Google Ad
Uncategorized

शब्द, सुर आणि विचार यांचा त्रिवेणी संगम .. काव्यशायराना’तून समतेचा संदेश; वसीम बरेलवी यांच्या शायरीने रंगली मैफल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४ एप्रिल २०२६ – शब्द, सुर आणि विचार यांचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळालेल्या ‘काव्यशायराना’ या बहुभाषिक काव्यमंचाने ‘विचार प्रबोधन पर्व २०२६’ला एक वेगळाच उंचावलेला आयाम दिला. मराठी, हिंदी आणि उर्दू काव्याच्या सुरेल अभिव्यक्तीतून सामाजिक समता, मानवी नातेसंबंध आणि बदलत्या समाजाचे प्रतिबिंब उभे राहत, उपस्थित श्रोत्यांना केवळ मनोरंजन नव्हे तर विचारांची नवी दिशा देणारा हा कार्यक्रम ठरला.

पिंपरी येथील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (भिमसृष्टी) येथे महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती वर्षानिमित्त ११ ते १७ या कालावधीत सामाजिक समता सप्ताह व विचार प्रबोधन पर्व २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे १३ एप्रिल रोजी सायंकाळच्या सत्रात पार पडलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांची उत्स्फूर्त व मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

Google Ad

या काव्यमैफलीचे प्रमुख आकर्षण ठरलेले प्रख्यात उर्दू शायर वसीम बरेलवी यांनी आपल्या सादरीकरणातून प्रेम, वेदना आणि मानवी मूल्यांची गहिरी जाण श्रोत्यांपर्यंत पोहोचवली. त्यांच्या साध्या पण हृदयस्पर्शी शब्दांनी वातावरण भारावून गेले. देश-विदेशातील मुशायरांमध्ये गाजलेली त्यांची शायरी येथेही रसिकांच्या मनात घर करून गेली.

याशिवाय, प्रणय सतलज यांनी तरुणाईच्या भावविश्वाला साद घालत प्रेम, संघर्ष आणि आधुनिक वास्तव यांचे ओघवत्या शैलीत सादरीकरण केले. संदीप जगताप यांनी सामाजिक भान आणि संवेदनशीलतेने परिपूर्ण अशा कवितांद्वारे विचारप्रवृत्त वातावरण निर्माण केले, तर विशाल उशीरे यांनी आपल्या ऊर्जावान सादरीकरणातून आधुनिक नातेसंबंध आणि समाजचित्र प्रभावीपणे उभे केले.

‘काव्यशायराना’ या कार्यक्रमाने काव्याच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची ताकद अधोरेखित करत, उपस्थितांना समता आणि जागरूकतेचा अर्थ नव्याने समजावून दिला.

सिनेपार्श्वगायक आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत यांच्या आवाजात दुमदुमली भीमगीतांची मैफल

सुर, स्वर आणि सामाजिक जाणिवांचा संगम साधत ‘लाईव्ह कॉन्सर्ट – महासंगीत रजनी’ने पिंपरीत एक अविस्मरणीय वातावरण निर्माण केले. भीमगीतांच्या ओजस्वी सादरीकरणातून समता, स्वाभिमान आणि परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या या मैफलीने उपस्थित नागरिकांच्या मनावर वेगळा ठसा उमटवला.

क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा जागर करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘सामाजिक समता सप्ताह’ आणि ‘विचार प्रबोधन पर्व’ या कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवसाची सांगता भीमगीतांच्या भव्य ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ने झाली.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध सिनेपार्श्वगायक आदर्श शिंदे आणि सिनेपार्श्वगायिका वैशाली सामंत यांनी आपल्या दमदार आवाजात भीमगीतांची प्रभावी सादरीकरणे करत वातावरण भारावून टाकले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना साजेशा गीतांमधून समतेचा आणि स्वाभिमानाचा संदेश त्यांनी रसिकांपर्यंत पोहोचवला. त्यांच्या प्रत्येक गीताला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. या महासंगीत रजनीला नागरिकांची प्रचंड गर्दी लाभली होती. उत्कृष्ट ध्वनीव्यवस्था, नेत्रदीपक प्रकाशयोजना आणि तितकीच समर्थ संगीत वादनाची साथ यामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. गायकांच्या आवाजाला लाभलेली लाईव्ह ऑर्केस्ट्राची साथ ही या कार्यक्रमाची आणखी एक विशेष बाब ठरली.

कार्यक्रमाचा उत्कर्षबिंदू ठरला तो रात्री १२ वाजता झालेला भव्य फटाक्यांचा आतषबाजीचा देखावा. आकाशात झळकणाऱ्या रोषणाईने आणि भीमगीतांच्या पार्श्वसंगीताने वातावरणात एक वेगळाच उत्साह आणि अभिमानाची भावना निर्माण केली. या ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ने केवळ संगीताची मेजवानी न देता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करत सामाजिक समतेचा संदेश अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवला.

Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!