प्रजिमा-३१ रस्त्यावरील भुमकर चौक ते हिंजवडी शिवाजी चौक रस्त्यामधील खुप दिवसांपासुन प्रलंबित असलेला स.नं. ८३ पै. मधील रस्त्याचे जागेचा तोडगा निघाला
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ मे) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरामधील प्रजिमा-३१ रस्ता हा हिंजवडी आयटी पार्क व भोसरी चिखली एमआयडीसी ला जोडणारा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे सदर रस्त्यावर वाहनांची खुप गर्दी असुन भुमकर चौकात वारंवार वाहतुक कोंडी होते. तसेच सदर वाहतुक कोंडीबाबत मनपाकडे वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत. मा.आयुक्तसो. यांनी सदर प्रजिमा-३१ रस्त्यावर दि. २५/०३/२०२३ रोजी समक्ष भेट देऊन स्थळ पहाणी केली. प्रजिमा-३१ रस्त्यावरील भुमकर चौक ते शिवाजी चौक हिंजवडी मधील स.न. ८३(पै.) मध्ये मंजुर विकास योजनेनुसार ३० मी. रुंदीप्रमाणे रस्ता रुंदीकरण करणे आवश्यक आहे. तथापि, रुंदीकरणाची जागा न्यायालयात दावा दाखल असल्याने मनपाच्या ताब्यात आलेली नाही, त्यामुळे सदर ठिकाणी मनपास रस्तारुंदीकरण करता आले नाही.
सदरची जागा ताब्यात घेणेबाबत मनपा आयुक्त यांनी पुढाकार घेऊन अति.आयुक्त-२, नगररचना विभाग, स्थापत्य प्रकल्प विभाग आणि संबंधित जागामालक यांचे समवेत बैठक घेऊन सदरची जागा मनपाचे ताब्यात देणेकामी जागामालकांना विनंती करुन त्यांची संमती घेतली. त्यामुळे सदर ठिकाणी पुढील काही दिवसांमध्ये रस्त्याचे सन २०१५ पासुनचे रखडलेले उर्वरीत काम सुरु करता येणार आहे. सदर रस्त्याचे काम पुर्ण झाले नंतर वाकड भुमकर चौक ते शिवाजी चौक हिंजवडी या रस्त्यावरील वाहतुक कोंडीचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे.
सदर प्रकरणावर तोडगा काढणेकामी श्री. शेखर सिंह , आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, श्री.जितेंद्र वाघ, अति.आयुक्त-२, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, श्री.प्रसाद गायकवाड, उपसंचालक, नगररचना व विकास विभाग, श्री.प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता, स्थापत्य प्रकल्प विभाग, श्रीम. प्रेरणा सिनकर, कार्यकारी अभियंता, स्थापत्य प्रकल्प विभाग यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत.
सदर ठिकाणचे रस्ता रुंदीकरण त्वरीत करणेत येणार आहे. त्यामुळे वाहतुक सुरळीत होऊन नागरिकांना फायदा होणार आहे, असे सह शहर अभियंता श्री.प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.