महाराष्ट्र 14 न्यूज, दि.01 जुलै : सध्या पवना धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरला आहे, ज्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात आली आहे. या कपातीमुळे शहरात अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पावसाने मारलेली दडी आणि पवना धरणातील कमी होत असलेला पाणीसाठा यामुळे पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात केल्यापासून विस्कळीत, अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींचा पाऊस पडला आहे.
शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, १९ जूनपासून पाणीकपात केल्यानंतर १२ दिवसांत महापालिकेकडे तब्बल ४०९ तक्रारी आल्या आहेत. शहरवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरणात केवळ ४५ दिवस पुरेल एवढा म्हणजेच १६.८५ टक्के पाणीसाठा आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना आणि आंद्रा या दोन्ही धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. हिंजवडी, एमआयडीसीसह मावळातील गावांनाही पवना धरणातूनच पाणी पुरवले जाते. यंदा पावसाळा लांबल्यामुळे आणि तीव्र उन्हामुळे बाष्पीभवन झाल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. त्यामुळे जलसंपदा विभागाने १५ टक्के पाणीकपात करण्याची सूचना महापालिका प्रशासनाला केली. त्यानुसार १९ जूनपासून कपात सुरू करण्यात आली. त्यामुळे पवना धरणातून महापालिकेला दिवसाला ५५० ऐवजी ४७५ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी मिळत आहे.
महापालिकेने पाण्याच्या वेळा कमी केल्या आहेत. मागील साडेसहा वर्षांपासून होत असलेला एकदिवसाआड पाणीपुरवठा आणि पाणीकपातीमुळे कमी केलेल्या पाण्याच्या वेळांमुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. विस्कळीत, अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
दैनंदिन उचलण्यात येणारे पाणी कमी झाले आहे. ज्यांना कमी पाणी मिळत होते. त्यांचे आणखी कमी झाले आहे. त्यामुळे तक्रारी वाढल्या आहेत. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी केले आहे. पावसाला विलंब होत असल्याने १५ टक्के पाणीकपात केली आहे. तेव्हापासून पाण्याची दाणादाण उडाली आहे. पाण्याच्या तक्रारी प्रचंड वाढल्याचे सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी सांगितले.















