महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, १ ऑगस्ट २०२५:* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत कौशल्यांचा विकास व्हावा यासाठी ‘स्पंदन’ उपक्रम सुरू केला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम यशस्वी ठरण्याच्या दृष्टीने नियोजनही करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती आणि निर्णय क्षमतेसारखी मूलभूत जीवन कौशल्य प्रमाण जाणून घेण्यासाठी ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’ (QCI) द्वारे मूल्यमापन करण्यात आले. या मूल्यमापनातून असे दिसून आले की, महापालिकेच्या केवळ १२ टक्के विद्यार्थ्यांनी निर्णय घेण्याशी संबंधित प्रश्नांची योग्य उत्तरे दिली. तर ४२ टक्के पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना स्व-जागरूकता, गंभीर विचार आणि निर्णय घेणे यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये उत्तरे देण्यात अडचणी आल्या. यामुळेच महापालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत कौशल्यांचा विकास व्हावा यासाठी ‘स्पंदन’ सारखा उपक्रम सुरू केला आहे.
सदर उपक्रम वाचन आणि गणिताबरोबरच मुलांचा भावनिक विकास करण्यावर लक्ष केंद्रित करतो. ‘स्पंदन’ उपक्रम सर्व १४० महापालिका शाळा आणि २११ बालवाड्यांमध्ये सुरू करण्यात येत आहे, ज्यामुळे पूर्व-प्राथमिक ते इयत्ता १० वी पर्यंतच्या ६० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये ‘सामाजिक-भावनिक आणि नैतिक शिक्षण व जीवन कौशल्यांची रुची वाढेल’ असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
स्पंदन उपक्रमासाठी २१ शिक्षकांची निवड!
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी महापालिकेने सहानुभूती, संवाद कौशल्य, विचारपूर्वक निर्णय क्षमता आणि समग्र शिक्षणाची जाणीव अशा महत्त्वाच्या गुणांवर लक्ष केंद्रित करत २१ शिक्षकांची निवड केली आहे. हे शिक्षक आता “एसईई लाईफ स्किल्स मास्टर ट्रेनर्स” म्हणून ओळखले जातात आणि ते इतर शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेत आहेत. नुकताच
ज्ञान प्रबोधिनी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणामध्ये मास्टर ट्रेनर्सनी सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी शाळेत विद्यार्थी व शिक्षक हे सामाजिक भावनिक शिक्षण (एसईएल) चा सराव करण्याबाबतचे प्रशिक्षण घेताना त्याबाबतीत अनुभव घेतला. मास्टर ट्रेनर्सनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधून, विद्यार्थ्यांना निर्णय क्षमता, स्वावलंबन यांसारख्या प्रमुख एसईएल कौशल्यांचा विकास करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी एका मास्टर ट्रेनरने सांगितले की, “आज मला सामाजिक आणि भावनिक विकासाशी संबंधित अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. यामध्ये आत्म-जागरूकता, सामाजिक जागरूकता, ताण व्यवस्थापन आणि पंचकोशाची संकल्पना समजली.”
विविध उपक्रमांचे आयोजन!
बालवाडी ते ५ वी पर्यंतच्या वर्गातील शिक्षकांसाठीचे प्रशिक्षण आधीच सुरू झाले असून, वर्षभर मासिक शिक्षक समूह सत्रांचे आयोजन केले जाणार आहे. यामुळे संपूर्ण शालेय शिक्षण पद्धतीमध्ये सकारात्मक बदल होण्यास मदत होईल. हा अभ्यासक्रम स्वतःच विद्यार्थ्यांसाठी खूप आकर्षक आहे. यात विद्यार्थ्यांना भावनिक जाणीव, कृतज्ञता आणि सामाजिक नातेसंबंध मजबूत करण्यासाठी “माइंडफुल सोमवार”, “थँक्सफुल गुरुवार” आणि “फ्रेंडली शुक्रवार” असे वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत.
स्पंदन म्हणजे काय?
स्पंदन हा एक सामाजिक-भावनिक व नैतिक शिक्षण (SEE Learning) कार्यक्रम आहे, जो CASEL, UNICEF आणि SEE शिक्षण फ्रेमवर्कवर आधारित आहे.
….
आम्ही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मॉडेल्स पाहिली आणि आमच्या मुलांच्या वास्तवाला अनुकूल असलेले सर्वोत्तम उपक्रम राबवत आहोत. स्पंदन ही दीर्घकालीन व पिंपरी चिंचवडच्या भविष्याची गुंतवणूक आहे. केवळ शिक्षणातच नाही, तर आपण ज्या प्रकारचा समाज निर्माण करू इच्छितो त्यासाठी हा उपक्रम यशस्वी ठरणार आहे.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
….विद्यार्थ्यांचा केवळ अभ्यासक्रमातच नव्हे तर आयुष्यातही विकास व्हावा, हा आमचा उद्देश आहे. ‘स्पंदन’ उपक्रमातून मुलांमध्ये भावनिक समृद्धी, सामाजिक भान आणि आत्मविश्वास विकसित होईल, अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे.
– किरणकुमार मोरे, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
……
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा पाया असून त्याचे मूळ सामाजिक, भावनिक आणि नैतिकता यांच्या वाढीमध्ये आहे. स्पंदन उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचा पाया भक्कम होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, स्वतःच्या व समाजाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्यांना सक्षम करणे, यासाठी हा उपयुक्त ठरेल.
– सुनिता गिते, नोडल सुपरवायझर
…….
आम्ही आमच्या शाळांमध्ये या उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीत यामुळे बदल होताना दिसत असून विद्यार्थी देखील उत्सुकतेने या उपक्रमात सहभागी होत आहेत. यामुळे स्पंदन यशस्वी आणि प्रभावी उपक्रम ठरू लागला आहे.
– शुभदा ताठे, एचएम आणि मास्टर ट्रेनर
…….
स्पंदन एसईई लर्निंग कार्यक्रम विविध सर्जनशील आणि अर्थपूर्ण उपक्रमांद्वारे तयार करण्यात आला असून हा आकांक्षा फाउंडेशनच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे. पूर्व-प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना, मास्टर ट्रेनर्सना प्रशिक्षण दिले जात आहे. या उपक्रमाद्वारे आम्ही एक सुसंस्कृत, निरोगी आणि मजबूत मूल्यांमध्ये रुजलेली पिढी घडवू शकू.
– अविनाश वाळुंज, मास्टर ट्रेनर
………
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 सप्टेंबर : विमान वाहतुकीत करिअर करायचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी. यंग…
जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं पिंपरीत जिल्हा डॉजबॉल स्पर्धा…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ८ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने गणेशोत्सव काळात पिंपरी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 04 सप्टेंबर :- सणासुदीच्या काळात, दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ३ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेने गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील नदी,…
महाराष्ट्र 14न्यूज, दि.02 सप्टेंबर :- मराठा आरक्षणाच्या लढ्यात मोठी घडामोड घडली आहे. मनोज जरांगे यांच्या…