Categories: Uncategorized

पिंपरी चिंचवड शहरासाठी शाश्वत विकासाचे मॉडेल उभे करण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे उद्दिष्ट कौतुकास्पद; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे प्रतिपादन

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. ८ सप्टेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड हे आशिया खंडात आणि जगभरात नावाजलेले तसेच वेगाने विकसित होणारे शहर आहे. शहरातील पायाभूत सुविधा आणि नागरी सोयी-सुविधा उल्लेखनीय असून, या विकासाला भविष्यातील गरजा आणि वाढते शहरीकरण यांची सांगड घालणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर शहराच्या भविष्यातील विकासाचा वेध घेत, उपलब्ध नागरी सुविधांचा सर्वांगीण विचार करून पिंपरी चिंचवडच्या सूक्ष्म आणि नियोजनबद्ध विकासाचे मॉडेल तयार करण्याचे उद्दिष्ट आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी समोर ठेवले आहे. या उद्दिष्टाच्या दिशेने ते निश्चितपणे यशस्वी वाटचाल करतील आणि पिंपरी चिंचवड शहराला विकासाची नवी उंची प्राप्त करून देतील, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा मराठी पत्रकार संघाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या वतीने करण्यात आलेल्या या सन्मान सोहळ्यास महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रमुख उपस्थिती होती, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास आमदार अमित गोरखे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, लोकमतचे संपादक संजय आवटे, दैनिक पुढारीचे संपादक सुनील माळी, लेट्स अप मराठीचे संपादक योगेश कुटे, सकाळ माध्यम समुहाच्या सहसंपादिका मृणालिनी नानिवडेकर तसेच विविध माध्यम समुहांचे पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाचा गौरवपूर्ण उल्लेख करताना सांगितले, बऱ्याच वर्षांनंतर पिंपरी चिंचवड शहरात येण्याची संधी मिळाली. पूर्वी गावाच्या स्वरूपात असलेल्या या परिसराने गेल्या काही दशकांत अत्यंत प्रभावशाली आणि विकसित शहर म्हणून घेतलेली झेप ही केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर संपूर्ण आशियासाठी एक उत्तम उदाहरण आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशियातील नावाजलेल्या महानगरपालिकांपैकी एक असून, वेगाने होणारे शहरीकरण अधिक नियोजनबद्ध आणि शाश्वत पद्धतीने कसे करता येऊ शकते, याचे उत्तम उदाहरण शहरातून पाहायला मिळते, असे त्यांनी नमूद केले.

शहराच्या विकासाची प्रक्रिया ही केवळ पायाभूत सुविधांच्या निर्मितीपुरती मर्यादित नसून, वाढत्या शहरीकरणासोबत नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे, प्रशासन अधिक सक्षम करणे आणि नागरिकांच्या अपेक्षांना प्रतिसाद देणे आवश्यक आहे. या दृष्टीने पिंपरी चिंचवडमध्ये होत असलेले काम महत्त्वपूर्ण असल्याचेही राहूल नार्वेकर यांनी नमूद केले.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी सन्मान स्विकारताना म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराने मला आपल्यात सामावून घेतले आहे. या शहराचा नावलौकिक अधिक उंचावत असताना त्याचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधणे हे माझ्यासमोरील प्रमुख उद्दिष्ट आहे. आज मिळालेल्या या सन्मानामुळे माझ्या जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली असून, शहराच्या विकासासाठी निश्चितपणे प्रयत्नांची पराकाष्ठा करेन.

याशिवाय, शहरातील विविध समस्या, नागरिकांच्या अडचणी आणि प्रशासनासमोरील प्रश्न शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम पत्रकार करीत असतात. नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासोबतच प्रशासनाच्या कामकाजाकडे वस्तुनिष्ठपणे पाहण्याचे आणि आवश्यक तेथे प्रश्न उपस्थित करण्याचे काम प्रसारमाध्यमे करतात. पत्रकारांनी केलेली टीका तसेच त्यांनी प्रशासनासमोर मांडलेल्या समस्या या शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. या माध्यमातून महापालिका प्रशासनाला आपल्या कामातील त्रुटी समजतात आणि त्यामध्ये सुधारणा करण्याची संधी मिळते, असेही आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

पत्रकारांनी प्रशासनाला नेहमी आरसा दाखवायला हवा आणि त्या आरशात दिसणारा चेहरा सुधारण्याचे काम प्रशासनाने केले पाहिजे असे सांगत आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी प्रशासन आणि प्रसारमाध्यमांमधील सकारात्मक संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. पत्रकारांनी मांडलेल्या प्रश्नांकडे टीका म्हणून न पाहता त्यातून शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सुधारणा ओळखण्याचा प्रयत्न प्रशासनाने करावा, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे आणि नागरिक यांच्यातील समन्वय महत्त्वाचा आहे. नागरिकांच्या अपेक्षा समजून घेत, उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून आणि पारदर्शक पद्धतीने प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी महापालिका कार्यरत राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी संगणकीय सादरीकरणाद्वारे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या शाश्वत, नियोजित आणि दीर्घकालीन विकासाचे विविध पैलू मांडले. यामध्ये आगामी ५० वर्षांसाठी पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन, महापालिका हद्दीतील उंचावरील पाणीसाठे, पवना व इंद्रायणी नदीकाठ विकास प्रकल्प, ट्रेनेज मास्टर प्लॅन, पुढील २५ वर्षांसाठी शाश्वत घनकचरा व्यवस्थापन, महापालिकेच्या ताब्यात आलेल्या आरक्षित जागांची सद्यस्थिती व भविष्यातील विकास योजना, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, शहरी नाले सुधारणा प्रकल्प, डीपी रस्ते, डेटा सेंटर धोरण आराखडा आणि पार्किंग धोरण याबाबत माहिती देण्यात आली. तसेच शहराचे सुशोभीकरण, शहरी हरितीकरण, उद्यानांचा विकास व अद्ययावतीकरण, रुग्णालय सेवांचे बळकटीकरण, भटक्या कुत्र्यांसाठी निवारा केंद्रे, बल्क वेस्ट जनरेटरसाठी नोंदणीकृत भागीदारांमार्फत सुविधा, प्रतिभा शोध कार्यक्रम, अभ्यासिका व व्यायामशाळांची संख्या वाढविणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी स्वाभिमान धोरण, सर्वांसाठी सुलभ पिंपरी चिंचवड, दिव्यांगांसाठी रोजगार निर्मिती, ‘ऑपरेशन कायापालट’ अंतर्गत स्वच्छता गृह धोरण, क्रीडा सुविधा, पीसीएमसी ग्रँड मॅरेथॉन, सायन्स पार्क विकास, महापालिका कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण धोरण, सेवानिवृत्तीच्या दिवशी पेन्शन योजना, प्रशासकीय कार्यक्षमता व पारदर्शकता, सुशासन सुधारणा तसेच ‘स्वागतम ई-पास’ आदी विविध उपक्रमांची माहिती आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सादरीकरणाद्वारे दिली.

Maharashtra14 News

Recent Posts

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

5 hours ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

15 hours ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 weeks ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

3 weeks ago

“खड्डा दिसला तर फोटो काढा, ठिकाण नोंदवा” … पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आतापर्यंत २,२४७ पैकी १,७३३ खड्डे बुजविले; उर्वरित खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

  महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १७ ऑगस्ट २०२६ :* पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अहवालानुसार,…

3 weeks ago

हरित ऊर्जेकडे आणखी एक पाऊल; आधुनिक आणि पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवडच्या दिशेने वाटचाल

हरित ऊर्जेकडे आणखी एक पाऊल; आधुनिक आणि पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवडच्या दिशेने वाटचाल महापालिका मुख्यालयातील EV चार्जिंग…

3 weeks ago