महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १५ ऑगस्ट) : मित्रांसोबत फिरायला गेलेल्या आयटी अभियंत्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (मंगळवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास रिहे (मुळशी) गावच्या हद्दीत घडली आहे.
हर्षित पोटलुरी (वय 27, मुळ रा.राजमुन्ड्री, आंध्र प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या आयटी अभियंत्याचे नाव आहे. हर्षित हा काही महिन्यांपासून हिंजवडी येथे राहत होता. तो हिंजवडी आयटी पार्क फेज तीन मधील एका नामांकित आयटी कंपनीत नोकरी करत होता. स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्याने हर्षित आपल्या दोन मित्रांसोबत हिरे बंधारा परिसरात फिरण्यासाठी गेला होता. बंधाऱ्यात पोहायला उतरला असता त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो बंधाऱ्याच्या पाण्यात बुडाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच रिहे गावचे उपसरपंच काकासाहेब शिंदे, पोलिस पाटील नंदकुमार मिंडे, सामाजिक कार्यकर्ते केशव पडघळे यांच्यासह ग्रामस्थ यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने पौड पोलिस स्टेशन आणि अग्निशमन दलाला दिली. साधारणत: तीन तासानंतर मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. याबाबतचा पुढील तपास पौढ पोलिस करीत आहेत.