Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड शहरात ‘स्वच्छ तीर्थ अभियान’ राबविण्यास सुरूवात ५३ मंदिरांची होणार स्वच्छता – आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची माहिती..

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जानेवारी, २०२४ :-* केंद्र सरकारच्या “स्वच्छ भारत अभियान” अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने “स्वच्छ तीर्थ अभियान” राबविण्यास सुरूवात केली आहे. या अंतर्गत २१ जानेवारीपर्यंत शहरातील सुमारे ५३ मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे.

अयोध्येमध्ये २२ जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळे व तेथील परिसरात स्वच्छता अभियान राबविण्याचे आदेश भारत सरकारच्या आवासन आणि शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने महापालिकेला दिले आहेत.

Google Ad

त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरातील ५३ मंदिरात स्वच्छता मोहिम घेण्यात येणार आहे. या मोहीमेमध्ये वापरण्यायोग्य वस्तुंचे संकलन करुन क्षेत्रिय कार्यालयातील नजीकच्या आरआरआर केंद्रावर त्या जमा करणे, मंदिर परिसरात निर्माण होणारा निर्माल्य कचरा संकलित करण्यासाठी निर्माल्य कलशांची व्यवस्था करणे, प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करणे आदी सूचना देण्यात आल्या आहेत.

क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, मंदिराचे पदाधिकारी, कर्मचारी, वॉर्डमधील माजी नगरसेवक, नागरिक, शाळा कॉलेजमधील विद्यार्थी, सेवाभावी संस्था, महिला बचत गट यांना सहभागी करुन मोहिम राबवली जाईल. दररोज स्वच्छ तीर्थ अभियान मोहिमेपुर्वीचे, मोहिम करताना व मोहिम झाल्यानंतरचे ५ जीओ टॅग छायाचित्रण करुन स्वच्छ भारत अभियानाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहेत.

१७ प्रमुख रस्ते, चौकही होणार चकाचक..!
पिंपरी चिंचवड शहरात आठ क्षेत्रीय कार्यालये असून ३२ प्रभाग आहेत. या सर्व प्रभागात सखोल स्वच्छता मोहिम राबविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत शहराच्या विविध भागातील रस्ते, चौकात स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच रस्ते, चौक पाण्याने स्वच्छ धुवून काढण्यात येणार आहेत. यासाठी वाहतूक पोलिसांशी समन्वय साधला जात असल्याचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

प्रत्येक प्रभागात सखोल स्वच्छता अभियान राबवणार
केंद्र सरकारच्या आदेशानुसार २१ जानेवारीपर्यंत शहरातील ५३ मंदिरांमध्ये स्वच्छ तीर्थ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात माजी नगरसेवक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, नागरिकांनी सहभाग घ्यावा. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रभागात सखोल स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.

– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक

क्षेत्रिय अधिकाऱ्यांना मोहिमेची माहिती देणे बंधनकारक
स्वच्छ तीर्थ अभियानांतर्गत ज्या मंदिराची स्वच्छता केली आहे, त्याचे नाव, वॉर्ड क्रमांक, सहभागी अधिकारी, कर्मचारी, माजी नगरसेवक, संस्था, संख्या यांसह कार्यक्रमाची ५० शब्दांपर्यंत माहिती आरोग्य विभागाला देणे बंधनकारक आहे. यासाठी अशा आशयाचा एक तक्ताही तयार करण्यात आला आहे.
– यशवंत डांगे, सहाय्यक आयुक्त, आरोग्य विभाग

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!