Categories: Uncategorized

अभिजात मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेची ग्रंथदिंडी पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात….* *मराठी संस्कृती, साहित्य आणि अस्मितेचा जागर, शाळकरी विद्यार्थ्यांसह अबालवृद्धांचा सहभाग….

*अभिजात मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेची ग्रंथदिंडी पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात….*

*मराठी संस्कृती, साहित्य आणि अस्मितेचा जागर, शाळकरी विद्यार्थ्यांसह अबालवृद्धांचा सहभाग….*

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ३ ऑक्टोबर २०२५ :-* टाळ-मृदुंगाचा निनाद… लेझीम-ढोलताशांचा गजर… आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष… अशा संस्कृतीच्या सुवर्ण धाग्यांनी गुंफलेली मराठी भाषेची गौरवमयी ग्रंथदिंडी जणू अक्षरांच्या रथावरून मार्गक्रमण करीत आज चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे पोहोचली. अभिजात परंपरेचा अभिमान, साहित्यसंपदेचे वैभव आणि समाजजीवनाचा उत्सव एकवटून आलेल्या या ग्रंथदिंडीने पिंपरी चिंचवडच्या रस्त्यांवर मराठी अस्मितेचा जागर केला. शाळकरी विद्यार्थ्यांसह अबालवृद्धांचा सहभाग असणारी ही ग्रंथदिंडी मोरया गोसावी मंदिर, गांधी पेठ, चाफेकर चौक मार्गे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आल्यानंतर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले.

पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा व महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्याने आणि महानगरपालिकेचे श्री. भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय, भोसरी व हुतात्मा चाफेकर सार्वजनिक ग्रंथालय, चिंचवड यांच्या सहभागातून ३ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ तसेच ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवानिमित्त आज मोरया गोसावी मंदिर ते प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह या मार्गावर पारंपरिक उत्साहात ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. मराठीच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन घडविणारी ही ग्रंथदिंडी साहित्य आणि मराठी संस्कृतीचा आविष्कार ठरली.

आमदार अमित गोरखे, महापालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य शशिकांत पाटील, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष राजन लाखे यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, शाळकरी विद्यार्थी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संत साहित्य, भारतीय संविधान, मराठी भाषेतील अभिजात साहित्यकृती, चरित्रग्रंथ, काव्यग्रंथ यांचा समावेश असलेली पालखी ग्रंथदिंडीमध्ये होती. महाराष्ट्राच्या परंपरेशी सुसंगत असा पोशाख यावेळी दिंडीमध्ये सहभागी झालेल्यांनी परिधान केला होता. लेझीम पथक, ढोलताशांचा गजर, फुगड्या, टाळ-मृदुंगाच्या निनादाने वातावरण भारावून गेले. “माझी अभिजात मराठी भाषा – माझा अभिमान” या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ही ग्रंथदिंडी मराठी भाषेच्या गौरवाची, तिच्या अभिजात परंपरेच्या स्मरणाची आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारी जिवंत शपथ ठरली. या उपक्रमातून मराठी भाषेचे सांस्कृतिक वैभव अधोरेखित झाले आणि अभिजात मराठी भाषेचा अभिमान प्रत्येक हृदयात फुलून आला.
……..
*बालनाट्य विषयक प्रशिक्षण कार्यशाळा*

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त विद्यार्थी व शिक्षकांसाठी बालनाट्य विषयक प्रशिक्षण कार्यशाळा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा. प्रकाश पारखी यांनी एकपात्री प्रयोग, नाट्याभिनयातील अंगविक्षेप, संवादाभिनय, शारीरिक हालचालीतील समन्वय तसेच रंगमंचावरील आत्मविश्वास कसा वाढवावा याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मराठी नाट्य परंपरेचे नवे पैलू आत्मसात केले.
……….

Maharashtra14 News

Recent Posts

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनधिकृत फ्लेक्सवर तात्काळ कारवाई करा – आयुक्त श्रावण हर्डीकर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २८ ऑक्टोबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…

22 hours ago

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 8वा वेतन आयोग या तारखेपासून होणार लागू

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.28 ऑक्टोबर :- केंद्र सरकारने मंगळवारी 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली…

23 hours ago

प्रभागातील आरक्षण कसे असणार … पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 27 ऑक्टोबर : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत ३२ प्रभागातून एकूण १२८…

1 day ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सांगीतिक सोहळ्यात गायक-वादकांचे सूर सजले; रसिकांनी दिली भरभरून दाद

मंगलसुरांच्या दीपबंधाने रसिकांचे अभ्यंगस्नान भावनांच्या शब्दसुरावटीने दिवाळी पहाट उजळली... पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सांगीतिक सोहळ्यात गायक-वादकांचे…

1 week ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सांगीतिक सोहळ्यात गायक-वादकांचे सूर सजले; रसिकांनी दिली भरभरून दाद

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, १८ ऑक्टोबर २०२५ :* प्रकाशाच्या झळाळीने, आनंदाच्या लहरींनी आणि सुरांच्या सुवासिक…

1 week ago

लोकनेते लक्ष्मण जगताप मित्र परिवाराच्या वतीने पिंपळे गुरव येथील ‘चंद्ररंग गोशाळा’ येथे महिला भगिनींच्या करिता “वसुबारस -” गोमाता पूजन”

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 16 ऑक्टोबर :- दिवाळीचा पहिला आणि पारंपरिक सण मानल्या जाणाऱ्या वसुबारसचा…

2 weeks ago