महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०५ जून) : पुणे पंढरपूर सायकल वारी 2023 अनुभव,…
साधारण पणे दरवर्षी पालखीच्या एक आठवडा अगोदर आमची सायकल वारी पंढरपूरला निघते. ह्या वेळी 3 अणि 4 जूनला वारी आहे असा मेसेज आला अणि आम्ही लगेच नोंदणी करून टाकली. आमची ही दुसरी सायकल वारी असल्यामुळे मागचा अनुभव पाठीशी होता, पण आमच्या ग्रुपची फॅमिली ट्रिप एक आठवडा अगोदर सिमला कुलू मनाली करून आली होती..त्यामुळे पुरेशी प्रॅक्टिस झाली नव्हती त्यामुळे मनात थोडी साशंकता होतीच तरी मनात पूर्ण निर्धार केला होता की ह्या वर्षी देखील सायकल वारी करायची अणि विठुरायाच्या मनात असेल तर तो नक्की धैर्य देणार अणि विठुरायाचे नमन करून तयारी चालु केली.
ट्रिप वरून आल्यानंतर सर्वांना फक्त 3 दिवसच प्रैक्टिस अणि तयारीला मिळाले.तरी 3 दिवस रोज 40 km प्रॅक्टिस चालु ठेवली अणि बरोबर वस्तूची जमवाजमव चालु ठेवली. एवढ्याश्या तयारीवर 250कि.मी.ची मोठी उडी घ्यायची ह्यावर सर्वजण साशंकच होते.पण रोजचा व्यायाम अणि योगा चालुच होता त्यामुळे तेव्हढा आत्मविश्वास होता. ३१मे ते 2 जून पर्यंत पर्यंत च्या कालावधीत राईड साठी लागणारया कपड्यांची, वस्तुंची जमवाजमव केली. 2 जूनला ऑफिसची सर्व कामे उरकून बॅग भरायला घेतली.माझी तब्येत थोडी साथ देत नव्हती तरीपण मनाचा निर्धार केला़. रात्रीचा प्रवास करायचा असल्यामुळे घरातूनच जेवणाचा डबा घेतला. शेवटच्या क्षणी मी एयर पंप अणि पंक्चर किट बागेत टाकले. पण कोण जाणे त्याची खुप मदत पुढे होणार होती.ह्यावेळी आमच्या ग्रुप मध्ये माझा पुतण्या आर्यन देखील सामील होणार होता…त्याच्यासाठी ही पहिलीच साइकिल वारी होती.
2 जूनला सायकलला भगवा झेंडा,हेड लाईट,टेल लाईट ,२पाण्याच्या बॉटल्स लावून साइकिल तयार केली अणि रात्री 11 वाजता घरातील सर्वांना भेटून अणि सर्वांचा आशीर्वाद घेऊन सांगवीतिल गजानन महाराज मंदिरापासून पंजाब इंगळे सर,सचिन भटगे,गणेश कातरवाने अणि माझा पुतण्या आर्यन पाटील यांनी सायकल वारीला सुरूवात केली.
एखादे ध्येय गाठण्यासाठी सुर गवसावा त्याप्रमाणे आम्ही पंढरीच्या दिशेने निघालो. हळूहळू आमच्या साइकिलनेही वेग घेतला. दुसरी साइकिल वारी असल्यामुळे सर्वजण एकमेकांना चांगलेच ओळखत होते. अधूनमधून गप्पा मारणे, गप्पागोष्टी करणे, टिंगल टवाळ्या करणे चालूच होते अणि सर्वजण एकमेकांना सांभाळून घेत होते. सोबतीला आकाशातील पौर्णिमेचा चंद्र देखील होता जो आमच्याशी लपंडाव खेळत होता. हळूहळू आम्ही हडपसर,मांजरी,लोणी काळभोर,उरुळी कांचन,यवत, पाटस अशी गावे सर करत वार्याच्या वेगाने आमचा प्रवास सुरू होता. मध्ये मध्ये पाणी,सरबत चालूच होते.एवढे अन्तर पार केल्यानंतर आता मात्र पोटात कावळे ओरडायला लागले अणि म्हणुन कुरकुम्भ च्या अलीकडे जेवण्याचा निर्णय घेतला. तिथेच एका हॉटेल मध्ये मनसोक्त जेवलो अणि आराम न करताच पुढील प्रवासाला लागलो. वाटेत बरेचजण आपुलकीने विचारपूस करत होते अणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देखील देत होते.पुढील टप्प्यात कुरकुंभचा चढ चालु झाला आणि पुढील टप्पा सोपा नाही अणि त्यासाठी तुमची शारिरिक मानसिक तयारी पाहिजे हे जाणवले. पण तो देखील आम्ही सहजपणे पार केला. आर्यनची पहिली वारी असूनसुद्धा त्याला थकवा जाणवत नव्हता. आता हळू हळू उजाडायला लागले होते अणि सूर्यदेव हळू हळू वर येऊ लागले.इथुन पुढील टप्प्यात मात्र आम्हा सायकलीस्टचा कस लागणार हे जानवायला लागले .पुढिल संपुर्ण रस्ता चढ उताराचा होता. पण पुढील धडकी भरवणारा रस्ता कधी आमचा मित्र बनुन आम्हाला पुढे नेऊ लागला कळलेच नाही.हेड विंड,टेल विंडची भीती पण नाहीशी झाली. सूर्यदेव आता आग ओकत होता अणि आता मात्र कडक ऊन,वारा यामुळे थोडा स्पीड कमी होत होता.तरी उन्हात भर्र वारयात आमच्या सायकली पुढे जात होत्या.पुढे भीगवन , लोणी देवकर, इंदापूर अणि टेंभुर्णी गाठले. तिथे थोडा आराम केला अणि छान उसाचा रस घेतला.
टेंभुर्णी पर्यंत हाय वे असल्यामुळे डिव्हायडर होते पण तिथुन पंढरपूर फाट्याला वळल्यावर वन वे आहे. त्यामुळे टेंभुर्णी फाटा ते पंढरपुर हा 40 की. मी. चा प्रवास दुपारच्या कडक उन्हामुळे अणि वन वेमुळे खूप अवघड वाटायला लागला.तरीपण आम्ही कडक उन्हात निघालो. उन्हात अंगाची लाही लाही होत होती. थोडे पुढे जाऊन थांबल्यावर कळले साइकिल पंक्चर झाली आहे. सर्वजण म्हणाले साइकिल गाडीत टाकुन पंढरपूरला जाऊ. पण एवढे अन्तर पार केल्यानंतर साइकिल गाडीत टाकून न्यायाला मन तयार होईना अणि आठवले कि पंक्चर कीट बरोबर आणले आहे म्हणुन रस्त्यातच बाजूला हॉटेल्सच्या शेड खाली आम्ही स्वतः पंक्चर काढली .हा एक छान अनुभव होता. परत प्रवास चालू करून अखेर 3 जूनला संध्याकाळी 6 वाजता पंढरपूरला पोहोचलो. सगळ्यांचे पोहोचल्यावर मेडल देऊन स्वागत करण्यात आले.
त्यानंतर सर्वजण फ्रेश होऊन सकाळी मंदिरात गेलो अणि विठुरायाच्या चरणाला जेव्हा स्पर्श केला तेव्हा सर्व थकवा निघुन गेला अणि सायकल वारीचे सार्थक झाल्यासारखे वाटले.विठुरायाला मनापासून नमन करून परतीच्या प्रवासाला लागलो.
एक मात्र नक्की तुमच्या मानसिक,शारीरिक अणि प्रचंड ईच्छा शक्तीच्या जोरावर तुम्ही कोणतीही बिकट वाट पार करू शकता. परत एकदा या वारी साठी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे साथ देणार्या माझ्या सर्व स्नेही जणांचे मनापासून आभार…
अतुल पाटील, (आयटी इंजिनिअर, पिंपरी चिंचवड, पुणे)