Google Ad
Uncategorized

चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण .. अशी असेल, मतमोजणी प्रक्रिया

चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मतमोजणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण.

Google Ad

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १ मार्च) : : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पर्यवेक्षक, सहायक आणि सूक्ष्म निरीक्षकांना आज निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी मतमोजणी विषयक प्रशिक्षण दिले.

निवडणूक निरिक्षक एस. सत्यनारायण यांच्या उपस्थितीत थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे झालेल्या या प्रशिक्षणावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, शितल वाकडे आदी उपस्थित होते.

मतमोजणी प्रक्रियेच्या अनुषंगाने कर्तव्ये, जबाबदाऱ्या आणि आवश्यक कामकाज याबद्दल या प्रशिक्षणामध्ये सविस्तर माहिती आणि सूचना देण्यात आल्या.

टेबलनिहाय देण्यात आलेल्या कंट्रोल युनिट वरील मतमोजणी कशाप्रकारे करावी याबाबतचे तांत्रिक प्रशिक्षण तसेच मतमोजणी करताना विहित नमुन्यात माहिती भरण्याबाबत प्रशिक्षणात सविस्तर माहिती देण्यात आली. मतमोजणी कर्मचाऱ्यांनी मतमोजणी करताना घ्यायची काळजी, भरायचे विविध नमुने (फॉर्म) आदीबाबत सूचना दिल्या. इव्हीएम वरील उमेदवारनिहाय मतांची मोजणी व नोंद, फॉर्म भरणे, निवडणूक आयोगाच्या एन्कॉर ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये माहिती भरणे, मतमोजणीनंतर पुन्हा इव्हीएम सीलिंग करणे, साहित्य पुरवठा याबाबत प्रशिक्षण दिले. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

*मतमोजणीच्या ३७ फेऱ्या*
मतमोजणी उद्या गुरुवार २ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपासून थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे होणार असून मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी १४ टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी १ टेबल असे एकूण १५ टेबल असणार आहेत. १८ पर्यवेक्षक, १८ सहायक आणि १८ सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची संगणकीय प्रणालीने सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात येणार आहे. त्यानुसार प्राप्त झालेल्या टेबलवरील कामकाज त्या कर्मचाऱ्यांना सोपवले जाणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तसेच मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मतमोजणी प्रक्रिया होईल. टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. सुरुवातीला टपाली आणि ईटीपीबीएसची मतमोजणी होईल. मतमोजणी सुरू होण्याच्या निर्धारित वेळेपर्यंत प्राप्त टपाली मतदानाची मोजणी करण्यात येईल. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर १ मतमोजणी पर्यवेक्षक, १ मतमोजणी सहायक आणि १ सूक्ष्म निरीक्षक असे अधिकारी- कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर उमेदवार निहाय मतांची उद्घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी ध्वनीक्षेपकाद्वारे करतील. सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर यादृच्छिक (रँडम) पद्धतीने ५ व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाणार असून कंट्रोल युनिट वरील मतांची संख्या आणि व्हीव्हीपॅट मधील चिठ्ठ्यांची पडताळणी केली जाणार आहे. मतमोजणी केंद्रावर माध्यम कक्ष, निवडणूक अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी थेरगाव येथील कामगारभवना शेजारील मोकळ्या जागेत वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!