महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ०६जून) : मुंबई-पुणे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लवकरच दिलासा मिळणार आहे. मुंबई पुणे दरम्यान नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 2025 पासून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग सिग्नलमुक्त करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (एमएमआरडीए) या दिशेने पावले उचलली आहेत. यामुळे इंधनाची मोठी बचत होणार आहे. तसेच वाहनचालकांच्या वेळेचीही बचत होणार आहे.
सरकारने 1092 कोटी रुपये खर्चून यासाठी 4.5 किमी लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा कॉरिडॉर शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प (MTHL) आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला जोडला जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील चिर्ले इंटरचेंज ते मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दरम्यान हा प्रकल्प होणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून येत्या तीन महिन्यांत हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील दोन सर्वोत्तम रस्त्यांना जोडणारा हा प्रकल्प 30 महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. सुमारे 4.5 किमी लांबीच्या कनेक्टरच्या बांधकामासाठी सुमारे 1092 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या टेंडरची प्रक्रिया जूनअखेरपासून करण्यात येणार आहे.
मुंबई ते नवी मुंबई अंतर कमी करण्यासाठी समुद्रावर 22 कि.मी. लांबीचा पूल बांधण्यात येत आहे. या मार्गावर सिग्नल असणार नाही. मुंबई ते नवी मुंबई हे अंतर 15 ते 20 मिनिटांत कापता येणार आहे. पुलाचे काम जवळपास 94 टक्के पूर्ण झाले आहे. 2023 च्या अखेरीस हा पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला केला जाईल.