पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या शाळेतील निकिता म्हस्के प्रथम ; निकिता ठरली एक लाखाची मानकरी ; बुलढण्यातून आलेल्या निकिताची आई करते घरकाम
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ जून) : पिंपळे गुरव येथील रामनगरमध्ये राहणाऱ्या तसेच घरकाम करणाऱ्या संगीता म्हस्के यांच्या मुलीने अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी मेहनतीच्या जोरावर परिस्थितीशी सामना करीत दहावीच्या परीक्षेत ९३.४० टक्के गुण मिळवून पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या शाळेत प्रथम क्रमांक मिळविला.
ती महानगरपालिकेच्या बक्षीस योजनेतील एक लाख रुपये बक्षिसाची देखील मानकरी ठरली आहे. निकिता रमेश म्हस्के असे या गुणवंत मुलीचे नाव आहे.
ती पिंपळे गुरव येथील रामनगर मध्ये एका खोलीत भाडेतत्त्वावर राहत असून तिची आई घरकाम करते. वडील गावी मजुरीचे काम करतात तर भाऊ अजय म्हस्के बी.कॉम च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. घरकाम करीत मुलांचा सांभाळ व त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आई संगीता या अजूनही झटत आहे.
निकिताला चित्रकलेची आवड असून तिने एलिमेंटरी, इंटरमिजीएटची परीक्षा देऊन उत्तीर्ण झाली होती. तिला या परीक्षेचे दहावीच्या परीक्षेतील मार्कांमध्ये पाच गुण मिळाल्याने तिची टक्केवारी आणखी वाढली. तिच्या यशाच्या पाठीमागे शाळेतील प्राचार्य, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वर्ग असल्याचे निकिताने सांगितले. मी कम्प्युटर इंजिनिअरिंग करून स्वतःच्या पायावर उभे राहावे हे आईचे स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय आहे आणि ते मी पूर्ण करेन असेही याप्रसंगी निकिताने नमूद केले.
माझ्या या यशामुळे सर्वच स्तरातून प्रत्यक्ष भेटून, फोन वर संपर्क करून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हे पाहून आई व भाऊ दोघांनाही खूप आनंद होत आहे.
———————————————-
निकिता ही गेली आठ नऊ वर्ष माझ्या वास्तव्यामध्ये राहत आहे. तिसरी पासून तीने पुढील शिक्षणास सुरवात केली होती. खूप हुशार आणि जिद्दी आहे. तिचा भाऊ देखील शांत स्वभावाचा आहे. आई कष्टाळू असून शिक्षणाबाबतीत मुलांना चांगले घडवीत आहे. निकिता चांगल्या मार्काने पास होईल याची खात्री होती मला.
डॉ. दत्तात्रय कोकाटे, स्थानिक ज्येष्ठ नागरिक
———————————————-
निकिता म्हस्के अभ्यासात हुशार होती. नियमित शाळेत येत असे. अनेकदा अभ्यासात येणाऱ्या अडचणी ती शिक्षकांकडून समजून घेत असे. शाळेत अभ्यासिका वर्ग सुरू होता. यावेळी ती अभ्यासिका वर्गात बसून अभ्यास करीत होती. तिच्या या यशाचा आम्हा शाळेला सार्थ अभिमान आहे. तिच्या पुढील वाटचालीस शाळेकडून शुभेच्छा..!
पांडुरंग मुदगुण, मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय