महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १८ जुलै २०२३ – भारतीय हवामान विभागाने इतर जिल्ह्यांसह पुणे जिल्ह्यात २१ जुलैपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
पावसामुळे विविध प्रवाहातून थेट नदीपात्रात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठया प्रमाणावर वाढ झाल्यास आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते, या पार्श्वभूमीवर कोणतीही जिवीत अथवा वित्त हानी होऊ नये यासाठी महापालिकेच्या सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे असे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर पाणी तुंबणार नाही याची दक्षता महापालिका प्रशासनाने घ्यावी, रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, प्रभागनिहाय बीट निरिक्षक, अभियंते आणि संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पेट्रोलिंग करून पाहणी करावी, अशी बाब आढळून आल्यास तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
शहरातील ज्या भागात पूरसदृश परिस्थिती उद्भवते अशा ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. नदीकाठी असणाऱ्या शहरातील वस्त्यांमध्ये महानगरपालिकेचे पथक बारकाईने लक्ष ठेवून आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र पथक नेमण्यात आले असून उपाययोजना देखील केल्या गेल्या आहेत, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले. पाऊस जास्त प्रमाणात पडल्यास शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असते. अशावेळी नदीकाठच्या नागरिकांनी आपल्या वस्तू तसेच जनावरांची काळजी घ्यावी, कोणीही नदीपात्रात उतरू नये, अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी नागरिकांना दिल्या आहेत.
नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने सर्व अग्निशमन केंद्रांच्या ठिकाणी पूर नियंत्रण कक्ष सुरु आहे. शिवाय महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष असून सर्व कक्ष २४ X ७ कार्यान्वित ठेवण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले आहे.
संभाव्य परिस्थिती लक्षात घेता अग्निशमनचे कर्मचारी शहरात फिरतीवर असतील. पावसामुळे झाडपडीचे तसेच इतर आपत्कालीन प्रसंग उद्भवल्यास शहरात अग्निशमन यंत्रणा सज्ज असून अग्निशमनची टीम बचाव कार्यासाठी आवश्यक त्या सर्व साधनसामग्रीसह घटनास्थळावर पोहोचण्यासाठी २४ X ७ कार्यान्वित आहे, अशी माहिती अग्निशमन विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी दिली.
महत्वाचे दूरध्वनी क्रमांक
मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष- ०२०- २८३३११११ / ६७३३११११