महाराष्ट्र 14 न्यूज, दि.22 मे — पिंपरी-चिंचवड: पिंपळे निलख येथील रक्षक चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर तो सर्वसामान्य नागरिकांच्या आणि वाहनचालकांच्या सोयीसाठी तात्काळ खुला करण्यात यावा, या चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या मागणीची पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने सकारात्मक दखल घेतली आहे. आमदार जगताप यांच्या आग्रही पाठपुराव्यानंतर प्रशासनाने तत्परता दाखवत सर्व तांत्रिक व सुरक्षाविषयक प्रक्रिया पूर्ण करून हा उड्डाणपूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला केला आहे. त्यामुळे या परिसरातील दीर्घकालीन वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रक्षक चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असले तरी तो वाहतुकीसाठी खुला न झाल्याने या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना रोज तासनतास कोंडीचा आणि वेळेच्या अपव्ययाचा सामना करावा लागत होता. ही गैरसोय दूर करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी थेट महापालिका आयुक्तांना पत्र लिहून संबंधित विभागामार्फत आवश्यक असणारे सुरक्षा ऑडिट व तांत्रिक तपासणी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. तसेच हा उड्डाणपूल जाहीर वापरासाठी जलदगतीने खुला करण्याची मागणी केली होती. आमदारांच्या या मागणीला प्रशासनाने तात्काळ प्रतिसाद दिला आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना पूर्ण करून हा मार्ग खुला केला. या उड्डाणपुलामुळे आता औंध ते सांगवी फाटा आणि रावेतपासून पुढे किवळेपर्यंतचा प्रवास अधिक वेगवान, सुटसुटीत आणि सिग्नलमुक्त झाला आहे. तसेच औंध बीआरटी रस्त्यावरील वाहतूक कोंडी पूर्णपणे सुटण्यास मदत झाली आहे.

या संदर्भात बोलताना आमदार शंकर जगताप यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, रक्षक चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असतानाही तो केवळ तांत्रिक प्रक्रियेमुळे रखडला होता. यामुळे रोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना, नोकरदारांना आणि स्थानिक व्यापाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. नागरिकांचा वेळ आणि इंधन वाया जात होते. ही कोंडी लक्षात घेऊन आपण महानगरपालिका प्रशासनाकडे तात्काळ पाठपुरावा केला. प्रशासनानेही या समस्येचे गांभीर्य ओळखून त्वरित निर्णय घेतल्याबद्दल मी मनपा आयुक्तांचे आभार मानतो. रक्षक चौक फ्लायओव्हर सुरू झाल्यामुळे औंध, सांगवी, रावेत ते किवळे यादरम्यानचा प्रवास आता सिग्नलमुक्त आणि सुसाट होणार आहे. या भागातील अंडरपासचे कामही प्रगतीपथावर असून ते देखील लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. मतदारसंघातील नागरिकांचा प्रवास सुखकर करणे हेच आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
आमदार शंकर जगताप यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्येची दखल घेऊन केलेल्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल आणि महापालिकेच्या गतिमान भूमिकेबद्दल पिंपळे निलख, तसेच शहरातील नागरिकांनी आणि वाहनचालकांनी समाधान व्यक्त करत आमदारांचे आभार मानले आहेत.

















