महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जानेवारी : राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. महाराष्ट्रातल्या महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी सर्वांनाच चकित केले आहे. एकीकडे सत्ताधारी महायुतीने मुसंडी मारली असतानाच, दुसरीकडे असदुद्दीन ओवैसी यांच्या ‘एआयएमआयएम’ (AIMIM) पक्षाने राज्यात उत्तम कामगिरी केली आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत एमआयएमचे एकूण ९५ उमेदवार विजयी झाले असून, अनेक ठिकाणी त्यांनी प्रस्थापित पक्षांना मागे टाकले आहे. त्यामुळे राज्याच्या महापालिका निवडणुकांच्या निकालांनी प्रस्थापित राजकीय पक्षांच्या पायाखालची जमीन सरकवली आहे.
कधीकाळी केवळ हैदराबादपुरता मर्यादित असलेला ‘पतंग’ ने येथील प्रस्थापित पक्षांचा ‘पतंग’ कापला आहे. AIMIM (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) हा पक्ष राज्यातील सहाव्या क्रमांकाचा पक्ष म्हणून समोर आला आहे. या पक्षाचा हा केवळ राजकीय विजय नसून, हिंदू मतांच्या विभाजनाचा आणि पारंपरिक राजकारणाला बसलेला मोठा तडाखा मानला जात आहे.

या निवडणुकीतील सध्याचे निकाल आणि कल पाहता भाजप प्रथम १२०० जागांच्या पुढे दिसत आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेली शिवसेना (शिंदे) ही ३७० जागांच्या पुढे दिसत आहे, तर काँग्रेस पक्ष हा ३०० पार करून तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे, त्या खालोखाल अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जवळपास दीडशे जागांवर आपले स्थान पक्के केल्याचे दिसत आहे. उबाठा शिवसेनेला मात्र २९ महापालिकांमध्ये दीडशेचाही आकडा गाठता आलेला नाही, मात्र AIMIM ने ९५ जागांवर विजय जवळपास निश्चित करून महाराष्ट्राच्या राजकारणात सहाव्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. या आधी राज्यभरातील सर्व महापालिकांमध्ये मिळून एकत्रितपणे AIMIM चे जवळपास ६० नगरसेवक होते. यावेळी त्यात ६० टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या पक्षाने तेल लावलेला पैलवान म्हणून ओळख असलेले शरद पवार यांनाही मागे टाकले आहे, पवारांच्या राष्ट्रवादीला २५ जागांचा आकडा गाठतानाही दमछाक होत आहे.
प्रमुख ठळक मुद्दे
- सहाव्या क्रमांकावर झेप: राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) , समाजवादी पक्ष, शेकाप, मनसे, वंचित या पक्षांना मागे टाकत AIMIM ने सहावे स्थान पटकावले आहे.
- मुस्लिम व्होट बँक मजबूत: मुस्लिम मतपेटीचे ध्रुवीकरण करण्यात ओवेसींना यश आले असून, त्याचा थेट फटका हिंदू मतांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षांना बसताना दिसत आहे.
- नगरसेवकांच्या संख्येत मोठी वाढ: राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांमध्ये आता AIMIM चे नगरसेवक निर्णायक भूमिकेत असतील.
- हा केवळ निवडणूक निकाल नाही, तर भविष्यातील धोक्याची नांदी आहे. जर हिंदूंनी आपल्या मतांच्या शक्तीकडे दुर्लक्ष केले, तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलण्यास वेळ लागणार नाही.
हिंदुत्वनिष्ठ पक्षांसाठी धोक्याची घंटा
एकीकडे हिंदू मते जात, पात आणि पंथांमध्ये विभागली जात असताना, दुसरीकडे मात्र AIMIM मुस्लिम मतपेटीच्या जोरावर सत्तेच्या चाव्या आपल्या हातात घेण्याच्या प्रयत्नात आहे. महापालिका निवडणुकांचे हे निकाल म्हणजे पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी एक मोठा इशारा आहे. हिंदूंची एकजूट तुटली, तर सत्तेची समीकरणे कोणाच्या हातात जातील, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे AIMIM चा हा वाढता ग्राफ आहे.

















