Categories: Uncategorized

वुई लव्ह यु दादा, यु विल बी मिस्ड’! …माझा लाडका दिलदार नेता, माझे दादा

शापित उपमुख्यमंत्री’

काही माणसांबद्दल आपल्याला कायम कुतूहल वाटतं, ते कुतूहल त्यांच्या दिसण्यामुळे, वावरण्यामुळे वागण्यामुळे, बोलण्यामुळे त्यांच्या संस्कारांमुळे, त्यांच्या जनसंपर्कामुळे कशामुळे ही असेल पण एक कुतूहल वाटतं असतं! अजित पवार माझ्यासाठी कायम कुतूहलाचा विषय होते! त्यांची प्रशासनावरची कमांड, त्यांचा जनसंपर्क, त्यांचा ह्या वयात असणारा फिटनेस, त्यांची वैयक्तिक आयुष्यातली, दैनंदिन दिनचर्येतील शिस्त, त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर, त्यांचं ‘नॉट रिचेबल असणं’, त्यांची राजकीय धमक सगळं सगळंच कुतूहलाचा विषय! ते विरोधक होते तेंव्हाही, ते पुढे भाजपसोबत युतीत आलेत तेंव्हाही!

फार कमी लोकांकडे विषयाची क्लॅरिटी असते, अजित पवार ‘प्रचंड क्लॅरिटी’ असणारे व्यक्ती होते. राजकारणात केली जाणारी तडजोड, त्यासाठी अगदी ज्यांना राजकीय आयुष्याच्या पूर्वार्धात असंख्य शिव्या दिल्या त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत सहभागी होणं असेल तरीही सत्ता मिळाल्यावर काय काय लोकोपयोगी कामं करायची आहेत ह्याविषयी ते फार क्लियर होते! उगा आपलं “नाही कायsए राजकीय जीवनात, सामाजिक जीवनात तडजोड ही करावीच लागते, काय करणार, पण आम्ही सत्तेत फक्त लोकांच्या भल्यासाठी/कुणाला धडा शिकवायला आलोय” ही असली ‘शुगर कोटेड’ फालतु बडबड त्यांनी कधीच केली नाही! उलट बॉस “सत्तेशिवाय लोकांची कामं होत नाहीत, सत्ता हवीच, कुणाला काहीही वाटो, मी माझ्या लोकांच्या तोंडाला काय पानं पुसायची होय” हे असले थेट आणि स्पष्ट विचार ते कुणाचीही भीड भाड न बाळगता त्यांनी मांडलेत!

सभेत कार्यकर्त्यांना ते चुकले म्हणून दमदाटी करणं, तोंडावर ताबा ठेवायचा सल्ला देणं, सरकारी अधिकाऱ्यांची भर सभेत बिन पाण्याने करणं, सभेत ‘दादा आय लव्ह यु’ म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला हसत ‘आय लव्ह यु टु बरं का’ म्हणणं, वरून ‘अरे बायकोला जाऊन लव्ह यु म्हणं, ती म्हणंल गडी कसा काय बिघडला’ असा टोमणा मारणं, हातावर मुका घेणाऱ्या कार्यकर्त्याला ‘च्यायला बायकोने एवढं प्रेमानं किस केलं नसेल आम्हाला जितकं तू करतोय लेगा‘ म्हणून कोपरखळी मारणं, पत्रकारांच्या अतरंगी प्रश्नांना तितकीच अतरंगी उत्तरं दिल्यावर ‘अरे बाबा मी काय तुला म्हातारा बितारा वाटलो का?’ असा खोचक टोला लगावणं, ते बोलत असतांना मध्येच ‘ओ दादा ओ दादा’ म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला ‘गप रे दादा पादा बस तु खाली’ म्हणणं, ऐन पत्रकारपरिषदेत एकनाथ शिंदेंना ‘मनातून काही (मुख्यमंत्री न बनणं) जात नाहीय’ आणि वरून ‘शिंदेंचं माहिती नाही पण मी मात्र उपमुख्यमंत्री होणार आहे’ म्हणत हळूच चिमटा काढणं ही फक्त दिलदार माणसंच करू शकतात! आणि गंमत म्हणजे त्यांचे कार्यकर्ते, समर्थक, सहयोगी, पत्रकार, विरोधक कुणालाही त्यांनी मारलेल्या कोपरखळ्या बोचायच्या नाहीत! आणखीन एक गंम्मत सांगु वरचे त्यांचे लिहिलेले सगळे डायलॉग आत्ता तुम्ही त्यांच्याच टोनमध्ये मनांत वाचलेत, खरं सांगा हो ना? दॅट्स अजित पवार फॉर यु! अजित पवारांची सगळ्यात मोठी खासियत ही होती की त्यांनी शरद पवारांचे जे चांगले गुण होते ते सगळे घेतले, आणि जे ‘त्याज्य’ गुण होते ते अजिबात घेतले नाहीत!

अजित पवार धक्कातंत्राचे प्रणेते होते. पहाटेचा शपथविधी असो, पक्ष फोडून ‘नॉट रिचेबल’ होणे असो वा आयुष्याच्या पीच वरून कायमचं ‘नॉट रिचेबल’ होणं असो त्यांनी धक्कातंत्र शेवटपर्यंत कधीच सोडलं नाही! जाताजाता ही ते धक्का नाही तर संबंध महाराष्ट्राला ‘शॉक’ देऊन गेलेत! समर्थक असो वा विरोधक त्यांच्या अकाली निधनाच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्र शॉक झाला! देवेंद्र फडणवीस ह्यांचे खूप जवळचे मित्र त्यांना सोडून गेले! राजकीय आणि वैयक्तिकदृष्ट्या देवेन दां साठी हा खूप मोठा लॉस आहे! सुनेत्रा पवारांशी झालेल्या भेटीत देवेंद्र ह्यांची देहबोली सगळंच सांगत होती, वाकलेले खांदे, शून्यात नजर, ही लॉस्ट अ मेजर सपोर्ट सिस्टम अँड हिस बर्थडे पार्टनर टु! देवेंद्र आणि अजित दादा ह्यांचे वाढदिवस एकाच दिवशी २२ जुलै! हा दिवस देवेंद्र ह्यांना ह्यापुढे आयुष्यभर हॉंट करत राहील! कॅलिबर आणि क्षमता असूनही कायम उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागणं हा अजित पवारांना मिळालेला सगळ्यात मोठा शाप होता! एकप्रकारे ते ‘शापित उपमुख्यमंत्री’ होते! देवेंद्र आणि अजित पवार दोघेही प्रशासकीय पकडीत मातब्बर, कामाचा प्रचंड व्याप सांभाळणारे आणि तो चांगल्याप्रकारे पेलू शकणारे नेते. अजित पवारांच्या जाण्याने प्रशासनावर कमांड ठोकणारा मजबूत नेता राज्याने गमावला हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल!

का कोण जाणे शरद पवारांकडे बघून आज भरून आलं! आज त्यांची थकलेली, खचलेली बॉडी लँग्वेज बरीच बोलकी होती! अजित पवार आता राजकीयदृष्ट्या त्यांचे विरोधक असले तरीही होते त्यांचे पुतणेचं ना! रक्ताचं नातं आणि गुरु शिष्याचंही! शरद पवारांनी सगळं बघून झालंय, चांगलं आणि अत्यंत वाईटही! ओळखू ही न येऊ शकणाऱ्या आपल्या पुतण्याच्या देहाकडे बघुन काय वाटलं असेल त्यांना? काय वाटलं असेल अजित पवारांच्या काकुंना? आणि सगळ्यात महत्वाचं अजित पवारांच्या वृद्ध मातोश्रींना? ज्यांना अंगाखांद्यावर खेळवलं त्या आपल्या मुलाबाळांना असं वाईटरित्या जातांना बघणं कुठल्याही वृद्ध व्यक्तीसाठी क्रूर शिक्षाच आहे! राजकीय विरोध एका बाजुला पण शरद पवारांना मीडियासमोर येऊन थरथरणाऱ्या आवाजात स्पष्टीकरण देतांना बघून आज त्यांच्याविषयी खूप वाईट वाटलं!

राजकीय सारीपाट हा ‘बुद्धिबळासारखा’ असतो! तुमच्याकडे वजीर, घोडा, हत्ती, उंट सगळी फौज असो, अगदी शेवटच्या घरात पोहचून वजीर बनलेला प्यादा असो, राजा पटावर नसला तर खेळ तिथेच थांबतो, राजाला ग्रहण (चेक) लागलं तर अगदी वजिराचा बळी देऊनही राजाला वाचवायचं असतं, मग भलेही राजा एकच घर चालणार का असेना! राजकारण असो वा बुद्धिबळ राजाचं अनन्यसाधारण महत्व असतं कारण त्याच्या हातात ‘सत्ता केंद्र’ असतं! सेनापती/वजीर बनवता येऊ शकतो, राजाला ‘घडवावं’ लागतं, घाव सोसून घडवावं लागतं! अजित पवार ‘पवार राजकारणाचे’ ‘राजा’ होते! काही लोकांना माझं हे म्हणणं अतिशयोक्तीचं वाटेल, पण अजित पवार गेल्यावर नेमकी कुठे पोकळी निर्माण झालीय हे कळायला बराच वेळ लागेल. प. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील साखर पट्टा, सहकार क्षेत्र, कृषी आणि शिक्षण क्षेत्रं ही ‘कोअर पवार’ राजकारणाची केंद्रबिंदू आणि त्यावर उभी असलेली राजकीय इको सिस्टम ही त्याच्या ‘राजा’च्या अकाली एक्सिटने खऱ्या अर्थाने पोरकी झालीय! महाराष्ट्राचं, त्यातही प. महाराष्ट्राचं राजकारण ह्या एका घटनेमुळे अशक्यरित्या बदललं आहे, त्याची गणितंही बदलली आहे! आणि त्याचा परिणाम येणाऱ्या काळात दिसेल! एन अनसर्टन्टी नॉकिंग द स्टेट्स डोअर इन अ बिग वे!

अजित पवार दिलदार माणूस होता! कुणालाही कसलंच क्लॅरिफिकेशन न देणारा ‘रांगडा’, नोकरशाहीचे लगाम हातात ठेवून प्रशासनावर मांड ठोकून बसलेला ‘कमांडर’, वेळ पडल्यावर स्वतःच्या राजकीय गुरु आणि सक्ख्या काकांना “वय झालंय तुमचं, तुम्ही सगळं काही मिळवून झालंय, आता थांबणार नसाल तर आम्हाला कधी चान्स मिळणार” ते थेट स्पष्टपणे विचारू शकणारा असा ‘नो नॉन्सेन्स’ माणुस महाराष्ट्रात दुसरा झालाच नाही, होणारही नाही, कारण राजकारणात ‘साहेब’ खूप झाले, होतीलही, पण आपलेपणाने कान ओढून शिस्त लावणारा ‘दादा’ एकच होता आणि राहील, अजित अनंतराव पवार! मोठ्या राजकीय आणि सामाजिक नेत्यांच्या अकाली मृत्यूची दुर्दैवी परंपरा महाराष्ट्राला लाभलीय, त्यात अजित पवारांचं नाव जोडलं जाणं खरंच दुर्दैवी आहे!

जाताजाता एकच म्हणेन दादा तुम्ही सदैव माझ्यासाठी ‘कुतुहलाचा’ विषय राहाल! देव तुमच्या गतात्म्यास शांती देवो, आणि तुमच्या कुटुंबियांना आणि कार्यकर्त्यांना ह्या दुःखातुन सावरण्याचं बळ देवो!

*वुई लव्ह यु दादा, यु विल बी मिस्ड’!*

Maharashtra14 News

Recent Posts

प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित,द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व जुनियर कॉलेज मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक - २६/०१/२०२६ नवी सांगवी प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित,द न्यू मिलेनियम इंग्लिश…

4 days ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी ६ फेब्रुवारीला विशेष सभा

*पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी ६ फेब्रुवारीला विशेष सभा* *स्थायी समितीसह विविध…

1 week ago

द न्यू मिलेनियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे लाठी काठी मध्ये वर्ल्ड रिकॉर्ड

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- २०/१/२०२६, नवी सांगवी प्रतिभा महिला प्रतिष्ठान, द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम…

1 week ago

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये थेट या प्रवर्गाला.. महापाैर आरक्षण सोडतमुळे दिग्गजांना धक्का

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२२ जानेवारी : राज्यातील महापालिका निवडणुका झाल्या आणि भाजपा सर्वात मोठा पक्ष…

1 week ago