ऐंशीच्या उंबरठ्यावरून निवृत्तीकडं वाटचाल करण्याऐवजी नवी इनिंग सुरू करणारे … शरद पवार

महाराष्ट्र 14 न्यूज : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हापासून अशा अनेक वेळा आल्या, जेव्हा पवारांचे राजकारण संपल्याची चर्चा करण्यात आली. परंतु अशा प्रत्येक वेळेला चकवा देऊन पवार पुढं निघून गेले.

भारतीय जनता पक्षाची निवडणुकीच्या राजकारणातली ताकद वाढत असताना आणि बाकी कुठलाच पक्ष त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही, असे वातावरण असताना शरद पवार निर्धारानं मैदानात उतरले. सव्वादोनशेहून अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये युतीने आघाडी घेतल्याचे लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झाले होते. वा-याची दिशा ओळखून त्यानंतरही अनेक सहकारी पक्ष सोडून गेले. त्यामुळं दोन्ही काँग्रेसना मिळून पस्तीसेक जागा मिळतील, असे अंदाज सगळ्या वाहिन्यांवरून व्यक्त केले जात होते.

काँग्रेसनं तर निवडणूकच सोडून दिली होती. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ऐंशीच्या घरातले शरद पवार निर्धारानं मैदानात उतरले. सगळ्या लढाया संख्याबळावर जिंकता येतात, हा समज खोटा ठरवला. प्रचाराचे रान उठवूनव दोन्ही काँग्रेसची ताकद नव्वदच्या घरात नेली. आणि मग १०५ जागा जिंकलेल्या भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवण्याचा डाव खेळले. कमी जागा जिंकूनही एकेका राज्याची सत्ता काबीज करीत सुटलेल्या भाजपला सर्वाधिक जागा जिंकूनही सत्तेबाहेर ठेवण्याची किमया पवारांनी महाराष्ट्रात घडवली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं.

भाजपला नमवता येतं, हा संदेश त्यामुळं देशभर गेला. ऐंशीच्या उंबरठ्यावरून निवृत्तीकडं वाटचाल करण्याऐवजी शरद पवार यांनी नवी इनिंग सुरू केली आहे. त्यांचा उत्साह समोरच्या माणसांमध्ये ऊर्जा निर्माण करतो. खरंतर पवारांना आता कोणत्याही सत्तापदाचं अप्रूप नसावं. कारण शरद पवार हाच ब्रँड कोणत्याही पदापेक्षा मोठा बनला आहे. दोन दिवसांपूर्वी युपीएच्या अध्यक्षपदी त्यांची निवड होणार असल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चेत किती तथ्य असेल किंवा त्यादृष्टिनं काही खरोखर घडेल हे पाहण्यासाठी वाट पाहावी लागेल. परंतु युपीएचं अध्यक्षपद ही शरद पवारांची गरज नाही. युपीएला म्हणजे देशातल्या विरोधकांच्या राजकारणाला शरद पवार यांची गरज आहे.

देशभरातल्या विस्कळित झालेल्या आणि त्यामुळं भाजपकडून सर्व आघाड्यांवर मार खाणा-या विरोधकांना नव्यानं एकत्र आणण्याची आवश्यकता आहे आणि ते काम शरद पवार यांच्याइतकं प्रभावीपणे अन्य कोणताही नेता करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. युपीएचं अध्यक्षपद म्हणजे पंतप्रधानपदासाठी दावेदारी असा मुळीच अर्थ नाही. ती फार लांबची गोष्ट आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर आणि त्यातल्या आकडेवारीवर ते अवलंबून असेल. आजच्या घडीला गरज आहे, ती विरोधकांना एकत्र आणण्याची. राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर संसदेत आणि संसदेबाहेरही एकत्रित लढण्याची. लोकांच्या हितासाठी भाजपच्या मुजोर सरकारशी लढा देण्याची.काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी प्रकृतीच्या कारणामुळे युपीएच्या अध्यक्षपदासाठी न्याय देऊ शकत नाहीत. नजिकच्या काळात काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड झाली, तरी त्यांना आधी काँग्रेसच्या पक्षसंघटनेसाठी पुरेसा वेळ द्यावा लागेल. अशा परिस्थितीत देशभरातील विरोधकांशी समन्वय साधून समविचारी पक्षांना एकत्रित आणण्यासाठी दिल्लीत एका सक्षम नेत्याची आवश्यकता आहे आणि आजघडीला शरद पवार हेच त्याचे उत्तर आहे. शरद पवार यांना शह देण्यासाठी युपीए नावाची आघाडी शीतपेटीत ठेवण्याची चाल कुणी खेळली तरी त्यामुळे शरद पवार यांचे काहीच नुकसान होणार नाही.

त्यामुळे नुकसान होईल ते देशातील जनतेचे. अशा परिस्थितीत खरेतर राष्ट्रीय पातळीवरील जाणत्या नेत्यांनी ही चर्चा पुढे नेऊन युपीएच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. काँग्रेसने आणि विशेषतः राहुल गांधी यांनीही त्यासाठी खुल्या दिलाने समर्थन द्यायला हवे. विरोधक मजबूत झाले आणि त्यामुळे भाजपला आव्हान देता आले तर त्याचा सर्वाधिक फायदा भविष्यात काँग्रेसलाच होणार आहे. शरद पवार यांच्या अनुभवाचा महाराष्ट्राला आणि देशालाही दीर्घकाळ लाभ मिळावा, या सदिच्छा!

लेखक – विजय चोरमारे
लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र टाईम्सचे राजकीय संपादक आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

7 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

1 week ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

1 week ago