Google Ad
Uncategorized

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय स्तरावर २४x७ पूर नियंत्रण कक्षाची स्थापना

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २७ मे २०२६ –* मान्सून कालावधीत संभाव्य अतिवृष्टी, पाणी साचणे आणि पूरजन्य परिस्थितीवर तातडीने नियंत्रण ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालय स्तरावर २४x७ पूर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.या नियंत्रण कक्षांमुळे नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देणे, आपत्कालीन परिस्थितीचे समन्वय साधणे आणि आवश्यक मदतकार्य तत्काळ पोहोचवणे शक्य होणार आहे. यासाठी नियंत्रण कक्षांमध्ये आवश्यक मनुष्यबळ, सुसज्ज संप्रेषण व्यवस्था तसेच आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे मान्सून काळात शहरातील पूर व्यवस्थापन अधिक प्रभावी, जलद आणि समन्वयित पद्धतीने पार पाडणे सुलभ होणार आहे.

 

Google Ad

पूरनियंत्रण, बचावकार्य, मदत शिबिरे, आरोग्य सुविधा व आपत्कालीन प्रतिसादासाठी “मान्सून कृती आराखडा २०२६” कार्यान्वित

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती, अतिवृष्टी तसेच आपत्कालीन परिस्थितींना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने “मान्सून कृती आराखडा २०२६” तयार केला असून सर्व विभागांना समन्वयाने काम करून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांची सुरक्षितता, पूरनियंत्रण, तात्काळ मदत, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सक्षम करण्यावर या आराखड्यात विशेष भर देण्यात आला आहे.

पूरस्थितीचे L0 ते L4 अशा विविध स्तरांमध्ये वर्गीकरण करण्यात आले असून त्यानुसार प्रशासनाकडून टप्प्याटप्प्याने उपाययोजना करण्यात येणार आहेत. नदीपात्रातील पाण्याची पातळी, धरण विसर्ग आणि संभाव्य पूरस्थितीचा सतत आढावा घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्यात येणार आहे.

*धरण विसर्गावर सतत देखरेख ठेवण्याच्या सूचना*
पवना, मुळशी व इतर धरणांमधील पाणीसाठा आणि विसर्ग याबाबतची माहिती नियमितपणे घेऊन परिस्थितीनुसार संबंधित विभागांना सतर्क करण्यात येणार आहे. धरण विसर्ग वाढल्यास नदीकाठच्या भागांमध्ये तातडीने सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

*क्षेत्रीय कार्यालयांना सतर्कतेच्या सूचना*
सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी पूरबाधित व सखल भागांची पाहणी करून संभाव्य धोक्याच्या ठिकाणांची नोंद करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नदीकाठ, नाले, पाणी साचणारी ठिकाणे आणि पूरप्रवण भागांमध्ये विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

*मेगाफोनद्वारे नागरिकांना सतर्क करणार*
पूरस्थिती निर्माण झाल्यास नदीकाठच्या वस्त्या आणि सखल भागांमध्ये मेगाफोन व सार्वजनिक ध्वनीक्षेपक प्रणालीद्वारे नागरिकांना सतर्क करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात येणार आहे.

*मदत शिबिरे व नागरिकांच्या स्थलांतराची व्यवस्था*
संभाव्य पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत शिबिरे उभारण्यात येणार असून निवारा, अन्न, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्थलांतरित नागरिकांची नोंद, संख्या आणि त्यांना पुरविण्यात आलेल्या सुविधांची माहिती नियमितपणे संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

*नदीकाठ, अतिक्रमणे व धोकादायक बांधकामांवर कारवाई*
नदीकाठावरील झोपडपट्ट्या, अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे तसेच पूरप्रवण भागांचे सर्वेक्षण करून आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय, धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून संबंधितांना नोटिसा बजावण्यात येत आहेत.

*धोकादायक होर्डिंग्ज व संरचनांची तपासणी*
शहरातील होर्डिंग्ज, फ्लेक्स, मोबाइल टॉवर्स तसेच इतर धोकादायक संरचनांची तपासणी करून आवश्यकतेनुसार दुरुस्ती अथवा हटविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

*नालेसफाई, गटारसफाई व रस्ते दुरुस्तीवर भर*
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, गटारसफाई, पाण्याचा निचरा आणि रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. साचलेल्या पाण्याचा तात्काळ निचरा होण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर स्वतंत्र यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली आहे.

*पाणी उपसा पंप व यंत्रसामग्री सज्ज ठेवणार*
पूरस्थितीत तातडीने कार्यवाही करण्यासाठी पाणी उपसा पंप, पोर्टेबल पंप, जेसीबी, क्रेन, डंपर आणि इतर यंत्रसामग्री सज्ज ठेवण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त यंत्रणा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

*अग्निशामक विभागाची बचाव यंत्रणा सतर्क*
अग्निशामक विभागामार्फत रबर बोटी, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, दोरखंड, फ्लड रेस्क्यू साहित्य आणि प्रशिक्षित पथके सज्ज ठेवण्यात येणार आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्यास नदीकाठच्या भागांमध्ये बचाव पथके तैनात ठेवण्यात येणार आहेत.

*जलद प्रतिसाद पथके (QRT) कार्यरत राहणार*
प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर जलद प्रतिसाद पथके कार्यरत ठेवण्यात येणार असून आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत व बचावकार्य राबविण्यात येणार आहे.

*स्वयंसेवक, नावाडी व सर्पमित्रांची मदत घेणार*
आपत्कालीन परिस्थितीत नावाडी, जीवरक्षक, सर्पमित्र, स्वयंसेवक आणि सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून तातडीने प्रतिसाद देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

*विद्युत सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना*
विद्युत विभागामार्फत धोकादायक विद्युत खांब, डीपी बॉक्स, ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत उपकरणांची तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच पूरस्थितीत तात्पुरती प्रकाश व्यवस्था आणि आवश्यक विद्युत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

*पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेवर भर*
दूषित पाणी पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्यांमध्ये मिसळणार नाही यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जलशुद्धीकरण केंद्रे आणि पाणीपुरवठा यंत्रणा सतत कार्यरत ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.

*साथीचे आजार रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज*
आरोग्य विभागामार्फत धुरीकरण, औषध फवारणी, निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. सर्व रुग्णालये, दवाखाने, रुग्णवाहिका आणि औषधसाठा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्पदंशावरील औषधे आणि आवश्यक उपचार सुविधांची उपलब्धता देखील सुनिश्चित करण्यात येणार आहे.

*मदत शिबिरांची स्वच्छता राखण्याच्या सूचना*
मदत शिबिरांमध्ये स्वच्छता, शौचालय व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि आरोग्यविषयक सुविधा नियमित उपलब्ध ठेवण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.

*शाळा इमारती मदत शिबिरांसाठी उपलब्ध करणार*
आवश्यकतेनुसार शाळा इमारती मदत शिबिरांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून शाळांमधील महत्त्वाचे साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

*धोकादायक झाडांची छाटणी व हटविण्याची कार्यवाही*
उद्यान विभागामार्फत धोकादायक झाडांची छाटणी, वीजवाहिन्यांवरील फांद्या हटविणे तसेच वादळामुळे पडलेली झाडे तातडीने हटविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

*पर्यायी रस्ते व वाहतूक व्यवस्थेचे नियोजन*
पूरामुळे बाधित होणाऱ्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून पर्यायी मार्ग निश्चित करण्यात येणार आहेत. आवश्यकतेनुसार बॅरिकेड्स, इशारा फलक, ब्लिंकिंग लाईट्स आणि नदीपात्राजवळ पाणीपातळी निर्देशक फलक बसविण्यात येणार आहेत.

*वायरलेस व इंटरनेट यंत्रणा २४x७ सुरू ठेवणार*
सर्व नियंत्रण कक्ष, विभागीय कार्यालये आणि आपत्कालीन यंत्रणांमधील वायरलेस, इंटरनेट व संप्रेषण व्यवस्था अखंडित सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

*नागरिकांना सतर्कतेच्या सूचना प्रसारित करणार*
जनसंपर्क विभागामार्फत पावसाळ्यात घ्यावयाची काळजी, पूरस्थिती, धरण विसर्ग, वाहतूक बदल आणि आपत्कालीन सूचना विविध प्रसारमाध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.

*पूरानंतर तातडीने स्वच्छता मोहीम राबविणार*
पूरस्थिती ओसरल्यानंतर गाळ, कचरा, साचलेले पाणी आणि घाण तातडीने हटवून स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.

*आवश्यकतेनुसार इतर यंत्रणांची मदत घेणार*
आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत पोलीस, एनडीआरएफ, स्वयंसेवी संस्था तसेच इतर शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यकतेनुसार मदत घेण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
—-
पावसाळ्याच्या काळात संभाव्य पूरस्थिती व आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी महापालिकेने सर्व विभागांचा समन्वय साधून व्यापक कृती आराखडा तयार केला आहे. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेची हानी टाळणे, तात्काळ मदत व बचावकार्य प्रभावीपणे राबविणे आणि आवश्यक नागरी सुविधा अखंडित ठेवणे यावर प्रशासनाचा विशेष भर राहणार आहे. सर्व संबंधित विभागांनी सतर्क राहून जबाबदारीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनीही प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.
– *डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका*


मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देता यावा यासाठी सर्व विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. पूरनियंत्रण, बचावकार्य, नागरिकांचे स्थलांतर, मदत शिबिरे, आरोग्य सुविधा, पाणी उपसा यंत्रणा तसेच संप्रेषण व्यवस्था सज्ज ठेवण्यात येणार आहे. क्षेत्रीय कार्यालयांनी समन्वयाने काम करून नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
– *विक्रांत बगाडे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका*

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!