्र त्यांना लिहिल्याचं दिसतं. मात्र त्यावर कुणाचेही थेट नाव नाही.

या पत्रात काय म्हटलंय? वाचा जसंच्या तसं….

Google Ad

प्रति,
पुरंदरचा तह…

श्री. विजय बापू शिवतारे, शिवसेना नेते, पुरंदर

स.न.वि.वि. बापू, १३ मार्च २०२४ रोजी तुम्ही बंडाची भूमिका घेवून बारामती लोकसभेची निवडणूक ‘अपक्ष’ लढवण्याचा निर्धार केला. त्यानंतर मिडीयाने तुम्हाला अगदी डोक्यावर घेतलं. दर अर्ध्या तासाच्या बुलेटीनला ‘तुमची’ स्फोटक विधाने गाजू लागली. चॅनेल कुठलंही लावा दिसणार फक्त ‘शिवतारे बापू’ हे ठरलेलं. त्यानंतर तुम्ही जेजुरीच्या खंडोबाच्या साक्षीने ‘एल्गार’ पुकारला. पुढे तुमचे दौरे, भेटीगाठी, पत्रकार परिषद गाजू लागल्या. तुम्ही सुद्धा अगदी ‘राणा भीमदेवी’ थाटाने बोलत राहिलात. आरोप, टीका-टिप्पणी करू लागलात. ‘काहीही झालं तरी आता माघार नाही’, ‘बारामती कोणाची जाहागिरी नाही’ यासह तुमची अनेक विधाने गाजली. तुम्हाला समर्थक मिळाले. माय-बाप जनता, पदाधिकारी कार्यकर्ते यांची ‘वज्रमूठ’ तुम्ही उभी केली. प्रसंगी शिवसेनेचा ‘राजीनामा’ देवू. पण, आता निर्णय घेतलाय, हि तुमची भूमिका अवघ्या महाराष्ट्रात गाजली. घोडा-मैदान जवळ आलं असताना बापू, तुम्ही ३० मार्च २०२४ रोजी अचानक माघार घेतली आणि आमचीही मोठी अडचण झाली.

अजित पवारांची गुर्मी तशीच आहे. ते उर्मट आहेत. पण, अजित पवारांना तो पश्चात्तापही नाही. जणू काही लोकांना फसवणे हा त्यांचा जन्मजात अधिकार असल्या सारखे ते वागत आहेत. इथून मतदान घेऊन त्या जोरावर राज्यात, देशात ब्लॅकमेलिंग केलं जात आहे. हा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केला आहे. या पापाचं परिमार्जन आम्हा मतदारांनाच करावं लागेल. या रामायणातला रावणाच्या विरोधात लढणारा रामाच्या बरोबर असणारा बिभीषण विजय शिवतारे आहे, अशीही टीका बापू तुम्हीचं केली होती. मात्र, आज तुम्हाला अजित पवारांचा काय साक्षात्कार झाला आहे? आता तुम्ही रामायणातले बिभिषण आहात की नाही? हेही आम्हाला कळू द्या. बापू, पवारांच्या विरोधातल्या ५ लाख ८० हजार मतदारांनी आता नेमकं काय करायचं? आता तुम्हाला अजित पवार उर्मट व नालायक वाटत नाहीत का? तुमच्याचं भाषेत त्यांची गुर्मी आणि माज उतरला आहे का? सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी आहेत, म्हणून आम्ही त्यांना मतदान द्यायचं का? त्यांचं कॉलिफिकेशन काय? असा प्रश्न तुम्हीचं उपस्थित केला होता. मग आता आम्ही मतदार म्हणून सुनेत्रा वहिनींना मतदान कारायचं का आणि कशासाठी? यावरही बापू तुम्हीचं अधिकारवाणीने प्रकाश टाकला तर बरं होईल.

बापू, मी तुमचा कट्टर समर्थक आहे. तुमच्या राजकीय प्रवासात कायम तुमच्या पाठीशी उभा असतो आणि राहीन सुध्दा. तुम्ही म्हणाल तसं आजपर्यंत करीत आलो आहे. २०१९ ला सुध्दा अजित पवार यांच्या समर्थकांशी तुमच्यामुळे भांडलो आहे. कारण, तुम्ही माझे नेते आहात. पण, काल माझा नेता असा संधीसाधू, लेचापेचा, छक्के पंजे करणारा आणि पोटात एक आणि ओठात एक असणारा निघाला, याचं फार वाईट वाटलं. बापू, ज्या मिडीयाने तुम्हाला डोक्यावर घेतलं, त्याचं मिडीयाने तुमची लया फार घालवून टाकलं. सोशल मिडीयात तर तुम्हाला ‘महाराष्ट्राचा पलटूराम’ म्हणून ‘हॅशटॅग’ फिरवला जात आहे. ‘पुरंदरचा मांडवली सम्राट’,’पाकीट भेटलं का?’, ‘घुमजाव’, ‘शिवतारे जमी पर’, ‘चिऊतारे’, ‘शेवटी, आपला आवाका दाखविला’, ‘५० खोके शिवतारे ओके’, अशा खोचक कंमेंटचा सोशल मिडीयात मुसळधार पाऊस पडतो आहे.

अजित पवारला माझा आवाका कळेल? म्हणणारे तुम्ही आवाका दाखविण्याच्या आधीच ‘शेपूट’ घातलंत. मुख्यमंत्र्यांना माझ्यामुळे अडचण होत आहे, हे खतगावकर यांनी सांगितले. असं बाळबोध समर्थन करणाऱ्या विजय शिवतारेंना हे आधी समजलं नव्हतं का? आता त्या ५ लाख ८० हजार पवार विरोधी मतदारांनी नेमकं काय करायचं? हे तुम्ही सांगू शकाल का? तुम्ही स्वतः हा घटनाक्रम घडवून आणला की, तुमचा बोलविता धनी दुसराच कुणी होता? तुम्ही कुणाची स्क्रिप्ट वाचत होतात? आता तुमची वैयक्तिक भूमिका काय ? आज तुमची राजकीय विश्वासार्हता शिल्लक आहे का? तुम्ही म्हणजे ‘फाडा पोस्टर निकला चूहा’ नव्हेत का? आदरणीय बापू, याचीही उत्तरे तुम्ही दिलीच पाहिजेत. असो,

हे सगळं वाचून तुम्हाला राग येईल. तुमची चिडचिड होईल. पण, बापू तुमचा कार्यकर्ता म्हणून समर्थन केलं. तेव्हा अख्खा गावानं दस्तुरखुद्द अजित पवार यांच्या समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी मला वेड्यात काढलं आणि तुम्हाला ‘पोपटलाल’ म्हटलं. त्यामुळे चिडून मी सर्व पै पाहुणे, नातेवाईक, आप्तेष्ट, सगेसोयरे, मित्र परिवार, गावात आणि तालुक्यात तुमचा प्रचार केला. तुमची भूमिका लोकांना समजावून सांगितली. पण, आज तुम्ही माघार घेतली आणि माझी गोची झाली. आता लोक फोन करून माझ्यासह तुमचाही उध्दार करू लागलेत. त्यामुळे मी फोन बंद करून बसलोय. म्हणून आता तुम्हीचं एखादी पत्रकार परिषद घेवून या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या. तसाही पत्रकार परिषद घेवून ‘गोंधळ’ घालण्याचा तुम्हाला जुनाचं ‘नाद’ आहे. असो, जमेल तेवढं करा ओ. माझी अडचण होत आहे. तूर्तास तरी थांबतो !

कळावे आपला, कट्टर कार्यकर्ता.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!