महाराष्ट्र 14 न्यूज, २० ऑगस्ट २०२५ :* अतिवृष्टीमुळे पिंपरी चिंचवड शहरात पूर परिस्थिती उद्भवल्यानंतर आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत विविध बाधित भागातील ३४० कुटुंबातील १ हजार १२७ व्यक्तींचे महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेकडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. पूर बाधितांसाठी महापालिकेने विविध ठिकाणी निवारा केंद्र तयार केले असून तेथे भोजन, आरोग्यासह आवश्यक सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच महापालिकेचा आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्य़ान्वित ठेवण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. पूर ओसरल्यानंतर त्या भागातील साफसफाई युद्धपातळीवर करण्याचे निर्देश देखील आयुक्त सिंह यांनी प्रशासनाला दिले आहेत.
आयुक्त सिंह यांनी आज शहरातील पूरग्रस्त भागाला तसेच पूरबाधितांना ठेवण्यात आलेल्या निवारा केंद्राला भेट देऊन तेथील पाहणी केली. त्यावेळी आयुक्त सिंह बोलत होते. यावेळी त्यांनी भाटनगर, पिंपरी येथील कै. नवनाथ दगडू साबळे शाळेत तयार करण्यात आलेल्या निवारा केंद्रास भेट देऊन तेथील वस्तुस्थितीची माहिती घेतली. तसेच जुनी सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळेत स्थलांतरित केलेल्या पूरबाधितांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. यावेळी भाटनगर येथे स्थानिक नागरिकांसह क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तर सांगवी येथे माजी महापौर उषा ढोरे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, हर्षल ढोरे, शारदा सोनवणे यांच्यासह सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी तृप्ती सागळे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
यानंतर आयुक्त शेखर सिंह यांनी मुळानगर परिसरात वास्तव्यास असलेल्या रहिवासी भागाला भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला. तसेच पवना नदीच्या पाणीपातळीचीही पाहणी केली. पावसाचा जोर वाढत असताना तसेच नदीपात्रात धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याच्या सूचना आणि प्रत्यक्ष पाणीपातळी यावर जलद प्रतिसाद पथकांनी बारकाईने लक्ष ठेवावे. पाण्याची धोक्याची पातळी लक्षात घेऊन त्या भागातील नागरिकांना ध्वनीक्षेपकाद्वारे पूर्वसूचना देऊन पूरबाधितांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे. कोणत्याही परिस्थितीत अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी प्रशासनाला दिले आहेत.
पूर निवारा केंद्राच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधेसह पथक नेमले आहे. त्यांनी पूरबाधितांची आरोग्य तपासणी करून आवश्यक प्राथमिक उपचार करावेत. भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी व इतर मूलभूत सोयीसुविधांची कमतरता राहणार नाही, याची काळजी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना आयुक्त सिंह यांनी दिल्या. पावसाचे वातावरण असल्याने नागरिकांनी उकळून, गाळून पाणी प्यावे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती लक्षात आल्यास महापालिकेच्या सारथी हेल्पलाईन क्रमांक ८८८८००६६६६, मुख्य नियंत्रण कक्ष क्रमांक ०२०-६७३३११११ / ०२०-२८३३११११ किंवा अग्निशमन विभागाच्या ७०३०९०८९९१ या क्रमांकावर मदतीसाठी संपर्क करावा, असे आवाहन आयुक्त सिंह यांनी यावेळी केले.
दरम्यान, काल रात्री नदीकाठच्या नागरिकांना आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली जलद प्रतिसाद पथकांनी क्षेत्रीय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली निवारा केंद्रात स्थलांतरित केले. रात्री उशीरापर्यंत स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू होती.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी बोपखेलमधील नदीकाठच्या रहिवासी भागाची पाहणी करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. आवश्यकतेनुसार पूरबाधितांना तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी पिंपरी येथील कमला नेहरू प्राथमिक शाळेमध्ये असलेल्या निवारा केंद्रास भेट देऊन स्थलांतरित करण्यात आलेल्या पूरबाधितांशी संवाद साधला. याठिकाणी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी जाधववाडी येथील निवारा केंद्रास भेट देऊन पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या. क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, आश्विनी गायकवाड, अजिंक्य येळे, अमित पंडित, तानाजी नरळे, अतुल पाटील, किशोर नन्नवरे, पूजा दुधनाळे यांच्या अधिपत्याखाली अनुक्रमे अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात जलद प्रतिसाद पथके कार्यान्वित करण्यात आली असून आपत्कालीन व्यवस्था हाताळली जात आहे. शिवाय क्षेत्रीय कार्यालयासाठी नेमलेले समन्वय अधिकारी उपायुक्त अण्णा बोदडे, निलेश भदाणे, संदीप खोत यांच्याकडून देखील आपत्कालीन परिस्थितीचे नियंत्रण केले जात आहे. सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांच्या अधिपत्याखाली मुख्य नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
…….
*क्षेत्रीय कार्यालयानिहाय निवारा केंद्रात असणाऱ्या पूर बाधितांची संख्या*
*(आकडेवारी २० ऑगस्ट २०२५ रोजीची सायंकाळी ५ वाजेपर्यंतची)*
‘अ’ क्षेत्रीय कार्यालय – २४२
‘ब’ क्षेत्रीय कार्यालय – ३८०
‘ड’ क्षेत्रीय कार्यालय – १४३
‘इ’ क्षेत्रीय कार्यालय – १०२
‘ह’ क्षेत्रीय कार्यालय – २६०
…….
*या भागावर विशेष लक्ष*
पिंपरी चिंचवड शहरातील नदीपात्रापासून जवळ असणाऱ्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील भाटनगर परिसर, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील लेबर कॅम्प, किवळे, केशवनगर, जाधव घाट, काळेवाडी, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील पिंपळे निलख पंचशील नगर, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील रामनगर बोपखेल, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील संजय गांधी नगर, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील पिंपळे गुरव लक्ष्मीनगर या भागात पुराचे पाणी शिरण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या भागावर लक्ष केंद्रित केले आहे.
……
*धरणातून सुरू असणारा विसर्ग*
पवना धरण ९८.२९ टक्के भरले असून या धरणातून आज दुपारी ४.३० वाजल्यापासून पवना नदीपात्रात जलविद्युत केंद्राद्वारे १ हजार ४०० क्युसेक तर सांडव्याद्वारे १० हजार २९० क्युसेक असा एकूण ११ हजार ६९० क्युसेक विसर्ग सुरू आहे, अशी माहिती पवना धरण पूरनियंत्रण कक्ष, खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांनी दिली. मुळशी धरण ९७.४ टक्के भरले असून या धरणातून आज दुपारी ३ वाजल्यापासून मुळा नदीपात्रात २२ हजार ७०० क्युसेक विसर्ग सुरू आहे, अशी माहिती टाटा पॉवर मुळशी धरण यांनी दिली आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यातून मुठा नदीपात्रामध्ये आज सकाळी १० वाजल्यापासून ३९ हजार १३९ क्युसेक विसर्ग सुरू आहे. यामध्ये आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार विसर्ग कमी-जास्त होण्याची शक्यता असल्याचे मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग, स्वारगेट, पुणे यांच्यावतीने कळविण्यात आले आहे.
…….
जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं पिंपरीत जिल्हा डॉजबॉल स्पर्धा…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ८ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने गणेशोत्सव काळात पिंपरी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 04 सप्टेंबर :- सणासुदीच्या काळात, दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ३ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेने गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील नदी,…
महाराष्ट्र 14न्यूज, दि.02 सप्टेंबर :- मराठा आरक्षणाच्या लढ्यात मोठी घडामोड घडली आहे. मनोज जरांगे यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.02 सप्टेंबर :- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आझाद मैदानी…