Google Ad
Uncategorized

चोराच्या उलट्या बोंबा’ अपयशी ठरलेल्या भाजप नेत्यांकडून मुद्दे भरकटविण्याचा प्रयत्न – अजित गव्हाणे.

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २६ मार्च)  :- आपल्या सत्ताकाळात एकही प्रश्न सोडवून न शकलेल्या भाजप नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. अनधिकृत बांधकामे, रेडझोन, साडेबारा टक्के परताव्यासह शास्तीकर रद्दच्या प्रश्नावर मते मागणार्‍यांनी यातील कोणताच प्रश्न सोडविलेला नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तालय, धर्मांतर अशा मुद्यांवर बोलून मुद्दे भरकटविण्याचे कारस्थान भाजकडून सुरू झाले असून विधानसभेत जनतेचे प्रश्न मांडण्याऐवजी आमदारांनी केवळ राजकारण करण्यावरच समाधान मानल्यामुळे या ‘चोरांच्या उलट्या बोंबा’ सुरू असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली आहे.

राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना भाजपाचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवड शहराला काय मिळाले? असा प्रश्न उपस्थित करत टीका केली होती. या टीकेला आता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पत्रकाद्वारे उत्तर दिले आहे.

Google Ad

अजित गव्हाणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ज्या पोलीस आयुक्तालयाचे श्रेय भाजपकडून घेतले जाते त्या पोलीस आयुक्तालयाच्या प्रशासकीय कामकाजास तात्कालीन काँग्रेस- राष्ट्रवादीच्या सरकारनेच सुरुवात केली होती. 2014 साली भाजपची सत्ता आल्यानंतर हा निर्णय लगेच होणे अपेक्षित असतानाही तब्बल तीन वर्षे रखडविण्यात आला होता. जे श्रेय लाटतात त्यांनी 2014 ऐवजी पोलीस आयुक्तालय होण्यास तीन वर्षे विलंब का लागला? त्याचे उत्तर द्यावे. शहरातील विकासकामे कोणती केली हे जनतेला ज्ञात आहे. राष्ट्रवादीने आपल्या सत्ताकाळात शहराचा कायापालट झालेला आहे ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही.
सध्या भाजपचे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार आहे. मात्र त्यांनी गतवेळी झालेल्या महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत रेडझोनचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. प्रश्न सोडविणे तर दूरच मात्र, रावेतकरांच्या माथी नव्याने रेडझोनची टांगती तलवार लटकविण्यात आली आहे. हे जनतेला घाबरविण्यासाठी भाजपचेच कृत्य असून रेडझोनच्या प्रश्नावर मते मागणार्‍यांनी रेडझोन प्रश्न का सोडविला नाही, त्याचे उत्तर द्यायला हवे.

शहरातील भूमीपूत्रांचे प्रश्न सोडविल्याचा दावा करणार्‍यांनी साडेबारा टक्क्याचा प्रश्न सोडविल्याचे सांगून आनंदोत्सव साजरा केला होता. त्याला तीन महिन्यांचा काळ लोटला तरी अध्यादेश निघालेला नाही. केवळ फसव्या घोषणा करण्याचा उद्योग या मंडळींनी चालविला आहे. शास्तीकराचा प्रश्न कायम ठेवण्यात आला आहे. शास्तीकर रद्द करण्यात आला नसून आतापर्यंतच्या शास्तीची रक्कम माफ करण्यात आल्याने हा प्रश्न कायम आहे. अनधिकृत बांधकामाचाही प्रश्न कायम आहे. यातील एकही प्रश्न सोडविण्यात भाजप नेत्यांना अपयश आले आहे. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. येणार्‍या प्रत्येक निवडणुकीत पराभव निश्चित असल्यामुळे मुद्दे भरकटविण्याचा प्रयत्न या मंडळींकडून सुरू असल्याचा आरोपही गव्हाणे यांनी केला आहे.

पाच वर्षांत काय दिवे लावले
पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेने अत्यंत विश्वासाने महापालिकेची सत्ता भाजपच्या हातात दिली. मात्र या पाच वर्षांच्या सत्ताकाळात काय दिवे लावले? याचे उत्तर शहरातील जनतेला हवे आहे. लाचखोरी, भ्रष्टाचार आणि खंडणीखोरीमध्ये भाजपचे नेते तुरुंगात गेले. पाच वर्षांत जनतेच्या हिताचा एकही प्रकल्प न राबविणार्‍या भाजपला मते मिळविण्यासाठी धर्माचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र शहरातील जनता भाजपच्या अशा प्रकारांना आता बळी पडणार नाही. येत्या महापालिका निवडणुकीत भाजपला येथील जनताच पराभवाची धूळ चारेल, असा विश्वासही गव्हाणे यांनी व्यक्त केला आहे.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!