महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० जानेवारी, २०२३) : “अहंकाराचा त्याग करुन निरंकार प्रभूला हृदयामध्ये वसवून खरेखुरे मानवी जीवन जगावे” असे प्रतिपादन निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी औरंगाबादच्या बिडकीन डीएमआयसी विभागात चालू असलेल्या महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या दुसऱ्या दिवशी देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने आलेल्या विशाल मानव परिवाराला संबोधित करताना व्यक्त केले.
सदगुरु माताजींनी पुढे प्रतिपादन केले, की अहंकारामुळे मनुष्य स्वत:ला श्रेष्ठ मानत असतो आणि मनामध्ये भौतिक वस्तूंना ईश्वरापेक्षाही अधिक मौल्यवान मानत असतो. परिणामी तो जीवनाच्या वास्तविकतेपासून अनभिज्ञ राहतो आणि खरेखुरे मानवी जीवन जगू शकत नाही. याउलट जर मानवाने ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून ईश्वराशी नाते जोडले आणि सदोदित ईश्वराची जाणीव ठेवली तर त्याचे जीवन मौल्यवान होऊन जाते.
सदगुरु माताजींनी पुढे सांगितले, की ज्याप्रमाणे एक थेंब जेव्हा सागराला मिळतो तेव्हा त्याला सागराची उपमा मिळते. तद्वत मनुष्य जेव्हा भ्रामक ‘मी’चे अस्तित्व सोडून देतो आणि ईश्वररूपी शाश्वत ‘तू’च्या प्रति समर्पित होतो तेव्हा त्याला ईश्वरस्वरूप झाल्याचा श्रेष्ठ दर्जा आपसूकच प्राप्त होतो. शेवटी, सदगुरु माताजींनी समजावले, की ज्याप्रमाणे साबण आणि पाणी यांची सोबत केल्याने मळलेले कपडे स्वच्छ होतात तद्वत परम पावन परमात्म्याशी नाते जोडून त्याच्याशी अभिन्नता प्राप्त केल्याने आपण अंतर्बाह्य निर्मळ होऊन जातो, ज्यायोगे आपल्या जीवनात सहजपणे आत्मिकता आणि मानवता यांचा संगम होतो.
मा.मुख्यमंत्री यांची सदिच्छा भेट :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांनी रविवारी संत समागमाला सदिच्छा भेट दिली आणि सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांचे आशीर्वाद प्राप्त केले. याप्रसंगी संत निरंकारी मिशनच्या मानवतावादी उदात्त कार्याचा गौरव करताना ते म्हणाले, संत-महात्मा सदोदित मानवाच्या जीवनात शांतीसुखाची प्राप्ती व्हावी आणि त्यांचे कल्याण व्हावे यासाठी सतत प्रयत्नशील असतात. आज हे निरंकारी मिशन सुद्धा विश्वबंधुत्वाचे हेच उदात्त कार्य करत आहे. आपला अनुभव सांगताना ते म्हणाले, की महाडमध्ये आलेल्या महापुराच्या वेळी निरंकारी भक्तांनी जे मदत कार्य केले होते ते खरोखरच प्रशंसनीय आणि प्रेरणादायी आहे. मिशनकडून कोविड दरम्यान सुद्धा कौतुकास्पद कार्य केले असून नैसर्गिक आपत्ती असो किंवा स्वच्छता अभियानासारखे सामाजिक उपक्रम असोत अनेक कार्यामध्ये हे मिशन आपले योगदान देत आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री महोदय यांसमवेत औरंगाबादचे पालकमंत्री श्री.संदीपान भुमरे आणि मंत्री श्री.अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.