Categories: Editor ChoiceFront

रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येचा प्राचीन इतिहास माहित आहे का ? जाणून घ्या!

महाराष्ट्र 14 न्यूज : शरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी, या गीतरामायणातील गीतात अयोध्या नगरीचे वर्णन करण्यात आले आहे. आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगुळकर आणि बाबूजी म्हणजेच सुधीर फडके यांनी अजरामर केलेली ही कलाकृती. हे गाणे केवळ नुसते ऐकले, तरी अयोध्या नगरीचे एक सुंदर रुप आपल्या मनात अलगदपणे उमटण्यास सुरुवात होते. श्रीविष्णूंचा सातवा अवतार मानल्या गेलेल्या प्रभू श्रीरामांची जन्मभूमी म्हणजे अयोध्या. याच अयोध्येत शतकांच्या तपश्चर्येनंतर श्रीरामांचे भव्य मंदिर उभारले जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने अद्भूतपूर्व निकाल देत श्रीराम मंदिराचा मार्ग मोकळा केला. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापन करण्यात आली. यानंतर बैठका होऊन आता ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. मध्यंतरी नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी श्रीरामांचा जन्म नेपाळमध्ये झाला होता, असा दावा केला होता. के. पी. शर्मा ओली यांच्या वक्तव्यानंतर दावे-प्रतिदावे करण्यात आले. मात्र, यात काहीही तथ्य नाही, हे सर्वश्रुत आहे. श्रीरामांची अयोध्या नगरी कशी होती? अयोध्या नगरीचा नेमका प्राचीन इतिहास काय आहे? जाणून घेऊया….

श्रीराम यांच्या कार्यकाळात भारत १६ महाजनपदांमध्ये विभागले गेले होते. महाभारतकाळात हेच महाजनपद १८ भागात विभागले गेले. या महाजनपदांअंतर्गत अनेक जनपद असायचे. त्यापैकीच एक म्हणजे कौशल महाजनपद आणि त्याची राजधानी अवध होती. ज्याचे साकेत आणि श्रावस्ती असे दोन भाग झाले. अवधलाच अयोध्या म्हणतात. दोघांचे अर्थ एकच आहेत. वाल्मिकी रामायण आणि रामचरितमानसनुसार राजा दशरथाचे राज्य कौशल आणि त्याची राजधानी अयोध्या होती. पौराणिक कथेनुसार, जेव्हा ब्रह्मदेव मनूला विष्णूंकडे घेऊन गेले, तेव्हा विष्णूंनी रामावतारासाठी त्यांना साकेतधाममधील एक स्थळ सुचविले. विष्णूंनी या नगरीच्या निर्मितीसाठी विश्वकर्मांना ब्रह्म आणि मनूच्या समवेत पाठविले. त्यांच्यासोबत महर्षी वशिष्ठही होते. महर्षी वशिष्ठांनी शरयू नदीच्या काठावर लीलाभूमीची निवड केली. तेथे विश्वकर्मांनी या नगरीची निर्मिती केली.

वाल्मिकी रामायणाच्या पाचव्या सर्गात अयोध्यापुरीचे वर्णन तपशीलवार केले आहे. शरयू नदीच्या काठावर वसलेल्या या नगरीची निर्मिती वैवस्वत मनू महाराजांनी केली होती. रामायणासह अनेक शास्त्रांमध्ये अयोध्येचा उल्लेख शरयू नदीच्या काठावर वसलेली नगरी म्हणूनच आढळून येतो. अयोध्येपासून १६ मैल अंतरावर नंदीग्राम नामक स्थान आहे. तेथूनच श्रीराम यांच्या अनुपस्थितीत भरताने अयोध्येचा राज्यकार्यभार सांभाळला. येथे भरतकुंड सरोवर आणि भरताचे मंदिरही आहे. अन्य कोणत्याही ठिकाणी नंदीग्राम किंवा सरयू नदी किंवा हनुमानगढी नाही.

अयोध्या रघुवंशी राजांच्या कौशल जनपदाची फार जुनी राजधानी असे. वैवस्वत मनूचा मुलगा इक्ष्वाकू वंशजांनी या नगरीवर राज्य केले होते. या वंशात पुढे राजा हरिश्चंद्र, राजा भगीरथ, सगर आदींनंतर राजा दशरथ हे ६३ वे शासक होते. याच वंशातील श्रीरामांनी पुढे शासन केले होते. हेच ते रामराज्य. त्यांचा पश्चात श्रीरामपुत्र कुशने हे नगर पुन्हा वसवले. कुशच्या पश्चात सूर्यवंशाची पुढील ४४ पिढ्यांपर्यंत रघुवंशीयांनी शासन केले. महाभारतकाळात याच वंशातील बृहद्रथ, अभिमन्यूच्या हातून महाभारताच्या युद्धात ठार मारला गेला. बृहद्रथाच्यानंतर बऱ्याच काळापर्यंत ही नगरी आधी मगध मग, कन्नोजच्या शासकांच्या आधिपत्याखाली राहिली. शेवटी येथे सैयद सालारने तुर्क शासनाची स्थापना केली. त्यानंतर अयोध्येसाठीची लढाई सुरू झाली.

स्कंदपुराणानुसार, अयोध्या हे शब्द ‘अ ‘ कार ब्रह्मा, ‘य’ कार विष्णू आणि ‘ध’ कार रुद्राचे रूप आहे. याचा शाब्दिक अर्थ असा आहे की, जेथे युद्ध होत नाही. अवध म्हणजे जेथे कोणाला ठार मारले जात नाही. अयोध्येचा अर्थ ज्याला कोणीही युद्धाने जिंकू शकत नाही. श्रीरामांच्या काळात ही नगरी अवध नावाने ओळखले जात होती. काही बौद्ध ग्रंथात या नगरीला प्रथम अयोध्या आणि यानंतर साकेत म्हटले गेले. कालिदासाने उत्तरकौशलची राजधानी साकेत आणि अयोध्या अशा दोन्ही नावांचा उल्लेख केल्याचे आढळून येते.

रामायण काळात मिथिलाचे राजा जनक होते. जनकाच्या राजधानीचे नाव जनकपूर होते. जनकपूर नेपाळमधील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. नेपाळची राजधानी काठमांडूपासून सुमारे ४०० कि.मी. अंतरावर दक्षिण पूर्व दिशेला ते वसलेले आहे. येथे सीतेने आपले बालपण व्यतीत केले होते. सीता स्वयंवर येथेच झाले. याच ठिकाणी ‘धनुषा’ नामक लग्नमंडप आहे. विश्वामित्र ऋषींचा आश्रम वाराणसी जवळच असल्याचे सांगितले जाते. तेथूनच श्रीराम जनकपुरी गेले होते. अयोध्येपासून जनकपूर सुमारे ५२२ कि.मी. अंतरावर आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 day ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

2 days ago

पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचा “मेरा बूथ सबसे मजबूत”चा संकल्प, … बूथ स्तरावर 51 टक्के मताधिक्य जिंकण्याचा भाजपचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना…

2 days ago

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

4 days ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

5 days ago