Google Ad
Uncategorized

पालखी सोहळ्याची पुणे जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी; पालखी सोहळ्याच्या रथाला यंदा प्रथमच जीपीएस !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ मे) : आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा प्रशासनाने स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच आरोग्याच्यादृष्टीने जय्यत तयारी केली आहे. १०६ टँकरने पालखीमध्ये पाणीपुरवठा करण्यात येणार असून पालखी मुक्कामाच्या ठिकाणी दरदिवशी तब्बल २ हजार ७०० शौचालयांच्या व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी अधिक महिना आल्यामुळे सुमारे एक महिना अगोदर पालखीचे प्रस्थान होत आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा ११ जून रोजी तर श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा १० जून रोजी होणार आहे. 

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा ११ जून रोजीचा मुक्काम दर्शन मंडप इमारत आळंदी संस्थान येथे, १२ व १३ जून रोजी पालखी विठोबा मंदीर भवानीपेठ पुणे येथे, १४ व १५ जून रोजी सासवड, १६ जून रोजी जेजुरी, १७ जून रोजी वाल्हे येथे मुक्काम असणार असून १८ रोजी नीरा येथून सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

Google Ad

तर श्री संत तुकाराम महाराज यांची पालखीचा मुक्काम १० जून रोजी ईनामदार साहेब वाडा देहू येथे, ११ जून रोजी आकुर्डी, १२ व १३ जून रोजी नानापेठ, पुणे, १४ जून लोणी काळभोर, १५ जून यवत, १६ जून रोजी वरवंड, १७ जून रोजी उंडवडी गवळ्याची, १८ जून बारामती, १९ जून सणसर, २० जून आंथुर्णे, २१ जून निमगाव केतकी, २२ जून इंदापूर, २३ जून रोजी सराटी येथे मुक्काम असणार असून २४ जून रोजी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या रथाला यंदा प्रथम जीपीएम प्रणाली बसविण्यात येणार आहे. त्यामुळे पालखीतील रथ नेमका कुठे आहे याची अचूक माहिती मिळणार आहे.

उन्हाच्या कालावधीत पालखी सोहळा असल्यामुळे पुरेशा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.  श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी ५४ टँकर देण्यात येणार असून २९ टँकर भरणा ठिकाणे निश्चित केली आहेत. श्री संत तुकाराम महाराज पालखीसाठी ४५ टँकर आणि १६ टँकर भरणा ठिकाणे, श्री संत सोपानकाका महाराज पालखीसाठी ३ टँकर, श्री संत चैतन्य महाराज पालखी आणि श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखीसाठी प्रत्येकी २ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासोबतच पालखीमार्गावरील गावातील पाण्याचे स्रोत शुद्धीकरण करण्यात येत आहे. ठिकठिकाणी पाण्याचे नमुने घेऊन पाणी शुद्धतेची खात्री करण्यात येणार आहे.

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ४ दिवस अगोदरच शौचालयांची उभारणी करण्यात येणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी १ हजार ५०० शौचालये उभारण्यात येणार आहेत. संत तुकाराम महाराज पालखीसाठी १ हजार तर संत सोपानकाका महाराज पालखीसाठी २०० शौचालये उभारण्यात येणार आहेत. शौचालयांच्या ठिकाणी नियमित पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार असून वापरानंतर स्वच्छतेसाठी जास्तीत जास्त स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.

आरोग्य विभागाच्या माध्यमातून वारकऱ्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे, फिरत्या आरोग्य पथकाच्या माध्यमातून आपत्कालीन वैद्यकीय सेवा देणे, दोन्ही पालखीच्या १ किलोमीटर अंतराच्या आत १०८ रुग्णवाहिका सेवेच्या प्रत्येकी १५ रुग्णवाहिका व १०२ सेवेच्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी ३५ व संत तुकाराम महाराज पालखीसाठी ७५ रुग्णवाहिका कायम सज्ज ठेवण्यात येणार आहेत.उन्हाचा त्रास लक्षात घेता सर्व आरोग्य पथकांच्या ठिकाणी पुरेसा ओआरएसचा साठा, औषध साठा ठेवण्यात येत आहे. दिवे घाट चढणीनंतर भाविकांना त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन झेंडेवाडी विसावा परिसरात स्त्री व पुरुषांसाठी प्रत्येकी ५ अशा एकूण १० खाटांच्या विशेष आंतररुग्ण कक्षाची उभारणी करण्यात येणार आहे.

दर २ किलोमीटरवर ८७ बाह्यरुग्ण रुग्णवाहिका पथकांमार्फत रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. यापैकी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी २९ तर संत तुकाराम महाराज पालखीसाठी ५८ बाह्यरुग्ण रुग्णवाहिका पथके नेमण्यात येणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी ३ त संत तुकाराम महाराज पालखीसाठी ५ अशी एकूण ८ ग्रामीण रुग्णालयांची पालखी मुक्काम औषधोपचार केंद्रे असणार आहेत. त्याचप्रमाणे अनुक्रमे ५ आणि ११ अशी एकूण १६ प्राथमिक आरोग्य केंद्रांची पालखी मुक्काम औषधोपचार केंद्रे असणार आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी १० त संत तुकाराम महाराज पालखीसाठी २३ अशा एकूण ३३ औषधोपचार उपकेंद्रातून वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. याशिवाय दोन्ही पालख्यांसाठी प्रत्येकी १ फिरते वैद्यकीय पथक कायम बरोबर असणार आहे. या कालावधीत पालखी सोहळा मार्गावरील खासगी रुग्णालयातील १० टक्के खाटा राखीव ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!